३५४०.
जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥
आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥
बाळलीला केली जगीं ख्याती मिरविली । चांगयाची हरली चौसष्ट कळा ॥३॥
कळा पासष्टावी ज्ञानदेवें दाविली । चांगयाची विराली अहं ममता ॥४॥
चांगदेव शरण कायावाचामनें । एका जनार्दनीं म्हणे तैशापरी ॥५॥
३५४१.
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
३५४२.
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥
जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥
लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥
३५४३.
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥
महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥
आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्नत ॥३॥
एका जनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥
३५४४.
अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पैं सार । येथें संशय नाहीं ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाहीं ॥५॥
३५४५.
तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसीं हीं चौदा अक्षरें । जो ऐके कर्णविवरें । कीं उच्चारीं मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन: नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥