लंकेश तयासी अभय देत ॥ तुम्ही गज व्हा अवघे पर्वत ॥ समस्त अचळां मानली मात ॥ जाहले उन्मत्त वारण ॥१॥
रावण देवांवरी चालिला ॥ मेघनादें इंद्र ते वेळां ॥ ऐरावतीसगट पाडिला ॥ निजबळें रणांगणीं ॥२॥
ऐसा सत्रावेळां सहस्रनेत्र ॥ जिंकी मंदोदरीचा पुत्र ॥ मग इंद्रजित नाम थोर ॥ ब्रीद तेथोन ऐसें बांधिलें ॥३॥
पाश घालोनि पाकशासन ॥ इंद्रजितें आणिला बांधोन ॥ मग विरिंची आला धांवोन ॥ होय प्रसन्न शक्रजिता ॥४॥
अपेक्षित देवोनि वर ॥ सोडविला पुरंदर ॥ मग रावणें देव समग्र ॥ सेवेलागीं ठेविले ॥५॥
शक्रें आणावे नित्य हार ॥ छत्र धरी रोहिणीवर ॥ रसाधिपती निरंतर ॥ वाहे नीर धांवतचि ॥६॥
गभस्ति होय द्वारपाळ ॥ कुबेर आणि अनिळ ॥ यांही सडासंमार्जन सकळ ॥ गृहामाजी करावें ॥७॥
वस्त्रे धूत वैश्र्वानर ॥ पुरोहित जाहला विष्णुपुत्र ॥ पांडित्य करी अंगिराकुमर ॥ नारद तुंबर गाती सदा ॥८॥
दहावेळां शिव पूजिला ॥ रावण दश वक्रें पावला ॥ वीस हस्त लाधला ॥ शिवही केला वश तेणें ॥९॥
कोणे एक समयी रावण ॥ पुष्पकविमानीं बैसोन ॥ कैलासगिरी चढतां पूर्ण ॥ तों नंदी रक्षण महाद्वारीं ॥११०॥
म्हणे नको जाऊं लंकापती ॥ शिव-उमा आहेत एकांतीं ॥ ऐसें ऐकतां मयजापती ॥ परम क्षोभ पावला ॥११॥
नंदीस म्हणे ते वेळे ॥ तुज मर्कटाचेनि बोलें ॥ मी न राहें कदाकाळें ॥ जाईन बळेंकरूनियां ॥१२॥
ऐसें बोलतां दशकंधर ॥ कोपला तेव्हां नंदिकेश्र्वर ॥ शापसस्त्र अनिवार ॥ ताडिलें सत्वर तेणेंचि ॥१३॥
म्हणे उन्मत्त तूं मूढमती ॥ तुज नर वानर रणीं वधिती ॥ तुवां दशरुद्र पूजिले नीगुती ॥ अकरावा मारुती प्रगटेल ॥१४॥
तो वानररूपें अवतरोन ॥ करील तुझें गर्वमोचन ॥ ऐकतां क्रोधावला रावण ॥ म्हणे हा उपडीन कैलासगिरी ॥१५॥
उचलोनियां कैलासपर्वत ॥ लंकेत नेईन क्षणांत ॥ म्हणोनि तळीं घातला हात ॥ समूळ उचलावयासी ॥१६॥
तें जाणोनि हिमनगजामात ॥ निजपदें दडपिला पर्वत ॥ सहस्र वर्षेंपर्यंत ॥ आक्रंदत रावण ॥१७॥
मग करी शिवाचे स्तवन ॥ प्रसन्न जाहला त्रिनयन ॥ दशवक्र दीधला सोडून ॥ आला परतोन लंकेसी ॥१८॥
एकदां रेवातीरीं ध्यानस्थ ॥ बैसला असतां मयजाकांत ॥ पुढें सिकतालिंग विराजित ॥ तों पाणी चढत माघारें ॥१९॥
सहस्त्रार्जुनें निजभुजेंकरून ॥ कोंडिलें नर्मदेचें जीवन ॥ ध्यान करितां रावण ॥ आकंठपर्यंत बुडाला ॥१२०॥
परम क्रोधावला दशमौळी ॥ धांवोनि आला तयाजवळी ॥ म्हणे कोण रे तूं ये स्थळीं ॥ रेवाजळ कोंडितोसी ॥२१॥
सहस्त्रार्जुनें कवळ घालून ॥ ग्रीवेसी धरिला दशवदन ॥ कीं मृगेंद्रें धरिला वारण ॥ जाहले प्राण कासाविस ॥२२॥
बहुकाळ बंदीं घातला ॥ मग पौलस्ति ऋषि धांविन्नला ॥ भिक्षा मागोनि तया वेळां ॥ सोडविला राक्षस ॥२३॥
बळीचिया नगरा देख ॥ बळेंचि आला लंकानायक ॥ जैसा व्याळाचे बिळीं मूषक ॥ चारा घेऊं प्रवेशला ॥२४॥
तों बळीचिया महाद्वारीं ॥ एक पुरुष उभा दंडधारी ॥ जयाचिया तेजामाझारी ॥ शशी-मित्र झांकोळती ॥२५॥
तो महाराज त्रिविक्रम ॥ देखोनि बळीचें निजप्रेम ॥ द्वारपाळ जाहला पुरुषोत्तम ॥ अज अजित जगद्रुरु ॥२६॥
मग तयासी म्हणे रावण ॥ बळीसी आणी बोलावून ॥ नाहीं तरी हे नगरी उचलोन ॥ पालथी घालीन सागरीं ॥२७॥
मग म्हणे वैकुंठविलासी ॥ तूं बळीचा प्रताप नेणसी ॥ आतांच येईल प्रत्ययासी ॥ जाईं वेगेंसी आंतौता ॥२८॥
मग आतां प्रवेशला त्वरित ॥ तों सभेसी बैसला विरोचनसुत ॥ तयासी म्हणे लंकानाथ ॥ करावया समर पातलों मी ॥२९॥
जैसा शुष्क तृणाचा पुतळा ॥ धरावया आला वडवानळा ॥ कीं वृषभ बळें माजला ॥ खोचूं धांवला सिंहासी ॥१३०॥
व्याघ्रासी धरीन म्हणे बस्त ॥ कीं आळीका सुपर्णावरी धांवत ॥ ऐरावतीचा मोडावया दांत ॥ शलभ जैसा सरसावला ॥३१॥
वृश्र्चिक धांवे सत्वर ॥ ताडावया खादिरांगार ॥ खद्योत म्हणे दिवाकर ॥ आंसडून पाडीन खालता ॥३२॥
तैसा बळीप्रति रावण ॥ सांगे आपुलें थोरपण ॥ कीं सरस्वतीपुढें मतिमंदें येऊन ॥ वाग्वाद आरंभिला ॥३३॥
हांसोनि बळी म्हणे ते वेळे ॥ या वैकुंठनाथे द्वारपाळें ॥ पूर्वीं नारसिंहरूप धरिलें ॥ प्रल्हाद भक्त रक्षावया ॥३४॥
नरसिंहगदाघायेंकरून ॥ हिरण्यकशिपूचें कर्णभूषण ॥ कुंडलें पडलीं उसळोन ॥ तीं उचलोन घेई तूं ॥३५॥
तीं उचलों गेला दशकंधर ॥ बळें लाविले वीसही कर ॥ जैसा मशकासी न ढळे कुंजर ॥ तैसें जाहलें रावणा पैं ॥३६॥
निस्तेज जाहला ते वेळीं ॥ तो बळीची राणी विंध्यावळी ॥ सारिपाट खेळतां प्रीतिमेळीं ॥ फांसा हातींचा उसळला ॥३७॥
तों बळी म्हणे रावणासी ॥ फांसा आणि वेगेंसीं ॥ परी तोही न उचले तयासी ॥ राक्षसासी खेद वाटे ॥३८॥
गदगदां हांसती दोघें जणें ॥ बंदीं घातले म्हणती देव याणें ॥ येथें आला युद्धाकारणें ॥ तों फासा यासी नुचलेचि ॥३९॥
जाहला परम अपमान ॥ माघार चालिला दशवदन ॥ तो मार्गी बळीचे सेवकजन ॥ त्यांणी रावण नागविला ॥१४०॥
घेतलीं वस्त्रें शस्त्रें हिरून ॥ मुखासी तेल मसी लावून ॥ वीसही हस्त बांधोन ॥ नगरामाजी हिंडविती ॥४१॥
एक अंगावावरी धुळी टाकिती ॥ एक दाढी धरोनि ओढिती ॥ एक बळेंचि बैसविती ॥ एक उठविती सवेंचि ॥४२॥
एक करिती शेणमार ॥ काकुळती येत दशकंधर ॥ पळों पाहे जंव बाहेर ॥ तंव द्वारपाळ जाऊं नेदी ॥४३॥
क्षुद्र द्वार मोरियेमधून ॥ मस्तक घाली जंव रावण ॥ तंव सर्वांठायी वामन ॥ दंडावरी मारित ॥४४॥
बळीचे अश्र्वशाळेंत रावण ॥ क्षुधाक्रांत हिंडे नग्न ॥ चणे खातसे वेंचून ॥ मागे कोरान्न घरोघरीं ॥४५॥
पोटासाठी वाघ्या होऊन ॥ म्हणे मी मल्हारीचा श्र्वान ॥ कोठंबे चोंडकें काखे घेऊन ॥ नाचोनि धान्य मेळवी ॥४६॥
तों दासींनी धरिला कौतुकें ॥ उदक आणितां घातला काखें ॥ तयां काकुळती येत दीनमुखें ॥ मग सोडिती सत्वर ॥४७॥
मग विश्रवा धांवोन ॥ बळीस भेटला येऊन ॥ म्हणे बंदीस घातला रावण ॥ तो भिक्षेस मज देइंजे ॥४८॥
बळी बोले आण वाहोन ॥ येथें कोणास नाहीं बंधन ॥ ग्रामांत असे रावण ॥ तो शोधोनि नेईजे ॥४९॥
तो बळीचे आश्र्वशाळेत देखिला ॥ पिता देखोनि रडूं लागला ॥ मग ऋषीनें वामन स्तविला ॥ सोडवून नेला रावण ॥१५०॥