|
भेंडीकुल, कार्पास कुल, माल्व्हेसी भेंडी, मुद्रा, जपा (जास्वंद) कापूस (तूल) पारोसा (पारिस) पिंपळ, अंबाडी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, शाल्मली (लाल सावर) दुरियन, सफेत सावर, गोरख चिंच इत्यादींचा अंतर्भाव पूर्वी याच कुलात करीत, परंतु त्यांचे एक स्वतंत्र कुल शाल्मली कुल (बॉम्बॅकेसी) हल्ली केले आहे (हचिन्सन). दोन्ही कुले भेंडी गणात (कार्पास गणात, माल्व्हेलीझमध्ये) समाविष्ट आहेत. याशिवाय मुचकुंद कुल (स्टर्क्युलिएसी) व परुषक कुल (टिलिएसी) इत्यादीही त्याच गणात आहेत. माल्व्हेसी कुलाची प्रमुख लक्षणे- शरीरावर तारकाकृती केस असलेले वृक्ष, क्षुपे व औषधी, साधी सोपपर्ण, एकाआड एक पाने, फुले बहुधा एकाकी, पानांच्या बगलेत, द्विलिंगी, नियमित, सच्छद्रक व अवकिंज, संदले पाच व जुळलेली, पाकळ्या पाच व तळाशी केसर नलिकेशी चिकटलेली, केसरदलाच्या नळीतून किंजल वाढत जाऊन नंतर किंजल्क पसरते. परागकोशात एक कप्पा, बहुधा पाच ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात एक किंवा अनेक बीजके, फळ मुद्रिका किंवा बोंड, इतर वनस्पती, चिनी कंदील, बला, चिकणा, तुपकडी, गुलखेरा, रानभेंडी, वनभेंडी इ.इ.
|