|
भांड कुल, जिरॅनिएसी भांड गणातील (जिरॅनिएलीझ) द्विदलिकित फुलझाडांचे एक कुल. बेथॅम व हूकर यांनी या कुलात ऑक्सॅलिडेसी, लिग्नँथेसी, ट्रोपिओलेसी व बाल्ममिनेसी यांचाही समावेश केला आहे. प्रमुख लक्षणे-बव्हंशी केसाळ औषधी, अनेकदा उपपर्णयुक्त साधी पाने, नियमित द्विलिंगी, पंचभागी फुले, संवर्त चिरस्थायी, पाच सुट्या पाकळ्या व त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट तळाशी जुळलेली केसरदले, किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यात मध्यवर्ती अक्षावर अनेक बीजके, किंजल्क पाच, फळ बहुधा पालिभेदी, मध्यवर्ती चंचूपासून किंजदले सुटी होतात. जिरॅनियम व पेंलॅर्गाएनियमची झाडे बागेत लोकप्रिय आहेत.
|