जानेवारी १९ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे, असे पुष्कळ लोक विचारतात. हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुखदु:ख आहे, किंबहुना, देह सुखी तर मी सुखी, आणि देह दु:खी तर मी दु:खी, अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे, प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे? इथे असे लक्षात ठेवावे की, प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते; म्हणून, ज्याची देहबुध्दी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुध्दी कमी होते. म्हणून, नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा, राजा आहे.

आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लाभते, आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. खरोखर, किती प्रकारांनी तुम्हांला मी सांगू ! अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझे एवढे ऐका; नामाला कदापिही विसरु नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता, भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना, पण केव्हाही त्याच्या नामाला विसरु नका. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुध्दी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुध्दी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने, त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून, आणि आपण त्याहून निराळे राहून, जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP