|
कटपयादि सांकेतिक भाषा पद्धति (शब्दांचे अनुक्रम ठरविण्यासाठीं योजिलेली एक स्मृतिसाहाय्यक पद्धति. संगीत ज्योतिष इ. शास्त्रांत याच पद्धतीचा उपयोग करतात.) या पद्धतींत क पासून ह पर्यंत जितके वर्ण आहेत त्यांतून अ हा वर्ण सोडून बाकीच्या वर्णांचे पांच भाग केलेले असतात व त्यांतील प्रत्येक अक्षरासाठीं विशिष्ट अंकही ठरविलेला असतो. _______________________________________________________ क्रम अंक क्रम १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ० १ कादिनवाः - कपासून झपर्यंत ९ वर्ण क ख ग घ ङ च छ ज झ २ टादिनवाः - टपासून धपर्यंत ९ वर्ण ट ठ ड ढ ण त थ द ध ३ पादिपंचाः - प ते म हे ५ वर्ण प फ ब भ म ४ याद्याष्टाः - य ते हपर्यंतचे ८ वर्ण य र ल व श ष स ह ५ नकाराय बिंदुः - न _________________________________________________________ या पद्धतींत अक्षरांनीं कोणते आंकडे घ्यावयाचे याबरोबर असाहि संकेत आहे कीं वाक्यांत वा शब्दांत कोणताहि स्वर आला तर त्याचा आंकडा शून्य असा समजावयाचा तसेंच स्वराशिवाय व्यंजन (पाय मोडून लिहिण्याचें आलें तर तें लक्षांतच घ्यावयांचें नाहीं), या पद्धतीत "ज" या अक्षराचा अर्थ आठ हा आंकडा व "य" चा अर्थ एक हा आकडा. यामुळें जय = १८ (अंकानां वामतो गतिः या न्यायानें) हा आंकडा सिद्ध होतो. महाभारतांत मूळ संहितेचें"जय"असें नांव होतें व तें प्रथमच्या नमनाच्या श्लोकांत दिलेलेंच आहे ([संस्कृति कोश]). नंदभाषा संकेत केवली = एक, अवारू = दोन, उधानु = तीन, पोकू = चार, मुळु = पांच, शेली = सहा, पवित्र = सात, मंगी = आठ, तेवसू = नऊ, लेवनू = नऊ, अंगुळु = दहा, एकडू = अकरा, रेघा = बारा, ठेपरू = तेरा, चोपडू = चवदा, तळी = पंधरा, तान आणि भुरकातानतळी = सोळा, उधानुतानतळीं = अठरा, काटा = वीस, भुरकातानकाटी = एकवीस, विटी = शंभर, ढका = हजार, फाटा = एक आणा, अवारू फाटे = दोन आणें, मंगीफट = आठ आणे, तळी फटे = पंधरा आणे इत्यादि ([मोलस्वर्थ - म - ज्ञा - को - वि. १६]) संख्या - संकेत प्राचीन भारतांत संख्यावाचक शब्दांशिवाय दुसर्या सांकेतिक शब्दांचा संख्या दर्शविण्याकरितां वाङ्मयांत उपयोग करण्यांत येत होता. हे शब्दांक म्हणजे निरनिराळ्या वस्तूंची अथवा कल्पनांचीं नांवें सुचविलीं जातात त्यांकरितांअच नियुक्त केलेले असत. उदाः - शून्य - शून्य, आकाश, पूर्ण इ, एक - शशि, गणपतिरदन, ईश्वर इ. २ - भुज, नेत्र, नदीतट इ. ३ - गुण, अग्नि, ताप इ. ४ - वेद, वर्ण, आश्रम इ. ५ - वाण, पांडव, प्राण इ, ६ - शास्त्र, ऋतु, रस इ. ७ - ऋषि, वार, स्वर इ. आठ - वसु, सिद्धि, दिग्गज इ. ९ - निधि, ग्रह, भक्ति इ. १० - दिशा, अवतारा, रावणशिरस इ. ११ - रुद, अक्षौहिणी, १२ - आदित्य, मास, राशि इ, १३ - विश्वेदेव अतिजगती इ. १४ - मनु, विद्या, रत्न इ. १५ - तिथि, पक्ष, पक्ष इ. १६ - श्रृंगार, कला, संस्कार इ. १८ - पुराण, स्मृति, २० - नख, रावणबाहु, ब २४ - गायत्री, अर्हत् . २५ - प्रकृति, २७ - नक्षत्र, ३२ - लक्षण दांत, ३३ - देवता, ३६ - रागिणी, ४९ - मरुत् , ५६ - भोग, ६४ - कला, ८४ - योनि, १००० इंद्र, कमलद्ल, सूर्यकिरण इ. (हिंदी साहित्य कोश) ([संस्कृति कोश]) शब्द - संकेत "अनंतपारं किल शब्दशास्त्रम्"याप्रमाणें संख्यात्मक व संख्येव्यतिरिक्त संकेतांचीहि व्याप्ति अमाप आहे. जिज्ञासू वाचकांस ज्ञान व मनोरंजनाबरोबरच आकर्षकपणा वाटून जिज्ञासा वृद्धिंगत व्हावी एकढयापुरतेंच कांहीं संकेतांचें मर्यादित संकलन - श्री पीठस्थ आचार्यास उद्देशून संकेतानें वापरतात. उदा० श्रीशंकराचार्य, श्रीमध्वाचार्य इ. श्री शब्द सामान्यतः श्रेष्ठत्व बोधक आहे. सामान्य यतीला श्री १०८ व पीठस्थ आचार्यांस श्री १००८ असें संबोधिलें जातें.
- अर्धोदय पर्व पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे. ([धर्मसिंधु])
- अधिक मास सूर्यसंक्रातिरहित चांद्रमास, चांद्रवर्षांत सुमारें तीन चर्षांनीं येणारा तेरावा महिना,. हा महिना साधारणत ; ३२ महिने १६ दिवस आणि ४ घटिका इतक्या कालावधीनंतर येतो. यासच धोंडा महिना, मल मास किंवा पुरुषोत्तम मास अशीं नांवें आहेत.
- अमृतसिद्धि योग रविवारीं हस्त, सोमवारीं श्रवण किंवा मृग, मंगळवारीं अश्विनी, बुधवारीं अनुराधा, गुरुवारीं पुष्य, शुक्रवारीं रेवती व शनिवारीं रोहिणी. याप्रमाणें वार व नक्षत्रयोग हा कोणत्याहि कार्याअस शुभ मानलेला आहे. त्यासच अमृतसिद्धि योग म्हणतात.
- अश्वत्थामा दुग्ध पाण्यांत पीठ कालवून केलेला दुधासारखा पातळ पदार्थ, असा द्रोणाचार्यांच्या पत्नीनें आपल्या मुलाला - अश्वत्थामाला करून दिला होता अशी कथा आहे. असाच लहान मुलांच्या हट्टाच्या समजुतीचा एक प्रकार लक्षणेनें समजावयाचा.
- अप्रशिखा एकाचा मित्र त्यास ठार करावयास प्रवृत्त झाला असतां आपलें मुत्युवृत्त इतरांस कळावें म्हणून त्यानें अ - प्र - शि - ख या अद्याक्षरांत रचलेली चार चरणांची कविता. अनेन तव पुत्रेण। प्रसुप्तस्य वनांतरे। शिखामादाय हस्तेन। खड्गेनोपहतं शिरः ॥
- यावरून सांकेतिक भाषा. ([म. श. कोश.])
- अहल्याबाई होळकर घराण्यांत ऐतिहासिक कालांत होऊन गेलेली दानशूर स्त्री. यावरून संकेतानें अहल्याबाई म्हणजे दानशूर स्त्री.
- आखाड सासरा नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसर्यावर करडा अंमल चालविणार्या मनुष्यास म्हणतात.
- कपिला षष्ठी भाद्रपद वद्य षष्ठीच्या दिवशीं मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यतिपातयोग, सूर्य नक्षत्र हस्त, इतके योग आल्यास तीस कपिला षष्ठी म्हणतात. हा अपूर्व योग बहुधा साठ वर्षांनीं येतो. ज्या गोष्टी एकत्र जमणें अशाक्य त्या आकस्मिकपणें एकत्र जमल्यास आनंदानें कपिला षष्ठीचा योग म्हणतात.
- कन्यागत कन्या राशीस गुरु येतो तो काल हा फरा शुभ समजतात. हा काल सिंहस्थानंतर येतो. तो सुमारें तेरा महिने असतो या काळांत भागीरथी नदी कृष्णेस भेटावयास येते अशी समजूत आहे. म्हणून कन्यागतांत कृष्णास्त्रानास विशेष महत्त्व मानलें आहे.
- कोजागिरी आश्विन शु ॥ १५. या दिवशीं रात्रीं लक्ष्मीप्रीत्यर्थ मध्यरात्रीपर्यंत जागून लक्ष्मी व चंद्र यांची पूजा करून दूध वगैरे पितात. कोजार्ति म्हणजे कोण जागतो असें लक्ष्मी विचारते व जो जागा असतो त्याला संपत्ति देते अशी समजूत आहे.
- कुंभकर्णी झोंप रावणाचा भाऊ कुंभकर्ण अत्यंत झोंपाळू होता यावरून, लक्षणीनें. हा निद्रेंतून सहा महिन्यांनीं एकदां जागा होत असे अशी कथा आहे.
- गर्गाचार्या मुहूर्त सूर्योदयाचा पूर्वीच्या ५ व्या घटकेपासून तिसर्या घटकेपर्यंतचा काल अथवा सूर्योदयापर्यंतची वेळ हा शूभ मुहूर्त असून गमनास योग्य मानतात. गर्गमुनि हे थोर ज्योतिषशास्त्रवेत्ते होऊन गेले. यांनी भगवान् श्रीकृष्णाचें जातक वर्तकिलें होतें. त्यांनीं रचिलेले वृद्धगर्गसंहिता - गर्गसंहिता - हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
- गद्धेपंचविशी ज्यांत विवेक अथवा पोंच फारसा नसतो असा. मनुष्याच्या सुमारे पंचवीस वर्षेपर्यंतच्या कालाला संकेतानें म्हणतात.
- गणेश टोपी मागून हळूच येऊन एकाद्याच्या तोंडावर वस्त्र टाकून आवळणें वा डोळे झांकल्यामुळें त्याला दिसेनासें झालें म्हणजे यथेच्छ बुकलणें अशाप्रकारचा एक खेळ.
- गोरज मुहूर्त गुरें (गाई वांसरें) रानांतून घरी परत येत असतां त्यांच्या चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा काल.
- गौरीचे डोहाळे चैत्रांत पडणारी पावसाची बुरबुर याला संकेतांनें म्हणतात.
- घटोत्कचाचा बाजार भीमपुत्र घटोत्कच हा सर्व राक्षसी (मायावी) विद्येंत प्रवीण व कामरूपघर होता. एकदम नाहींसें होणें ; वाटेल तें रूप घेणें वगैरे. यांवरून मायावी बाजार अथवा फसवेगिरी असा अर्थ रूढ झाला
- घबाड शुहूर्त सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजून येणार्या संख्येला तीन या संख्येनें गुणून गुणाकारांत चालू तिथी मिळवून आलेल्या संख्येला सातांनीं भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात व तो शुभ मानला जातो.
- घागरगडची सुभेदारी घागरीनें पाणी वाहण्याचें काम करणारा या अर्थी.
- दशंहरा ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगेचा अवतार झाला. या दशमीला दशहरा असें नांव आहे. त्या दिवशीं जे दहा योग सांगितले आहेत तेः - १ ज्येष्ठमास, २ शुक्लपक्ष, ३ दशमी, ४ बुधवार, ५ हस्तनक्षत्र, ६ व्यति - पात, ७ गरा (या नांवाचे करण आहे), ८ आनंद योग, कन्या राशीचा चंद्र आणि १० वृषम राशीचा रवि. ([धर्मसिंधु])
- नित्य प्रलय झोंप. गाढ झोपेला वैदिक नित्य प्रलय म्हणतात. नित्य प्रलयांत जीवनाची आहुति टाकून पुन्हा जागें होऊन नव्यानें जन्माला यावयाचें म्हणून.
- बादरायण संबंध ओढून ताणून लावलेला संबंध. कथा कथा अशी आहे कीं एक लुच्चा मनुष्य एकाकडे जाऊन मी तुमचा संबंधी आहे असें सांगू लागला. संबंध विचारतां"अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः। बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयम् ॥ ([सु.])
- अर्थ असा कीं आमच्या गाडीचें चाक बोरीच्या लांकडाचें आहे व तुमच्या दारांत बोरीचें झाड आहे हा बादरायण संबंध.
- नव्याण्णव बादी शेंकडा नव्वाण्णव अथवा बहुधा कांहींतरी थाप देऊन वेळ मारून नेणारास म्हणतात.
- भगीरथ प्रयत्न राजा भगीरथानें आपले पूर्वज सगरपुत्र यांस मोक्ष मिळावा याकरितां दीर्घ तपस्या करून स्वर्गातून गंगेला भूलोकीं आणिली. या कथेवरून दीर्घ परिश्रमानें अचाट कार्य साध्य करणें असा अर्थ.
- भाऊगर्दी अहमदशहा अबदालीव मराठे यांच्यांत झालेल्या पानिपतच्या युद्धांत (इ. स. १७६१) विश्वासराव गोळी लागून ठार झाल्यानंतर मराठयांचे सर सेनापति सदाशिवरावभाऊ पेशवे अखेरच्या क्षणीं घोडयावरून पाय उतार होऊन लढततं लढतां त्या एकंदर धुमश्चकींत दिसेनासे झाले व नंतर जो गोंधळ व गर्दी होऊन नाश ओढवला त्यास अनुलक्षून म्हणतात.
- मल्लिनाथी मल्लिनाथ हा संस्कृत साहित्यांतील एक प्रसिद्ध टीकाकार. यानें रघुवंश, किरात, माघ वगैरे अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या असल्यामुळें मल्लिनाथी म्हणजे टीका हा अर्थ रूढ झाला.
- मारुतीचें शेपूट मारुतीचें शेपूट जाळून टाकण्याची आज्ञा रावणानें केल्यावेळी शेपूट आणखी लांबूच लागलें संपेचना यावरून लांबत जाणारे काम.
- मातृषोडशी मातृगयेस जाऊन प्रसूति वेदनादि अनेकानेक कष्ट सोसलेल्या मातेचें ऋण फेडण्याच्या हेतूनें द्यावयाचे सोळा पिंडदानास म्हणतात. (श्राद्धप्रयोग)
- लक्ष्मण रेषा लक्ष्मणानें सीतेस रेषा ओढून दिली होती व त्या रेषेच्या बाहेर न जाण्यास सांगितलें होतें, व तसें न केल्यास धोका होईल असें बजावलें होतें. यावरून विशिष्ट मर्यादेचें उल्लंघन झाल्यास धोका अटळ.
- असा संकेत.
- विश्वामित्री सृष्टि ब्रह्मदेवाशीं स्पर्धा करून विश्वामित्रानें प्रतिसृष्टि निर्मान केली अशी कथा आहे. मनुष्याच्या डोक्यासारखा नारळ, गाईऐवजी म्हैस, घोडयाऐवजीं गाढव हीं त्याचीं उदाहरणें आहेत.
- विश्वामित्राचा उन्हाळा आश्विन शु. १५ ते कार्तिक शु. १५ हा शरद् ऋतूचा मध्याकाल.
- शतपथ"शतं पंथानो मार्गा नाम अध्यायाः यस्य स शतपथः"महर्षि याज्ञवल्क्य यांचे नांवावर प्रसिद्ध असलेला शुक्ल यजुर्वेदावरील ब्राह्मण ग्रंथ यांत १०० अध्याय आहेत. म्हणून यास शतपथ हें अभिधान मिळालें आहे.
- शिराळशेटी राज्य शिराळशेट नांवाचा एक वाणी. दुर्गादेवीचे दुष्काळांत अनेक लोकांचे प्राण वांचविल्याबद्दल - त्यास साडेतीन घटका विजापुरास राज्य करण्याची संधी मिळाली व तेवढया वेळांत त्यानें अनेक दानधर्म केले. अशी आख्यायिका आहे. यावरून लक्षणेनें अल्पकालीन वैभव असा अर्थ रूढ झाला.
- सुवर्णमध्य दोन परस्परविरुद्ध गोष्टीतून काढलेला मध्यम मार्ग म्हणजे तडजोड असा अर्थ.
- सत्कार्यवाद कार्य प्रकट होण्याच्या पूर्वी त्याचे कारणामध्ये अस्तित्व मानणारें निरीश्वर सांख्यमत ([म. श. को.])
- हे बायकोनें नवर्याचें नाव घ्यावयाचें नसतें म्हणून पति या अथीं हा शब्द संकेतानें वापारला जातो. उदा. 'आमचे हे' तसेंच 'तिकडे' अथवा 'स्वतां' असाहि प्रयोग केलेला आढळतो.
अध्यात्मिक संकेत ॐ हा ईश्वराचा वाचक म्हणजे संकेत आहे. (प्रसाद नवंबर १९६३) कामशास्त्र संकेत पुष्ट, भरदार पोटर्या उघडया दिसल्या कीं नायिका प्रेमाविव्हल होतात. (खर्डेघाशी) तंत्रशास्त्र संकेत द्दष्टाला अद्दष्ट व ज्ञेयाला अज्ञेय हें नेहमीच आधारभूत व अधिष्ठानभूत असतें. (हिमालय - दर्शन) काव्य संकेत "रघुवंशा"चे अध्ययनाची सुरुवात दुसर्या सर्गापासून करावयाची असते. प्रथम सर्गात नंदिनीचा शाप असल्यामुळे अध्ययनास योग्य नाहीं असें परंपरागत मानलें जातें. धार्मिक संकेत रामायण ग्रंथ घरी वाचावयाचा नसतो. तसेंच महाभारतांतील आरण्यक पर्व. तसें केल्यास अनेक संकटें उत्पन्न होतात असें मानले आहे. रामायण पुराण सांगतांना तेथेंच एक रिकामा पाट मांडून ठेवण्याची प्रथा आहे. अद्दश्य रुपानें श्री मारुतीराय तेथें रामकथा ऐकता बसतात अशी समजूत आहे. मातापित्यांना प्रदक्षिणा घातली कीं पृथ्वी प्रदक्षिणेचे फल मिळते असें शास्त्र आहे एतद्विषयीं श्रीगणेशाची एक पौराणिक कथाहि आहे. श्वेत मंदार हा वृक्ष एकवीस वर्षें वाढला तर त्याच्या मुळीची आपोआप गणेशामूतीं तयार होते म्हणतात. (सिद्धपंचरत्न). नाटय संकेत सुखान्तिके (Comedy) मध्यें दुःख तीव्र स्वरूपांत असूं नये वा दाखवूं नये असा एक संकेत आहे. (हास्यकारण आणि मराठी सुखान्तिका) विविध संकेत सगळेच स्पष्ट करून दाखविल्यानें साहित्य - विचारांतील व्यंजनेला म्हणजे सूचकतेला बाध येतो असा पूर्वा सूरींचा संकेत आहे
|