तों वृक्षच्छायेसी क्षणक्षणां ॥ ठायीं ठायीं बैसे पद्मनयना ॥ श्र्वास टाकोनि म्हणे लक्ष्मणा ॥ कांहो राहाना आजि कोठें ॥१॥
तों वृक्षातळीं सर्वसाक्षी ॥ जो चराचरचित्तपरीक्षी ॥ पद्माक्षीचा मार्ग लक्षी ॥ उभा राहूनि क्षणैक ॥२॥
पुढें शरभंगाच्या आश्रमा रघुवीर ॥ येता झाला दयासागर ॥ चहूंकडोन धांवले ऋषीश्र्वर ॥ जैसे पूर गंगेचे ॥३॥
सांडोनि समाधि तपाचरण ॥ लगबगां धांवती ब्राह्मण ॥ शरभंग निघे वेगेंकरून ॥ रामदर्शना ते काळीं ॥४॥
शरभंग महाऋषी ॥ परी गलितकुष्ठ भरला त्यासी ॥ दिव्य शरीर धरूनि भेटीसी ॥ येता झाला श्रीरामाचे ॥५॥
पहिलें शरीर झांकून ॥ घरीं ठेवी तो ब्राह्मण ॥ क्षणभरी दिव्य रूप धरून ॥ रामदर्शना पातला ॥६॥
असो देखोन ऋषीश्र्वरांचे भार ॥ साष्टांग नमित रामसौमित्र ॥ शरभंगासहित विप्र ॥ राघवेंद्रें आलिंगिले ॥७॥
शरभंगाच्या आश्रमांत ॥ राहते झाले रघुनाथ ॥ सीतासौमित्रसमवेत ॥ राम पूजिला शरभंगें ॥८॥
लक्ष्मण ऋषीतें पुसत ॥ कंथेखालीं काय कांपत ॥ शरभंग उघडोनि दावित ॥ सौमित्रातें तेधवां ॥९॥
म्हणे हें कर्मशरीर भोगिल्याविण ॥ न तुटे कदा देहबंधन ॥ राजा रंक हो साधु सज्ञान ॥ कर्म गहन सोडीना ॥११०॥
चिळस उपजली लक्ष्मणा ॥ म्हणे वर मागा जी रघुनंदना ॥ ऋषि म्हणे उष्णोदकस्नाना ॥ मज ते न मिळे सर्वथा ॥११॥
शीतोदकें स्नान नित्य ॥ तेणें शरीर हें उलत ॥ ऐसें ऐकोनि अवनिजाकांत ॥ काय बोले ऋृषीतें ॥१२॥
असो तुम्हांसी उदक होऊन ॥ प्रातःकाळीं करूं गमन ॥ तों रात्रि संपतां चंडकिरण ॥ उदयाचळीं उगवला ॥१३॥
ऋषिआज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुढें चालिला रघुनाथ ॥ ऋषिवचनाचा विसर पडत ॥ श्रीराम येत गौतमीतीरा ॥१४॥
गौतमींत करिता स्नान ॥ तों आठवलें ऋषीचें वचन ॥ मग धनुष्यासि लावून अग्निबाण ॥ सोडिला क्षण न लागतां ॥१५॥
चपळऐसा बाण आला ॥ ऋषिआश्रमापुढें कूप केला ॥ बाण प्रवेशला पाताळा ॥ कूप उचंबळला उष्णोदकें ॥१६॥
तेथें एकेचि स्नानें साचार ॥ ऋषीचें झाले दिव्य शरीर ॥ मग विमानीं बैसवूनि विप्र ॥ शक्रें नेला अमरलोका ॥१७॥
मग सुतीक्षणाच्या आश्रमाप्रति ॥ जाता झाला जनकजापती ॥ मार्गीं तापसी बहुत मिळती ॥ श्रीरामाच्या समागमें ॥१८॥
नाना प्रकारचे तापसी ॥ कित्येक ते वृक्षाग्रवासी ॥ एक वृद्ध अत्यंत वाचेसी ॥ शब्द न फुटे बोलतां ॥१९॥
एक दंतहीन बहुसाल ॥ फळें ठेंचावया कांखेसी उखळ ॥ नग्न मौनी जटाधारी सकळ ॥ दुग्धाहारी फळहारी ॥१२०॥
असो सुतीक्ष्णआश्रमासी ॥ आला शरयूतीरनिवासी ॥ मग परमानंद होत ऋषींसी ॥ रघुपतीसी भेटती ॥२१॥
तेथें क्रमोनि तीन दिन ॥ त्रिनयनहृदयजीवन ॥ त्रिभुवनपति रघुनंदन ॥ पुढें तेथोनि चालिला ॥२२॥
तों गौतमीतीर पावन ॥ पाहतां पांचाळेश्र्वर रम्य स्थान ॥ तेथें भूमींतून गायन ॥ रामचंद्रें ऐकिलें ॥२३॥
रघुत्तमातें सांगती तापसी ॥ येथें मंदकर्ण महाऋषी ॥ परम तपिया तेजोराशि ॥ जैसा आकाशीं भास्कर ॥२४॥
क्षय करावया तपातें ॥ पांच अप्सरा अमरनाथें ॥ पाठवितां ऋषी त्यांतें ॥ देखोनियां भाळला ॥२५॥
भूगर्भविवर कोरून ॥ त्यांचें सर्वदा ऐके गायन ॥ त्याकरितां उर्वींमधून ॥ ध्वनी उमटती राघवा ॥२६॥
असो ऋषि पाह ज्ञानीं ॥ श्रीराम आला कळलें मनीं ॥ मग विवरद्वार उघडोनि ॥ बाहेर आला भेटावया ॥२७॥
रामें वंदिले ऋषीचे चरण ॥ आदरें भेटले दोघेजण ॥ मग आश्रमातें नेऊन ॥ मित्रकुळभूषणा पूजिलें ॥२८॥
तेथें क्रमोनि एक रात्र ॥ पुढें चालिला मदनारिमित्र ॥ नवमेघरंग रघुवीर ॥ सुतीक्ष्णआश्रमा पावला ॥२९॥
मग अगस्तीचें दर्शन ॥ घ्यावया उदित रघुनंदन ॥ तों महाऋषि सुतीक्ष्ण ॥ पुरुषार्थ सांगे अगस्तीचा ॥१३०॥
आतापी वातापी इल्वल ॥ तिघे दैत्य परम सबळ ॥ शिववरें महाखळ ॥ कापट्य सकळ जाणती ॥३१॥
अन्नरूप होय एक ॥ दुजा निजांगें होय उदक ॥ एक अन्नदाता देख ॥ होऊनि बैसले वनांतरीं ॥३२॥
आतापी अन्नदाता पूर्ण ॥ प्रार्थूनि आणी ब्राह्मण ॥ पूजा करूनि उदकपान आदरेंसी समर्पिती ॥३३॥
मग आतापी बाहे नाम घेऊन ॥ वातापी इल्वल दोघेजण ॥ मग ते विप्राचें पोट फोडून ॥ येती धांवून बाहेरी ॥३४॥
ऐसे असंख्यात द्विजगण ॥ भक्षिलें तिहीं मारून ॥ मग कलशोद्भवासी शरण ॥ सकळ ब्राह्मण गेलें पैं ॥३५॥
मग तो महाराज घटोद्भव ॥ जयासी शरण स्वर्गींचे देव ॥ ऋषिकैवारी करुणार्णव ॥ दैत्यस्थाना पातला ॥३६॥
तंव तो धरी अगस्तीचे चरण ॥ म्हणे आश्रम करा जी पावन ॥ अन्न अथवा फळ सेवून ॥ शीतळ जीवन प्राशिजे ॥३७॥
मुखीं सदा वेदाध्ययन ॥ पाठीसी सदा धनुष्यबाण ॥ तंव आतापी ब्राह्मण ॥ कापट्यवेषें पातला ॥३८॥
शुभ्र धोत्रे यज्ञोपवीत ॥ टिळे कुशमुद्रा मिरवत ॥ धोत्रें ओलीं सरसावित ॥ क्षमा बहुत धरिलीसे ॥३९॥
लटिकाचि दावी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरलेंसे ॥१४०॥
कीं वरीच जेवीं जारिण ॥ दावी भ्रतारसेवा करून ॥ कीं शठमित्राचें लक्षण ॥ आरंभीं वचन गोड पैं ॥४१॥
कीं बचनाग मुखीं घालितां ॥ प्रथम गोड वाटे तत्वतां ॥ कीं साव चोर गांवीं असतां ॥ बहुत स्नेह वाढवी ॥४२॥
कीं विषकुंभ भरला समस्त ॥ वरी अमृत घातलें किंचित ॥ कीं दांभिक शिष्य दावित ॥ गुरुसेवा वरी वरी ॥४३॥
कुसुंब्याचा आरक्त रंग ॥ आरंभीं दावी सुरंग ॥ किंवा नटें धरिलें सोंग ॥ विरक्ताचें व्यर्थ पैं ॥४४॥
तैसा आतापी मावकर ॥ ऋषीस दावी बहुत आदर ॥ वरी शब्द रसाळ फार ॥ अंतरीं कातर दुरात्मा ॥४५॥
असो आतापी कापट्यवेषी ॥ आश्रमा नेत अगस्तीसी ॥ वातापी फळें वेगेंसीं ॥ होऊनियां बैसला ॥४६॥
अगस्तीनें भक्षिलीं फळें ॥ उदक नाहीं जों प्राशिलें ॥ तों कापट्य अवघे समजलें ॥ काय केलें कलशोद्भवें ॥४७॥
उदरावरी फिरवूनि हस्त ॥ दैत्य भस्म केला पोटांत ॥ दोघे नाम घेऊनि बाहत ॥ बाहेर त्वरित ये आतां ॥४८॥
तंव तो नेदी प्रत्युत्तर ॥ तंव दोघे रूप धरिती थोर ॥ महाविक्राळ भयंकर ॥ धांवले सत्वर ऋषीवरी ॥४९॥
धनुष्या चढवोनि गुण ॥ अगस्तीनें सोडिला बाण ॥ वातापीचें शिर छेदून ॥ नेलें उडवोनि आकाशीं ॥१५०॥