अध्याय आठवा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीराम सच्चिदानंद घन तनु । जो पुराण पुरुष पुरातनु । जो पूर्णावतारी पूर्णब्रह्म धनु । सकळ तनूंचा साक्षी पैं ॥५१॥

आदि मध्य जो अंती । परी हाचि एक सीतेचा पती । तुच्छ करून सकळ नृपती । वरी रघुपती प्रियकर ॥५२॥

हंस गती जानकी चालत । पद भूषणें मधुर गर्जत । गळां माळ घालूनि त्वरित । मस्तक चरणीं ठेविला ॥५३॥

गळां घालतांचि माळ । जाहला स्वानंदाचा सुकाळ । वाद्यें वाजों लागलीं तुंबळ । नांदें निराळ दुमदुमिलें ॥५४॥

संतोषला मिथुळेश्र्वर । म्हणे माझे भाग्यास नाहीं पार । जांवई जाहला रघुवीर । भुवन सुंदर मेघश्याम ॥५५॥

जनकें आणि विश्र्वामित्रें । लिहीलीं अयोध्येसी दिव्य पत्रें । घेऊनियां दूत त्वरें ॥ अयोध्येसी पातले ॥५६॥

कुंकुममंडित पत्रें ॥ लिहिलीं होती विश्र्वामित्रें ॥ ती उचलोनी अजराजपुत्रें ॥ वसिष्ठाकरीं दीधलीं ॥५७॥

दोहींतील एकचि अभिप्राय ॥ गूढ परम लिहिलें चातुर्य ॥ त्याचा अर्थ करोनि ऋषिवर्य ॥ ब्रह्मकुमर सांगतसे ॥५८॥

हिमनगजामातसायकासन ॥ भंगूनि विजयी झाला बाण ॥ तेव्हां थरथरिला पूर्ण ॥ आनंदघन रथस्वामी ॥५९॥

गुणें केली बहुत स्तुति ॥ आनंदें यश वर्णी सारथी ॥ जोंवरी रथचक्रे असती ॥ वोहोरें नांदोत तोंवरी ॥१६०॥

रथगर्भीं होतें जें निधान ॥ तेणें बाणप्रताप देखोन ॥ ऐक्य झालें चरणीं येऊन ॥ तुम्हीं त्वरेंकरून येईंजे ॥६१॥

अर्थ सांगे वसिष्ठमुनि ॥ साक्ष श्र्लोक असे महिम्नीं ॥ त्रिपुरवधीं जेव्हां शूलपाणि ॥ बाण चक्रपाणि जाहला ॥६२॥

पृथ्वीचा केला तेव्हां रथ ॥ चंद्रमित्र चाकें अद्भुत ॥ कनकाद्रि धनुष्य होत ॥ गुण तेथें फणींद्र पैं ॥६३॥

सारथि झाला कमलासन ॥ जानकी रथगर्भींचें रत्न ॥ बाण तोचि हा रघुनंदन ॥ शिव धनुष्य जेणें भंगिलें ॥६४॥

ऐसा अर्थ सांगे ब्रह्मसुत ॥ आनंदला राजा दशरथ ॥ दळभारें सिद्ध होत ॥ धाव देत निशाणीं ॥६५॥

सोळा पद्में दळभार ॥ चतुरंग दळ निघे निघे सत्वर ॥ सुमंतादि प्रधान राजकुमार ॥ भरतशत्रुघ्न निघाले ॥६६॥

कौसल्या सुमित्रा कैकयी राणी ॥ निघाल्या आरूढोनि सुखासनीं ॥ दूत वेत्रकनकपाणीं ॥ सहस्रावधि धांवती पुढें ॥६७॥

सप्तशतें दशरथाच्या युवती ॥ त्याही रामलग्ना पाहों येती ॥ सुखासनीं बैसोनि जाती ॥ अनुक्रमें करूनियां ॥६८॥

प्रजालोक निघाले समस्त ॥ निजरथीं बैसे दशरथ ॥ लक्षोनियां मिथिलापंथ ॥ परम वेगें चालिले ॥६९॥

पृथ्वीपति राजा दशरथ ॥ मस्तकीं आतपत्रें विराजित ॥ मित्रपत्रें परत शोभत ॥ दोहीं भागीं समसमान ॥१७०॥

मृगांकवर्ण चामरें ॥ एकावरी विराजती तुंगारपत्रें ॥ एक उडविती लघु चिरें ॥ दोहींकडे श्र्वेतवर्ण ॥७१॥

मकरबिरुदें पुढें चालती ॥ नभचुंबित ध्वज विराजती ॥ वाद्यगजरें करून क्षिती ॥ दुमदुमिली तेधवां ॥७२॥

पुढें शमदमांचे पायभार ॥ मागें सद्विवेकाचे तुरंग अपार ॥ त्यापाठीं निजबोधाचे कुंजर ॥ किंकाटती रामनामें ॥७३॥

निजानुभवाचे दिव्य रथ ॥ त्यावरी आरूढले वऱ्हाडी समस्त ॥ वारू तेचि चारी पुरुषार्थ ॥ समानगती धांवती ॥७४॥

जागृती प्रथम पेणें सत्य ॥ स्थूळ परग्राम अद्भुत ॥ तेथें न राहे दशरथ ॥ चित्तीं रघुनाथ भरला असे ॥७५॥

पुढें स्वप्नावस्था सूक्ष्मनगर ॥ तेथें न राहे अजराजकुमर ॥ म्हणे जवळी करावा रघुवीर ॥ आडवस्ति करूं नका ॥७६॥

पुढें सुषुप्ति अवस्था कारणपूर ॥ सदा ओस आणि अंधकार ॥ रामउपासक वऱ्हाडी थोर ॥ जाती सत्वर पुढेंचि ॥७७॥

मिथिलेबाहेर उपवन ॥ तुर्या अवस्था दिव्यज्ञान ॥ पुढें रघुनाथप्राप्तीचें चिन्ह ॥ राहिले लक्षोन तेथेंचि ॥७८॥

पुढें विराजे विदेहनगर ॥ ऐकों येत अनुहत वाद्यगजर ॥ निजभारेंसी विदेहनृपवर ॥ आला सामोरा दशरथा ॥७९॥

असो दृष्टी देखतां विदेहनृप ॥ आनंदें उठिला अयोध्याधिप ॥ क्षेम दीधलें सुखरूप ॥ अनुक्रमें सकळिकांसी ॥१८०॥

भरत शत्रुघ्न देखोन ॥ म्हणे आमचे सदनींहून ॥ राम सौमित्र आले रुसोन ॥ जनक संदेहीं पडिलासे ॥८१॥

दशरथ म्हणे हे शत्रुघ्न भरत ॥ आश्र्चर्य करी मिथिलानाथ ॥ असो समस्त गजरेंसी मिरवत ॥ निजमंडपांत आणिले ॥८२॥

चापखंडें देखतां ते वेळे ॥ वीरांसी रोमांच उभे ठाकले ॥ एकांचे नेत्रीं अश्रु आले ॥ कोदंडखंडें देखतां ॥८३॥

तंव तो भक्तकामकल्पद्रुम ॥ कौसल्येनें जवळी देखिला राम ॥ धांवोनि आलिंगिला परम ॥ हृदयीं प्रेम न समाये ॥८४॥

मांडीवरी घेऊनि रघुवीर ॥ म्हणे रामा तूं कोमलांग सुकुमार ॥ चंडीशकोदंड परम कठोर ॥ कैसें चढवोनि मोडिलें ॥८५॥

दशरथें आलिंगिला राम ॥ जो सच्चिदानंद मेघश्याम ॥ भरत शत्रुघ्न परम सप्रेम ॥ श्रीरामचरण वंदिती ॥८६॥

असो जनकें दिव्य मंदिरें ॥ जानवशासी दीधलीं अपारें ॥ दोहींकडे मंडप उभविले त्वरें ॥ मंगलतूर्यें वाजती ॥८७॥

लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परम प्रतापी राजनंदन ॥ जनकरायें देखोन ॥ दशरथासी विनविलें ॥८८॥

म्हणे जानकी दिधली रघुनंदना ॥ ऊर्मिला देईन लक्ष्मणा ॥ मांडवी श्रुतकीर्ति बंधुकन्या ॥ भरतशत्रुघ्नां देईन मी ॥८९॥

दशरथासी मानला विचार ॥ देवकप्रतिष्ठा केली सत्वर ॥ चौघी कन्यांसी परिकर ॥ हरिद्रा लाविली तेधवां ॥१९०॥

सीतेची शेष हरिद्रा ॥ ते पाठविली रामचंद्रा ॥ भरत शत्रुघ्न सौमित्रा ॥ शेष आलें तैसेंचि ॥९१॥

असो यथाविधि जाहलें नाहाण ॥ नोवरे बैसले चौघेजण ॥ तों जनक वऱ्हाडी वऱ्हाडिणी घेऊन ॥ मुळ आला वरांसी ॥९२॥

शांति क्षमा दया उन्मनी ॥ सद्बुद्धि सद्विद्या कामिनी ॥ तितिक्षा मुमुक्षा विलासिनी ॥ तुर्या आणि उपरति ॥९३॥

सुलीनता समाधि सद्रति ॥ परमसदनीं ह्या मिरविती ॥ तों वऱ्हाडी पातले निश्र्चिती ॥ श्रीरामासी न्यावया आले ते ॥९४॥

बोध आनंद सद्विवेक ॥ ज्ञान वैराग्य परमार्थ देख ॥ निष्काम अक्रोध अनुताप चोख ॥ रघुनायक विलोकिती ॥९५॥

जनकें पूजोनि चौघे वर ॥ तुरंगीं बैसविले सत्वर ॥ पुढें होत वाद्यांचा गजर ॥ गगनीं सुरवर पाहती ॥९६॥

मिरवत आणिले चौघेजण ॥ मणिमय चौरंग समसमान ॥ मधुपर्कविधि वरपूजन ॥ यथासांग करी नृपनाथ ॥९७॥

रघुपतीचें पद सुंदर ॥ स्वयें प्रक्षाळी मिथिलेश्र्वर ॥ सुमेधा घाली वरी नीर ॥ कनकझारीं घेऊनियां ॥९८॥

वेदांचा निर्मिता रघुनाथ्ज्ञ ॥ त्यासी घालिती यज्ञोपवीत ॥ रायें षोडशोपचारयुक्त ॥ पूजा केली तेधवां ॥९९॥

घटिका प्रतिष्ठिली अंतरीं ॥ कौशिक सर्वांसी सावध करी ॥ म्हणे वादविवादशद्बकुसरी ॥ टाकोन झडकरीं सावध व्हावें ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP