राम राम करितां दशरथ ॥ जाहला रामरूप यथार्थ ॥ खुंटला शोक समस्त हेत ॥ मात सर्व राहिली ॥१॥
पाहा शरीराचें कर्म गहन ॥ चोघे पुत्र दशरथास असोन ॥ एकही जवळी नसतां सोडिला प्राण ॥ मग सुमंत प्रधान धांवला ॥२॥
तेणे उशाशी मांडी दिधली ॥ सुमित्रा कौसल्या जवळी आली ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ महाशब्दें करूनियां ॥३॥
सप्तशत राण्या सकळ ॥ दुःखें पिटिती वक्षःस्थळ ॥ हडबडलें अयोध्यापुर सकळ ॥ शोक तुंबळ लोकांतें ॥४॥
आक्रोशें कौसल्या सुमित्रा रडत ॥ रामवियोगें दुःख बहुत ॥ त्यांत मृत्यु पावला दशरथ ॥ नाहीं अंत शोकातें ॥५॥
जैसें पायास डंखिजे महाव्याळें ॥ तों मस्तकीं वृक्षिकें ताडिलें ॥ कीं वणव्यांत प्राणी सांपडले ॥ त्यावरी तोडिलें तस्करांनीं ॥६॥
आधींच बहुत धाकेंकरून ॥ त्यावरी पडती पाषाण ॥ आधींच नवज्वरें गेला व्यापून ॥ त्यांत विषपान पैं झालें ॥७॥
आधींच गृहास लागला अग्न ॥ त्यावरी साह्य जाहला प्रभंजन ॥ कीं पूरीं जातां बुडोन ॥ तों गळां पाषाण बांधिला ॥८॥
व्याघ्रभयें पळतां उठाउठी ॥ तों रिसें कंठीं घातली मिठी ॥ तैसी कौसल्येस जाहली गोष्टी ॥ लल्लाट पिटी अवनीये ॥९॥
तों तेथें पातला ब्रह्मसुत ॥ म्हणे शोक कां करितां व्यर्थ ॥ आतां वेगीं आणोन भरत ॥ राज्यीं तया स्थापावा ॥११०॥
एक राजा उभा राहिल्याविण ॥ करूं नये राजाचें दहन ॥ आणि समीप नसतां नंदन ॥ कदा अग्न देऊं नये ॥११॥
मग तैलद्रोणींत साचार ॥ घातलें दशरथाचें शरीर ॥ वसिष्ठ म्हणे सुमंता सत्वर ॥ रथ घेऊनि धांवें कां ॥१२॥
सूर्योदय होतां येथें ॥ वेगीं घेऊनि यावें भरतातें ॥ त्याचे कर्णीं वोखटें तेथें ॥ सर्वथाही सांगूं नको ॥१३॥
वनास गेला रघुनंदन ॥ अथवा दशरथें सोडिला प्राण ॥ हें गुह्य त्यासी न सांगोन ॥ वेगें घेवोन येईंजे ॥१४॥
भरत केवळ श्रीरामभक्त ॥ ही गोष्ट ऐकतां विपरीत ॥ तात्काळ देह टाकील तेथ ॥ यालागीं श्रुत न करावें ॥१५॥
भक्त विरक्त चतुर वरिष्ठ ॥ जो ज्ञानगेंगेचा निर्मळ लोट ॥ जो विवेकररत्नांचा मुकुट ॥ एकनिष्ठ सुभट जो ॥१६॥
जो वैराग्यवैरागर पूर्ण ॥ जो आनंदभूमीचें निधान ॥ जो विरक्तवल्लीचें सुमन ॥ जो समुद्र सत्याचा ॥१७॥
जो शांतिवृक्षांचें पक्वफळ ॥ जो दयेचा आगर केवळ ॥ कीं उपरतीचा निर्मळ ॥ पूर्ण कुंभ उचंबळला ॥१८॥
ऐसा सर्वगुणीं अलंकृत ॥ वेगीं घेऊन ये भरत ॥ तैसाचि निघाला सुमंत ॥ आचार्यचरण वंदूनि ॥१९॥
वायुवेगें चालिला सुमंत ॥ स्वप्न देखे मातुळीं भरत ॥ कृष्णवर्णवस्त्रवेष्टित ॥ नारी एक देखिली ॥१२०॥
तिणें घेऊनियां करीं ॥ तैल जिरवी आपुलें शिरी ॥ भरत जागा होऊनि झडकरीं ॥ रुदन करी आक्रोशें ॥२१॥
म्हणे स्वप्न नव्हे हा दिसतो अनर्थ ॥ आम्हीं चौघे बंधु आणि दशरथ ॥ पांचांमाजी जीवघात ॥ होईल एकाचा निर्धारें ॥२२॥
आणि प्राणसखा अत्यंत ॥ तो अंतरेल दूर बहुत ॥ धरणीवरी मस्तक भरत ॥ आपटी शोकें तेधवां ॥२३॥
आक्रंदोनि हाक देती ॥ केवीं दृष्टीं रघुनाथ ॥ राजाधिराज दशरथ ॥ अंतरला ऐसें वाटतें ॥२४॥
तों मातुळ संग्रामजित ॥ भरतासी स्नेहें हृदयीं धरित ॥ शत्रुघ्नासी समजावित ॥ शोक व्यर्थ कां करितां ॥२५॥
रजनी सरतां तात्काळ ॥ सिद्ध करून चतुरंग दळ अयोध्येप्रति उतावेळ ॥ नेऊन पाठवितों तुम्हांतें ॥२६॥
ऐसें बोलतां सरली रजनी ॥ भरत शत्रुघ्न उठोनी ॥ नगराबाहेर येउनी ॥ मार्ग लक्षीत अयोध्येचा ॥२७॥
ऊर्ध्व वदनेंकरूनि चकोर ॥ विलोकित जैसा चंद्र ॥ कीं चक्रवाक चिंती दिवाकर ॥ किंवा मयूर मेघातें ॥२८॥
ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित ॥ तों एकाएकीं देखिला रथ ॥ वरी प्रधान सुमंत ॥ आरूढोनि येतसे ॥२९॥
मंद मंद येत रहंवर ॥ अश्र्वांचे नेत्रीं वाहे नीर ॥ ध्वजाचें विद्युत्प्राय चीर ॥ अति मलिन दिसतसे ॥१३०॥
वरी सुमंत म्लानवदन ॥ नेत्रीं वाहत अश्रुजीवन ॥ राघव लीला आठवून ॥ क्षणांक्षणां स्फुंदतसे ॥३१॥
मागुतीं वस्त्रें नेत्र पुसित ॥ तों शत्रुघ्न आणि भरत ॥ जवळी आले धांवोनि त्वरित ॥ चिन्हें विपरीत देखोनियां ॥३२॥
सुमंतें देखतांचि भरत ॥ वेगें रथाखालीं उतरत ॥ क्षेमालिंगन दोघां देत ॥ सांगे त्वरित बोलाविलें ॥३३॥
भरत सुमंताचें वदन ॥ क्षणक्षणां पाहे विलोकून ॥ म्हणे सख्या तुझे आरक्त नयन ॥ शोक झाले दिसती पैं ॥३४॥
काय अयोध्येचें वर्तमान ॥ सुखी आहे कीं रघुनंदन ॥ श्रीदशरथ क्षेमकल्याण ॥ सुखरूप आहे कीं ॥३५॥
सुमंत म्हणे सुखी रघुनंदन ॥ तुम्हांसी बोलाविलें त्वरेंकरून ॥ मग रथीं बैसत भरतशत्रुघ्न ॥ त्वरेनें शीघ्र चालिले ॥३६॥
पुढें धुरे बैसला सुमंत ॥ घडीघडी नेत्रांसी वस्त्र लावित ॥ तेणें भरत होय सद्रदित ॥ तों पुढें देखत अयोध्या ॥३७॥
प्राणरहित जैसें शरीर ॥ तैसें दिसे अयोध्यानगर ॥ कीं जीवनेंवीण सरोवर ॥ किंवा कांतार दग्ध जैसें ॥३८॥
कीं नारी जैसी भ्रताराविण ॥ कीं जननीविण तान्हें दीन ॥ कीं नासिकावांचोनि वदन ॥ अयोध्याभुवन तेवीं दिसे ॥३९॥
राजमंदिराचे ढळले कळस ॥ मंगलवाद्यांचा नाहीं घोष ॥ घरोघरीं नारी पुरुष ॥ शोक आक्रोशें करिताती ॥१४०॥
होतें दशरथाचें प्रेत ॥ सुमंतें तेथेंचि नेला रथ ॥ छत्र भंगलें देखतां भरत ॥ रथाखालीं पडियेला ॥४१॥
दशरथाचें प्रेत देखोनी ॥ भरत तेव्हां लोळें धरणीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ शोक गगनीं न समाये ॥४२॥
शोक समुद्रीं निमग्न ॥ जाहला कैकयीनंदन ॥ भोवतें सद्रद प्रजानन ॥ दुःखेकरून बोलती ॥४३॥
मग सुमंत प्रधानें सांवरूनि ॥ भरत बैसविला उठवोनि ॥ भरत विचार करी मनीं ॥ राम नयनीं पाहीन आतां ॥४४॥
संसारमाया सांडोन ॥ दशरथ पावला स्वर्गभुवन ॥ मीं आतां राघवचरण ॥ दृढ धरीन निजभावें ॥४५॥
विलोकितां श्रीरामवदन ॥ मी शोकावेगळा होईन ॥ प्रधानासी म्हणे मज नेऊन ॥ श्रीरामचरणांवरी घालावें ॥४६॥
वडील बंधु रघुनाथ ॥ दशरथासम यथार्थ ॥ रामसदनाकडे भरत ॥ मुरडोनियां चालिला ॥४७॥
परी वनास गेला रघुनंदन ॥ हें कोणासी न बोलवे वचन ॥ एक म्हणती देईल प्राण ॥ सीतारमण न देखतां ॥४८॥
तों ओरडत कौसल्यामाय ॥ भरत धांवोनि धरी दृढ पाय ॥ माये श्रीराम कोठें आहे ॥ तो लावलाहें दावी कां ॥४९॥
तों कौसल्येसी आली मूर्च्छना ॥ बोलतां न बोलवे वचना ॥ बा रे राम गेला तपोवना ॥ मग रायें प्राण त्यजियेला ॥१५०॥