म्हणे स्वामी जप आणि ध्यान । कवणाचें करितां रात्रंदिन ॥ कोण थोर असे तुम्हांहून ॥ मजलागोनि सांगा तें ॥१॥
शिव म्हणे ऐक शुभकल्याणी ॥ सकळगुणसरिते लावण्यखाणी ॥ जो रविकुळमुकुटदिव्यमणी ॥ मी ध्यातों मनीं तयातें ॥२॥
जो राक्षसकाननवैश्र्वानर ॥ जो भक्तहृदयारविंदभ्रमर ॥ जो अज्ञानतमनाशक दिनकर ॥ जो उदार श्रीराम ॥३॥
जो त्रैलोक्यनगरस्तंभ विशाळ ॥ जो निगमवल्लीचें पक्व फळ ॥ जो जगदंकुरकंद निर्मळ ॥ तो तमाळनीळ श्रीराम ॥४॥
जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो भवगजविदारक पंचानन ॥ जो जनकजामात मखपाळण ॥ त्याचें ध्यान करितों मी ॥५॥
ऐकतां हांसिन्नलीं भवानी ॥ तो राम हिंडतो वनीं ॥ सीता सीता म्हणोनी ॥ वृक्ष पाषाण आलिंगतो ॥६॥
रावणें नेली त्याची युवती ॥ स्त्रीवियोगें भ्रंशली मति ॥ त्याचें ध्यान अहोरात्रीं ॥ तुम्ही करितां नवल हें ॥७॥
शिव म्हणे तो रघुवीर ॥ लीलावतारी निर्विकार ॥ वेद आणि भोगींद्र ॥ नेणती पार जयाचा ॥८॥
तो पूर्णब्रह्मानंद निर्गुण ॥ देवांची करावया सोडवण ॥ सगुणलीलावेष पूर्ण ॥ भक्तांलागीं दावितसे ॥९॥
विश्र्वरूप एक रघुवीर ॥ जेवीं सुवर्ण एक बहु अलंकार । कीं बहुत सदनें एक अंबर ॥ सीतावर व्यापक तैसा ॥११०॥
कीं बहुत लहरिया एक सागर ॥ लोह एक शस्त्रें अपार ॥ पट दिसती चित्र विचित्र ॥ तरी तंतु सर्व एकचि ॥११॥
बहु बिंदु एक जलधर ॥ घृत एक कणिका अपार ॥ की अनेक वाद्यांत साचार ॥ एकचि नाद दुमदुमे ॥१२॥
एक उर्वी बहुत वनस्पती ॥ एक वेद बहुत श्रुती ॥ कीं एकाच नभीं झळकती ॥ उडुगणें जैशीं अपार ॥१३॥
तैसा राम व्यापक तत्वतां ॥ मग बोले हिमनगसुता ॥ तुम्ही एवढा महिमा वर्णितां ॥ त्या रघुनाथा भुलवीन मी ॥१४॥
मग जानकीचें रूप धरुनी ॥ रामासन्मुख आली भवानी ॥ कांचनर्णी सुहास्यवदनीं ॥ पद्मनयनी सुरेख ॥१५॥
बोलतां झळकती दंतपंक्ती ॥ तें तेज न लोपे गगनक्षितीं ॥ पदरजें हिरे होती ॥ अतर्क्य गति तियेची ॥१६॥
अंगींचा मकरंद अपार ॥ त्या सुवासें तृप्त कांतार ॥ सुगंधासी वेधोनि समग्र ॥ षट्पदचके्रं धांवती ॥१७॥
विद्युत्प्राय पीतवसन ॥ सर्वांलंकारीं मंडित पूर्ण ॥ राघव तियेतें देखोन ॥ मुख मुरडोन चालिला ॥१८॥
तिकडे न पाहेचि सर्वथा ॥ तंव पुढें ये गजास्यमाता ॥ म्हणे स्वामी रघुनाथा ॥ आल्यें मी सीता पहा मज ॥१९॥
मागुती तियेसी टाकून ॥ राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥ आश्र्चर्य करी लक्ष्मण ॥ जानकी सुटोन आली कीं ॥१२०॥
मग म्हणे आत्मयारामा ॥ विषकंठहृदया पूर्णब्रह्मा ॥ जानकीलागीं पूर्ण कामा ॥ आलिंगन द्यावें जी ॥२१॥
व्याघ्राचिये कवेंतुनी ॥ पूर्वभाग्यें वांचे कुरंगिणी ॥ अयोध्यानाथा तुझी राणी ॥ आली सुटोनि तैशीचि ॥२२॥
सुरवर पाहतीं गगनीं ॥ म्हणती जानकी जवळी असोनी ॥ तिकडे न पाहे मोक्षदानी ॥ कोप मनीं धरिला कां ॥२३॥
सौमित्र म्हणे पद्मलाक्षा ॥ मनमोहना निर्विकल्पवृक्षा ॥ सीतेसी आलिंगीं सर्वसाक्षा ॥ पुरवीं अपेक्षा तियेची ॥२४॥
मग बोले रघुवीर ॥ तुम्हांस नेणवे कापट्यविचार ॥ हे अपर्णादेवी साचार ॥ ठकवाया आली आम्हां ॥२५॥
शिवासी करूनियां पण ॥ ठकवावया आली आपण ॥ तुम्हांस नेणवे हे खूण ॥ अंतज्ञानें कळेचि ॥२६॥
कैलासींच्या खुणा समस्त ॥ सौमित्रासी सांगे रघुनाथ ॥ स्कंदमाता जाहली तटस्थ ॥ म्हणे हा अजित पूर्णब्रह्म ॥२७॥
मग ते मूळपीठनायिका ॥ प्रकट रूप दावी अंबिका ॥ विश्र्वजनकाचिया जनका ॥ वर द्यावया पुढें आली ॥२८॥
श्रीराम म्हणे हो माते ॥ ज्ञानगंगे हिमनगसुते ॥ शिवआज्ञा मोडोनि येथें ॥ किमर्थ केलें आगमन ॥२९॥
ऐसें बोलून कौसल्यासुत ॥ सीते सीते म्हणोनि बाहत ॥ वृक्ष पाषाण ओ देत ॥ पाहे तटस्थ अंबिका ॥१३०॥
दुर्गा म्हणे रघुनंदना ॥ भार्गवजिता शिवमनरंजना ॥ नरवीरश्रेष्ठा आनंदसदना जगद्वंद्या जगदुरु ॥३१॥
तूं निर्विकार ज्ञानघन ॥ तरी कां आलिंगिसी वृक्षपाषाण ॥ श्रीराम म्हणे हें वर्तमान ॥ पूस जावोनि शिवातें ॥३२॥
तुझें अंतरी नाहीं विश्र्वास ॥ नेणसी अध्यात्मज्ञान लेश ॥ मी कां आलिंगितों वृक्षांस ॥ परमपुरुष शिव जाणे ॥३३॥
मग अंबिका बोले वचन ॥ तुम्ही एकरूप दोघेजण ॥ एक एकाची अंतरखूण ॥ परस्परें जाणतसां ॥३४॥
आकाशाचें थोरपण ॥ एकचि जाणे प्रभंजन ॥ कीं समीराचें सर्वत्र गमन ॥ अंबर पूर्ण जाणतसे ॥३५॥
सर्व सोडून अभिमान ॥ विरंचिजनका तुज मी शरण ॥ कां आलिंगितां वृक्षपाषाण ॥ सांगा खूण एवढी ॥३६॥
मग अपणेंचे हृदयीं पूर्ण ॥ रामें प्रगटविलें दिव्यज्ञान ॥ म्हणे आतां वृक्षपाषाण ॥ पाहें निरखोनि कोण हे ॥३७॥
सावध पाहे भवानी ॥ तों ते महाऋषि बैसले ध्यानीं ॥ श्रीराम त्यांसी आलिंगोनी ॥ कैवल्यपदा पाववी ॥३८॥
सीतेचें करूनि मिस ॥ रामें उद्धरिले तापस ॥ मग म्हणे हा पुराणपुरुष ॥ लीलावेष दावितसे ॥३९॥
असो अंबिकेचें पूजन ॥ स्वयें करी रविकुलभूषण ॥ मग देवीनें वरदान ॥ रघुवीरास दीधलें ॥१४०॥
म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ तूं सत्वर वधिशील दशानना ॥ जानकी घेऊनि निजसदना ॥ अयोध्येपाशीं येशील ॥४१॥
अहो तेचि हे रामवरदायिनी ॥ अंबा तुळजापुरवासिनी ॥ रघुनाथ पुढें चालिला तेथुनी ॥ दक्षिणपंथें शोधित ॥४२॥
तों पुढें देखिली कृष्णावेणी ॥ दोष नुरे तिच्या स्मरणीं ॥ तिचे तटीं कोदंडपाणी ॥ क्षण एक बैसला ॥४३॥
स्नान करावया रघुनंदन ॥ कृष्णेंत प्रवेशला जगन्मोहन ॥ देखोन सखोल जीवन ॥ जगज्जीवन बुडी देत ॥४४॥
विष्णुतनु कृष्णा साचार ॥ देखोनियां राजीवनेत्र ॥ क्षणें उदकमय जाहलें शरीर ॥ कडे सौमित्र पाहतसे ॥४५॥
तनु जाहली उदकमय ॥ तंव सौमित्र तेथें घाबरा होय ॥ घटका एक वाट पाहे ॥ म्हणे काय करूं आतां ॥४६॥
काय जाहली मूर्ति सांवळी ॥ कोठें गेली अनाथाची माउली ॥ श्रीरामा तूं जगाची साउली ॥ माझी केली कां उपेक्षा ॥४७॥
सौमित्रें अंग घातलें धरणीं ॥ म्हणे रामा धांव ये क्षणीं ॥ तूं माझी जनकजननी ॥ वनीं मज सांडिलें कीं ॥४८॥
राघवा मग उबगलासी ॥ सांडिलें मज घोरवनासी ॥ मी आतां त्यागीन प्राणासी ॥ निश्र्चयेसी राघवेंद्रा ॥४९॥
जानकीमाता उबगली ॥ तीही मज टाकोन गेली ॥ रघुपति तुझी आशा धरिली ॥ तुवां कली उपेक्षा ॥१५०॥