द्वैतविवेक - श्लोक २१ ते ६९

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


शि०- ते कसे ? गू कल्पना कर कीं तीन पुरुष एक मार्गानें जात असतां त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडलें घ्यावयास त्यापैंकी दोघें धांवले त्यांत जो पुढें गेला त्यास तें मिळालें व तेणेंकरुन त्याला परम आनंदही झाला. जो मागे राहिला त्यास तें न मिळाल्यामुळे वाईट वाटून तो संतापला आणि तिसरा जो विरक्त होता त्यास हर्ष व शोक हे दोन्ही झाले नाहींत. ॥२१॥

शि०- मग यांत जीवसृष्टी कोणती व ईशसृष्टी कोणती ? गू०- यांत प्रियत्व आणि उपेक्ष्यात्व असे जे तीन गूण रत्नाच्याठायीं आले. ते तिघां पुरुषांनीं कर्मेंकरुन उप्तन्न केले म्हणून ते जीवसृष्टी होय. आणि तीही मध्ये साधारण जे रत्नरुप तें ईश्वरनिर्मित होय. ॥२२॥

शि०- हे माझ्या ध्यानांत नीट येईना, करितां अधिक स्पष्ट करुन सांगावें. गू- तुला आणखी एक दृष्टांत सांगतो म्हणजे चांगले समजेल स्त्री ही स्वरूपात एक पासून संबंधभेदाने नवर्‍यास बायको सासवेस सून भावजयीस नणंद आणि पुत्रास माता झाली. एथें स्त्री ही ईशसृष्टी होय. आणि तिच्या ठायीं बायको सून नणंद इत्यादी कल्पना जीवांच्या आहेत. ॥२३॥

शि०- आपण दिलेल्या दृष्टांतांत बायको एकच असून तिजवर केलेल्या जीवांच्या कल्पना मात्र भिन्न आहेत. परंतु बायकोच्या आकारांत कांहीं भेद नाहीं. मग जीवाने अधिक काय निर्माण केलें? ॥२४॥

गू०- अधिक कसें केलें नाहीं? येथें दोन स्त्रिया झाल्या एक मांसमयी आणि एक मनोमयी मांसमयी ही ईशकृत असून ती एकच आहे. पण मनोमयीं स्त्रिया जीवाने निर्माण केल्या आहेत व त्याभिन्न आहेत. ॥२५॥

शि०- भ्रांति स्वप्न मनोराज्य व स्मृति इत्यादी अवस्थामध्यें भासणारे पदार्थ मनोमय आहेत असं म्हणतां येईल कारण तेथें बाह्म विषय नाहेकेंत परंतु जागृतीत प्रत्यक्ष दिसणार्‍या पदार्थास मनोमय असें कसें बाह्म विषय नाहींत परंतु जागृतीत प्रत्यक्ष दिसणार्‍या पदार्थास मनोमय असें कसें म्हणावे. ॥२६॥

गू०- होय तू म्हणतोस तें खरें परंतु बाह्मविषय जरी असले तरी विषयाकार प्रत्यक्षक होण्याला विषय आणि मन या दोहोंचा संयोग झाला पाहिजें हें सांगणें आमच्या पदरचें नव्हें भाष्यकारांनी व वार्तिककारांनींही असाच सिद्धांत केला आहे. ॥२७॥

भाष्यकरांनी असं म्हटलें आहे कीं ज्याप्रमाणें मुशींत ओतलेलें तांबे तिच्यासारखेंच होतें, त्याप्रमाणें रुपादिक विषयास व्यापणारें चित्त खरोखर तत्तद्विषयाकार झाल्यासारखें दिसतें. ॥२८॥

अथवा दुसरा दृष्टांत ज्याप्रमाणें सूर्याचा प्रकाश ज्या ज्या पदार्थावर पडेल, त्या त्या पदार्थासारखा त्याचा आकार बनतो. त्याप्रमाने बुद्धिही सर्व पदार्थाची प्रकाशक असल्यामुळें ती ज्या पदार्थाचा व्यापिते त्या पदार्थाप्रमाणे तिचा आकार होतो. ॥२९॥

आतां द्वार्तिकाकरांचेंवचन ऐक - कोणताही पदार्थ गोचर होतांना प्रथमच चिदाभासा पासून मनोवृत्ति उप्तन्न होते. ती उप्तन्न झाल्यानंतर घटादि विषयांवर जाऊन आदळते. तदनंतर त्या विषयास व्यापून त्या सारखाच तिचा आकार बनतो. ॥३०॥

शि०- मग पुढें काय ह्मणता ? गू०- या वार्तिककारांच्या व भाष्याकरांच्या वचनावरुन सहज लक्ष्यांत येईल कीं घटज्ञान होतेवेळी दोन घट असतात. एक मातीचा व दुसरा मनाचा मातीचा घट मनास गोचर होतो व मनाचा साक्षीचा गोचर होतो. ॥३१॥

याप्रमाणें ईशनिर्मित व जीवनिर्मित अशी दोन प्रकारची द्वैतसृष्टी सिद्ध झाली. यासा अन्वयव्यतिरिक लावून पाहिलें असतां मनोमय सृष्टीच जीवाच्या सुखदुःखास कारण आहे. असें समजेल कारण जोपर्यंत हा मानस प्रपंच आहे तोंपर्यंत हा मानस प्रपंच आहे तोपर्यंत जीवास सुखदुःखें होतात, आणि त्याच्या अभावी सुखही नाहीं व दुःखही नाहीं. ॥३२॥

त्यास उदाहरण. बाहेरील पदार्थ नसूनही मनुष्यास स्वप्नाचेठायीं सुखदुःखें होतात. आणि ते पदार्थ सभोवार असूनहीं समाधि निद्रा व मुर्च्छा इत्यादि अवस्थांमध्यें मनुष्यांस सुखदुःखांची बाधा मुळींच होत नाहीं. ॥३३॥

मनोमय प्रपंचच सुखदुःखांस कारण आहे. याविषयीं आणखी एक उत्कृष्ट उदाहरण देतों म्हणजे स्पष्ट समजेल कल्पना करे की एका गृहस्थाचा पुत्र दूरदेशी गेला आहे. तेथें तो सुखरुप व सुरक्षित असूनही एका ठगानें त्यास असें सांगितलें. कीं तुमच्या पुत्र मेला हें वचन ऐकुन तो पुत्रशोकानें खरोखरच रडू लागतो. ॥३४॥

बरें आतां त्यांच्या उलट पहा. समज कीं, तो त्याचा पुत्र खरोखरच मेला पण बापाच्या कानीं ती वार्ता जोंपर्यंत आली नाही तोंपर्यंत त्याला त्याचें कांहींच वाटत नाहीं तो खुशाल आनंदांत असतो. तस्मात ही मानस सृष्टींच जीवाच्या सुखदुःखास कारण आहे, हें सिद्ध झाले. ॥३५॥

शि-पण असं जर म्हणावें तर ब्रह्म जगताचा कांहींच उपयोग नाहींसा होऊन बौद्धांचा जो विज्ञानवाद तो स्वीकारल्यासारख्या होईल. ? गू०- विज्ञानवाद कसा होतो ? बौद्ध आपल्या विज्ञानवादांत बाह्म जग मुळीच कबूल करीत नाहींत ते म्हणतात, कीं यावत्किचित्त सर्व जग बुद्धिचेंच बनलं आहे. तसें आमचें म्हणणें नाहीं आमचें म्हणणे असे आहे कीं जरी जीवाच्या सुखदुःखांस कारण हा मानस प्रपंच आहे तथापि तो होण्याला बाह्म जगाची आवश्यकता आहे तें ब्राह्म जग मुलीच नाहीं आमचे मत नाहीं मग विज्ञानवाद कसा होईल ? ॥३६॥

शि०- बाह्म सृष्टी जर सुखदुःखास कारण नाहीं, तर ती असून नसल्यासारखीच झाली मग विज्ञानावादांत आणि तुमच्या म्हणण्यांत भेद तो काय? गू०- भेद आहे तर नाहें कसा ? अरे बाह्म सृष्टी निरुपयोगी झाली म्हणून ती मुळीच नाही असे म्हणतां येणार नाहीं. अमूक वस्तू आहे असें सिद्ध करण्यास तिच्या अस्तित्वाबद्दल चांगलें प्रमाण असले म्हणजे झाले; तिच्या प्रयोजनाची मुळींच अपेक्षा नाहीं. ॥३७॥

शि०- आपल्या म्हणण्याप्रमाणें जीवाच्या बंधासही मानस सृष्टीच जर कारण आहे तर तिच्या निवारणार्थ चित्तनिरोधरुप योगाभ्यास केला म्हणजे झाले. मग आणखी ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे ? ॥३८॥

गू०- अरे बाबा योगाभ्यासाने द्वैतशांति जरी झाली तरी ती तेवढ्या वेळेपुरती मात्र होते. परंतु एकदा हें मानसजग नाहींसे झाल्यानंतर पुनः उप्तन्नच होऊन नये अशा प्रकारची जर शांति पाहिजे. तर ती ब्रह्मज्ञानावांचून कधींहीं होणार नाहें असा वेदां ताचा डंका वाजत आहे. ॥३९॥

शि०- बाह्म जग ( ईशसृष्टी ) अगदी नाहींसे झाल्यावांचून ब्रह्मज्ञान कसें हीईल ? गू०- ज्ञान होण्यास ईशसृष्टीच्या निवारणाची मुळींच गरज नाहीं. ती जरी आहे तशीच असली तरी ती मिथ्या आहे. अशी पक्की खात्री झाली असता, अद्वैत ब्रह्मचें ज्ञान होण्यास कोणतीच नड नाही. ॥४०॥

शि०- ईशसृष्टि मिथ्या आहे इतकेंच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसें होईल ? ती अगदीं नाहींशीच केली पाहिजे असें मला वाटतें. गू०- अरे तिची निवृत्ति प्रलयकालीं होत नाहीं काय ? मग तेव्हा कोठें ब्रह्मज्ञान होतें ? प्रलयकाली गूरुशास्त्रादिक ज्ञान साधनंचा अभाव असल्यामुळे उलटा ज्ञानास प्रतिबंधच होईल तेव्हा द्वैताभाव जरी झाली तरी अद्वैतज्ञान होणें अशक्य आहे. ॥४१॥

तस्मात या ईश्वरनिर्मित सृष्टीपासून मुळीच हानी नाही. इतकेंच नव्हे तर तिजपासून पुर्वी सांगितल्याप्रमणें गूरुशास्त्रादिकांच्या संबंधानें उलटा फायदाच आहे. बरें तिचे निवारण करणे तरी शक्य आहे म्हणावें तर तेंही असाध्यच; मग ती असेना बापडी, तिचा उगीच कां तिरस्कार करितोस ? ॥४२॥

हें जीवद्वैत दोन प्रकारचें आहे एक शास्त्रीय व दुसरें अशास्त्रीय यांपैकी अशास्त्रीय द्वैतप्रपंचाचा मात्र मुमुक्षूनें त्याग करावा. परंतु तत्त्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत सहसा टाकू नये. ॥४३॥

शि०- शास्त्रीय द्वैत म्हणजे काय ? गू०- श्रवण मनन व निदिध्यासनरुप जो ब्रह्मविचार व त्यांची साधनें यांसच शास्त्रीयद्वैत म्हणता. हा मानस प्रपंच तत्त्व बोध झाल्यानम्तर सोडून द्यावा. अशी श्रुतींची आज्ञा आहे. शि०- तर मग ( आसूप्तेरा मृतेःकालंनयेद्वदातचितया ) म्हणजे मुमुक्षुंनी सर्व आयुष्य वेदांतचिंतनांत घालवावें असें जे शास्त्रानें सांगितले त्यांचा अर्थ काय? गू०- त्याचा अर्थ इतकाच कीं, कामादि षड्रीपुंना मनांत येण्यास अगदी अवकाशच देऊ नयें म्हणून तसें शास्त्रानें सांगितलें एर्‍हवीं तत्त्वज्ञान झाल्यावर शास्त्रीय द्वैताची मुळीच गरज नाहीं. ॥४४॥

शि०- बरें याजविषयीं श्रुतीची आज्ञा आहे असे, तुम्हीं म्हटले तर त्या श्रुती कोणत्या ? गू०- त्या श्रुतीचा अभिप्राय तुला सांगतो. बुद्धिमान मुमुक्षुनें शास्त्राचे अध्ययन व पुनः पुनः अभ्यास करुन परब्रह्मचें ज्ञान झालें, म्हणजे उल्केप्रमाणें त्यांचा त्याग करावा; ही एक श्रुति. ॥४५॥

दुसरी श्रुति असें म्हणतें कीं बुद्धिमान मुमुक्षुनें शास्त्रांचा अभ्यास करुन धान्यार्थी जसा कोंडा टाकुन देतो, तद्वत सर्व ग्रंथाचा त्याग करावा. ॥४६॥

तिसरी श्रुति म्हणते कीं त्या एका आत्म्याला मात्र जाणून धीर पुरुषानें बुद्धिचा निश्चय करावा. पुष्कळ शब्दांचे अध्ययन करण्यांत कांहीं अर्थ नाही उगीच वाणीला श्रम मात्र होतो. ॥४७॥

चौथी म्हणते कीं, त्या आत्म्याला मात्र नीट जाणून घ्या. आत्मविचारावांचून इतर भाषणच सोडून द्या. वाणी आणि मन नियमन करावें इत्यादी श्रुतीची स्फुट वचने आहेत. ॥४८॥

शि०- एथवर शास्त्रीय द्वैत झाले आतां अशास्त्रीय द्वैताविषयीं कांही सांगावे. गू०- अशास्त्रीय द्वैतामध्यें आणखी तीव्र आणि मंद असे अवतार दोन भेद आहेत. कामक्रोधादिक जे मनोविकार ते तीव्र आणि मनोराज्य हे मंद होय. ॥४९॥

शि०- मग या अशास्त्रीय द्विविध त्याग तत्त्व ज्ञानापुर्वीच केला पाहिजे. कारण शांति व समधि ही श्रुतीत ब्रह्मज्ञानाच्या साधना मध्यें गणली आहेत. ॥५०॥

शि०-तर मग तत्त्वज्ञानानंतर त्यांचा स्वीकार करावा कीं काय? गू०- अरे पुर्वी त्याग करावा असें म्हटल्यावर नंतर त्याचा स्वीकार करावा असें होतें काय ? जीवन्मुक्ति संपादन करण्याकरितां तत्त्वज्ञानानंतरहीं त्यांचा कधीही प्राप्त होणार नाहीं. ॥५१॥

शि०- जर तत्त्वज्ञानानें मनुष्य जन्म मरणाच्या फेर्‍यातुन मुक्त होतो आसा सिद्धांत आहे, तर तितक्यांनेच कृतार्थता होते; मग आणखी जीवन्मुक्ति ती कशाला पाहिजे ? तो नसली तरी चालेल. गू०- ऐहिक भोग नाहींसे होतात या भयानें जर तुला जीवन्मुक्तींचा कंटाळा आला तर पुढील जन्मांतील सूखभोग अंतरतील म्हणून पुनर्जन्माचीही इच्छा कर. जीवन्मुक्ति जर नको तर तुला विदेहमुक्ति तरी कशाला पाहिजे, जन्म असेल बापडा यज्ञदिकेंकरुन स्वर्गप्राप्ति मिळवुन धन्य हो म्हणजे झालें. ॥५२॥

शि०- स्वर्गातील सुख नित्य नाहीं तर त्याला क्षय व वृद्धि आहे, ह्मणून स्वर्ग त्याज्य आहे. गू०- क्षयद्रुष्टीरुप दोषामुळें जर स्वर्ग त्याज्य आहे तर मुर्तिमंत केवळ दोषच असे जे कामक्रोधादिक त्यांचा त्याग कां बरें करुं नये? ॥५३॥

शि०- एकदां तत्त्वज्ञान झाल्यानंतर ऐहिक भोगापुरते कमादिक जरी उप्तन्न झाले तरी काय नड आहे ? गू०- बाबारे जर विषयलोभ न सोडशील तर विधिनिषशास्त्राचें उल्लंघन होऊन मनास वाटेल तसें आचरण करुन अगदी बहकशील. ॥५४॥

शि०- ज्ञानानें यथेष्टाचरा केलें म्हणून काय झालें ? गू- सूरेश्वराचार्य असें म्हणतात. कीं अद्वैततत्त्वाचा बोध होऊन देखील जर मनुष्य यथेष्टाचरणांत पडला, तर तो अभक्ष्य देखील भक्षण करील, काय पाहिजे ते करील मग तसं झाल्यावर त्याला आणि कुत्र्याला भेद काय राहिला शि०- मग काय झालें ? ॥५५॥

गू०- अहाहा ! तुझ्या ह्म ज्ञानाचें वैभव काय सांगावेंरे! तत्त्वज्ञान होण्यापुर्वी कामक्रोधादि क्लेश मात्र भोगावे लागले. आणि आतां तर ज्ञान झाल्यावर सर्व लोकांकडून छी थु म्हणून घ्यावें लागेल वाहवारे वाहवा. ॥५६॥

शि०- मग आपलें म्हणणें काय तें तरी समजूं द्या. गू०- बाबारे आमचे म्हणणें इतकेंच कीं तु आतां तत्त्ववेत्ता झालास त्याआर्थीं डुकरासारखा वागण्यास इच्छे नको कामक्रोधादिक बुद्धिचे दोष काढून टाक; आणि सर्व लोकांकडून देवासारखी पूजा घे. ॥५७॥

शि०- ते काढून टाकण्यास उपाय कोणता ? गू०- विषयदोषर्शनादि उपाय योजले असतां कामक्रोधादिकांचा त्याग होतो. हे उपाय मोक्षशास्त्रांस प्रसिद्ध आहेत. त्यांचा चांगला बोध करुन सुखी हो. ॥५८॥

शि०- कामादिक विकारांपासून मोठमोठे अनर्थ होतात. म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे हें योग्य आहे. परंतु मनोराज्य असल्यानें काय हानि आहे ? गू०- बाबारे कामादिक पुरवलें पन मनोराज्य नको. तें तर सर्व दोषांचे मूळ होय म्हणून त्याचा त्याग अगदीच केला पाहिजे. त्यापासून मोठी हानी आहे असे भगवंतांनी अर्जूनास सांगितले आहे. ॥५९॥

शि०- भगवंतांनी काय सांगितले ? गू०- भगवंद्वाक्य असे आहे कीं विषयांचे जें चिंतन त्यापासून संसर्ग घडतो संसर्गापासून काम, कामापासून क्रोध क्रोधापासून मोह आणि मोहापासून शेवटी नाश होतो. एवढ्या अनर्थास कारण मनोराज्य होय. ॥६०॥

शि०- बरें पण हें मनोराज्य जिंकावे कसें ? गू०- निर्विकल्प समाधीच्या योगानें हें जिंकतां येतें. हा निर्विकल्प समाधि साधण्यास आधीं सविकल्प समाधींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हळूहळू तो साध्य होतो. ॥६१॥

शि०- परंतु हा समाधि साधण्यास तरी आष्टांग योग केला पाहिजे. पण तो त्याला साध्य होत नाही. त्याणें काय करावें ? गू ०- मनोराज्य जिंकण्यास आणखी एक उत्तम साधन आहे ज्याला चांगले तत्त्व समजलें आहे. व ज्याच्या मनांतील कामक्रोधादिक दोष जाऊन मन अगदी स्वच्छ झालें आहे. अशा पुरुषानें एकांतीं बसून गूरुपदिष्ट प्रणवाचा दीर्घ उच्चार केला असतां मनोराज्य नाहीसें होतें. ॥६२॥

शि०- बरें यारीतीनें मनोराज्य जिंकल्यानंतर पुढें काय होतें ? गू०- ज्याप्रमाणें मुका वाग्व्यवहाररहित होऊन उगीच बसतो त्याप्रमाणें मनोराज्य जिंकले म्हणजे मन सर्वव्यापाररहित होऊन उगीच बसतें या दशेचें वर्णन वसिष्ठानें रामचंद्रास पुष्कळ प्रकारेंकरुन दाखविलें आहे. ॥६३॥

शि०-वसिष्ठ ऋषिनीं काय सांगितलें आहे? गू०- वसिष्ठ म्हणतात कीं, आत्म्यावाचून दुसरा दृश्य पदार्थच नाहीं असा पक्क निश्चय करुन सर्व दृश्यांचें लयसाक्षित्व संपादन केलें असतां निरतिशय मोक्षमुखाची प्राप्ति होतें. ॥६४॥

कितीही शास्त्रें धुंडाळीली व कीतीही वादविवाद केला, तरी शेवटी सर्वांचा फलितार्थ म्हणून इतकाच की सकलवासनांचा त्याग करुन मनाची तुष्णी स्थिती संपादन केल्यावांचून उत्तम पदाची प्राप्ति होत नाहीं. ॥६५॥

शि०- अशी मनाची निर्विकाल्पस्थिती होऊनही भोगदायक प्रारब्धकर्माच्या योगानें पुनः विक्षेप झाला असतां त्याचा परिहार कसा करावा ? गू०- त्याला दुसरा उपाय नाही. पुनः पुनः अभ्यास करुन चित्त स्थिर करावें. ॥६६॥

ज्याच्या चित्ताला कधींहीं विक्षेप होत नाहीं तो ब्रह्मवेत्ता म्हणणे देखील औपचारिकच वास्तविक तो ब्रह्मच आहे असं वेदांत पारंगत ऋषि म्हणतात. ॥६७॥

याविषयीं वसिष्ठानीहीं असेंच सांगितलें आहे. तें असें म्हणतात. कीं मला ब्रह्म समजले व न समजलें असे जे ब्रह्मचें ज्ञान आणि अज्ञान या दोहोंचाही त्याग करुन जो केवल अद्वैत चैतन्य मात्र होऊन जातो तो वास्तविक ब्रह्मच होय; ब्रह्मवेत्ता नव्हे. ॥६८॥

जीवद्वैताच्या अत्यंत त्यागानें जीवन्मुक्तीची पराकाष्ठा ( शेवटची स्थिति ) प्राप्त होते. या कारणास्तव आज आम्हीं ईश सृष्टीपासून जीवसृष्टि निराळीं करुन दाखविलीं ॥६९॥

द्वैतविवेक समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP