परम निर्दय तूं पापिणी ॥ घेसी सीतेचीं वस्त्रें हिरोनी ॥ तूं जाहलीस राज्यबुडवणी ॥ रामासी वनीं धाडिसी ॥५१॥
दशरथ म्हणे ते अवसरीं ॥ गृहांतूनि नीघ जा बाहेरी ॥ तीं विकावया मांडोनि बाजारीं ॥ धगडी बैस आतांचि ॥५२॥
माझीं बाळें सुकुमार ॥ निर्दये घालिसी बाहेर ॥ मी भाकें बांधिलों साचार ॥ नाहीं तरी शिर छेदितों ॥५३॥
आडांत पडला मृगेंद्र ॥ कीं सांपळ्यांत गोंविला व्याघ्र ॥ कीं वणव्यांत सांपडला फणिवर ॥ तैसा साचार गुंतलों मी ॥५४॥
कीं गळीं सांपडला मीन ॥ कीं पराधियें कोंडिलें हरिण ॥ कीं तस्करें वाटेसीं सज्जन ॥ गोंवोनि हरिले सर्वस्वें ॥५५॥
ऐसें बोलतां नृपवर ॥ हृदयीं दाटला गहिंवर ॥ पोटासी धरून सीता सुंदर ॥ म्हणे बाळे शिणलीस ॥५६॥
सुकुमार तूं चंपककळी ॥ वातउष्णें शिणवील वेल्हाळी ॥ गुणसरिते जनकबाळी ॥ सांगसी शीण कोणातें ॥५७॥
सुमंता सांगे राजेंद्र ॥ आणा दिव्य अलंकार ॥ सीतेसी देऊनि सत्वर ॥ जगन्माता गौरवीं ॥५८॥
त्यावरी ते मंगलभगिनी ॥ मस्तक ठेवी श्र्वशुरचरणीं ॥ वसिष्ठ नमिला स्नेहेंकरूनी ॥ म्हणे कृपा बहुत असों द्या ॥५९॥
जैसा द्वितीयेचा चंद्र ॥ दिवसेंदिवस होय थोर ॥ तैसा स्वामी स्नेहादर ॥ अपार वर्धमान होऊं दे ॥१६०॥
वसिष्ठ देत आर्शीर्वचन ॥ जोंवरी मृगांक चंडकिरण ॥ तोंवरी चिंरंजीव दोघेजण ॥ अक्षयी राज्य करावें ॥६१॥
असो वसिष्ठ आणि दशरथ ॥ रामलक्ष्मण निघतां त्वरित ॥ सव्य घालूनि हात जोडित ॥ काननामाजी जावया ॥६२॥
मुनी म्हणे तूं पूर्ण सती ॥ त्रिभुवनीं वाढेल तुझी कीर्ति ॥ विजयी होईल रघुपति ॥ वनांतरीं जाऊनियां ॥६३॥
सप्तशत राजयुवती ॥ तया साष्टांग नमी रघुपती ॥ माते वाढवावी प्रीति ॥ श्रीकौसल्येसमान सर्वदा ॥६४॥
तों एकचि हाक जाहली ते वेळे ॥ सर्व माता पिटती वक्षःस्थळें ॥ एक मृत्तिका घेऊनि बळें ॥ मुखामाजी घालिती ॥६५॥
एक भूमीसीं आपटिती शिरें ॥ एक केश तोडिती निजरकरें ॥ एक हाक फोडिती एकसरें ॥ रामा राहें रे म्हणोनियां ॥६६॥
दशरथ म्हणे चापपाणी ॥ ग्रामांतून न जावें चरणीं ॥ जान्वीपर्यंत षड्गुणी ॥ माझा रथ नेईं कां ॥६७॥
अवश्य म्हणे रघुनाथ ॥ तत्काळ आणविला रथ ॥ कर जोडूनि सुमंत ॥ पुढें उभा ठाकला ॥६८॥
दशरथाचे चरणीं भाळ ॥ ठेवूनियां तमालनीळ ॥ निघाला तेव्हां तत्काळ ॥ जाहला कोल्हाळ एकचि ॥६९॥
सीता रथावरी घेऊन ॥ निघती वेगें रामलक्ष्मण ॥ तेव्हां वक्षःस्थळ बडवून ॥ दशरथरायें घेतलें ॥१७०॥
उठोनि राव दशरथ ॥ द्वाराबाहेरी धांवत ॥ लोकांस म्हणे रघुनाथ ॥ राहवा आतां लवकरी ॥७१॥
कोठें गेलें माझें पाडस ॥ कोणीकडे गेला माझा राजहंस ॥ भेटावया आणा डोळस ॥ मी वनास जाऊं नेदीं ॥७२॥
मी आपुली घालीन आण ॥ रथापुढें आडवा येऊन ॥ राघवापुढें पदर पसरून ॥ वनवासी गमन करूं नेदीं ॥७३॥
गोपुरावरी चढे दशरथ ॥ चाचरी जाय खालें पडत ॥ मागुतीं बिदोबिदीं धांवत ॥ दीन वदनें करूनियां ॥७४॥
लोकांसी पुसे दशरथ ॥ राम कोठें दावा त्वरित ॥ वाटेसी अडखळून पडत ॥ मस्तक पिटीत अवनीये ॥७५॥
लोकांसी म्हणे म्लानवदन ॥ अयोध्येसी लावारे अग्न ॥ माझा जाईल आतां प्राण ॥ दावा वदन रामाचें ॥७६॥
प्राणाविण जैसें प्रेत ॥ तैसें अयोध्यापूर दिसत ॥ तरी अग्नि लावूनि त्वरित ॥ मजसहित भस्म करा ॥७७॥
दाही दिशा दिसती उदास ॥ अयोध्या नगर जाहलें ओस ॥ राघव गेला वनवासास ॥ मुख लोकांस काय दावूं ॥७८॥
जाहलें माझें काळें वदन ॥ आतां माझा जड देह त्यागिन ॥ वायुवेगीं जाईन ॥ काननीं राम शोधावया ॥७९॥
लोकांसी म्हणे ते वेळां ॥ मज राघव दाखवा सांवळा ॥ स्त्रिया म्हणती वना गेला ॥ आज्ञा घेऊनि तुमची पैं ॥१८०॥
एक वदे वेशींत आहे रथ ॥ ऐकतां धांवे दशरथ ॥ तों दूर गेला जनकजामात ॥ ध्वजही परतून दिसेना ॥८१॥
तों आरडत कौसल्या धांवे ॥ वरतीं करूनियां बाहे ॥ म्हणे कोमलगंगा उभा राहें ॥ वदन तुझें पाहूं दे ॥८२॥
कैकयींभाक अमावास्या थोर ॥ माजी न दिसे रामचंद्र ॥ त्यावियोगें आम्ही चकोर ॥ चिताग्नींत पडलों कीं ॥८३॥
कीं कैकयीवर केतु जाण ॥ राम झांकिला चंडकिरण ॥ चतुर्दश वर्षीं मुक्तस्नान ॥ तोंवरी उपोषण पडियेलें ॥८४॥
राम माझा मेघ पूर्ण ॥ कैकयीवर दुष्ट प्रभंजन ॥ दूर गेला झडपोन ॥ जीवनाविण सुकलों आम्ही ॥८५॥
मज अंधाची काठी हिरून ॥ कोणें वनीं टाकिली नेऊन ॥ मज दरिद्रियाची गांठ पूर्ण ॥ कोणें निर्दयें सोडिली ॥८६॥
माझें दवडिलें निधान ॥ चिंतामणि दिधला भिरकावून ॥ माझा परिस नेऊन ॥ कोण्या निर्दयें भिरकाविला ॥८७॥
मज पान्हा दाटला स्तनीं ॥ माझें तान्हें दावा हो नयनीं ॥ माझा सुकुमार घोर वनीं ॥ भोजन मागेल कोणासीं ॥८८॥
गेला वल्कलें वेष्टून ॥ कैचें तया मंगलस्नान ॥ रातोत्पलाहून कोमल चरण ॥ कंटक पाषाण खुपतील ॥८९॥
आंधळें जातां वनांतरीं ॥ सांगाती टाकूनि गेला दुरी ॥ तें तळमळून शोक करी ॥ माझी परी तेंवी जाहली ॥१९०॥
कीं तान्हें टाकूनि परदेशीं ॥ माता जाय सहगमनासी ॥ तें तळमळी जेंवी परदेशी ॥ जाहलें तैसें रामाविण ॥९१॥
वनीं निघतां रविकुळमंडण ॥ दुःखें उलथती कठिण पाषाण ॥ गज तुरंग पशु पक्षी संपूर्ण ॥ तृण जीवन न घेती ॥९२॥
वना जातां जनकजामात ॥ वनीं पक्षी रुदन करित ॥ अयोध्येच्या प्रजा समस्त ॥ पाठीं धांवती रामाचे ॥९३॥
श्रीरामाचे आवडते ब्राह्मण ॥ भक्त मित्र सेवकजन ॥ चर्मक अनामिक आदिकरून ॥ कुटुंबें घेऊनि चालिले ॥९४॥
ओस पडलें अयोध्यापुर ॥ अबालवृद्ध धांवतीं समग्र ॥ म्हणती सेवूं कांतार ॥ श्रीरामचंद्रा सांगातें ॥९५॥
कैकयी चांडाळीण खरी ॥ सीतेचीं वस्त्रें भूषणें हरी ॥ तिजखालीं दुराचारी ॥ कोण येथे नांदेल ॥९६॥
दशरथ आतां देईल प्राण ॥ ओस पडेल अयोध्यापट्टण ॥ कैकयीचें शिर वपन करून ॥ छत्र धरोत कोणीही ॥९७॥
एक म्हणती हा दशरथ ॥ दग्ध जाहला याचा पुरुषार्थ ॥ कैकयीस वधून रघुनाथ ॥ कां हो राज्यीं स्थापीना ॥९८॥
स्त्रीलोभें जाहला दीन ॥ वनासी पाठविला श्रीराम निधान ॥ एक म्हणती वनासी गमन ॥ करावें हा निर्धार ॥९९॥
दूर टाकिलें अयोध्यापुर ॥ धांवती नगरजनांचे संभार ॥ माघारा पाहे रघुवीर ॥ तों लोक सत्वर धांवती ॥२००॥