श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जय जय सुभद्रकारक भवानी ॥ मूळपीठ अयोध्यावासिनी ॥ आदिमायेची कुळस्वामिनी ॥ प्रणवरूपिणी रघुनाथे ॥१॥
नारद व्यास वाल्मीक ॥ विरिंची अमरेंद्र सनकादिक ॥ वेदशास्त्रें सुहस्रमुख ॥ कीर्ति गाती अंबे तुझी ॥२॥
सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ बिभीषण अंगद हनुमंत ॥ तेही दिवटे नाचती समस्त ॥ प्रतापदीपिका घेऊनियां ॥३॥
अठरा पद्में वानरगण ॥ त्या भूतावळिया संगे घेऊन ॥ सुवेळाचळीं येऊन ॥ गोंधळ मांडिला स्वानंदें ॥४॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वळतां प्रचंड ॥ राक्षस बस्त उदंड ॥ आहुतीमाजी पडताती ॥५॥
देवांतक नरांतक महोदर ॥ प्रहस्त अतिकाय घटश्रोत्र ॥ इंद्रजित आणि दशवक्र ॥ आहुति समग्र देती ह्या ॥६॥
निजदास दिवटा बिभीषण ॥ अक्षयी लंकेसी स्थापून ॥ निजभक्ति जानकी घेऊन ॥ मूळपीठ अयोध्येसी जासील ॥७॥
हनुमंता दिवटा तुझा बळी ॥ बळें पुच्छपोत पाजळी ॥ क्षणांत लंका जाळिली ॥ केली होळी बहुसाल ॥८॥
ऐसे तुझे दिवटे अपार ॥ त्यांमाजी दासानुदास श्रीधर ॥ तेणें राजविजयदीपिका परिकर ॥ पाजळिली यथामति ॥९॥
बाळ भोळे भक्त अज्ञान ॥ प्रपंचरजनींत पडिले जाण ॥ त्यांस हे ग्रंथदीपिका पाजळून ॥ मार्ग सुगम दाविला ॥१०॥
असो पूर्वाध्यायीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें नागपाश घालून ॥ आकळिले मग वायुदेवें येऊन ॥ सावध केले सवेंच ॥११॥
यावरी तो रणरंगधीर ॥ प्रतापार्क श्रीरघुवीर ॥ धनुष्य सजोनि सत्वर ॥ वाट पाहे शत्रूची ॥१२॥
तों कोट्यनुकोटी वानरगण ॥ सिंहनादें गर्जती पूर्ण ॥ तेणें लंकेचे पिशिताशन ॥ गजबजिले भयेंचि ॥१३॥
निर्मळ देखोनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळला वानरसमुद्र ॥ भरतें लोटलें अपार ॥ लंकादुर्गपर्यंत पैं ॥१४॥
उचलोनि पाषाण पर्वत ॥ कपि भिरकाविती लंकेत ॥ राक्षसांची मंदिरें मोडित ॥ प्रळय बहुत वर्तला ॥१५॥
रावणासी सांगती समाचार ॥ दुर्गासी झगटले वानर ॥ रणीं उभे रामसौमित्र ॥ शशिमित्र जयापरी ॥१६॥
प्रहस्तासी म्हणे लंकानाथ ॥ पुत्रें शत्रुवन जाळिलें समस्त ॥ पुनरपि अंकुर तेथ ॥ पूर्ववत फुटले पैं ॥१७॥
बीज भाजून दग्ध केले ॥ तें पुनरपि अंकुरलें ॥ मृत्यूनें गिळून उगळिलें ॥ अघटित घडलें प्रहस्ता ॥१८॥
मग तो प्रधान प्रहस्त ॥ तोचि सेनापति प्रतापवंत ॥ रावणासी आज्ञा मागत ॥ शत्रु समस्त आटीन वाणी ॥१९॥
कायसे ते नर वानर ॥ माझे केवीं साहाती शर ॥ ऐसें ऐकतां विंशतिनेत्र ॥ परम संतोष पावला ॥२०॥
उत्तम वस्त्रें भूषणें ॥ प्रहस्तासीं दिधली रावणें ॥ तयासी गौरवून म्हणे ॥ विजयी होईं रणांगणीं ॥२१॥
स्वामी गौरवी स्वमुखेंकरून ॥ धन्य धन्य तोचि दिन ॥ असो वीस अक्षौहिणी दळ घेऊन ॥ प्रहस्त प्रधान निघाला ॥२२॥
चतुरंग सेनासमुद्र ॥ उत्तर द्वारें लोटला समग्र ॥ तंव अद्भुत सुटला समीर ॥ धुळीनें नेत्र दाटले ॥२३॥
प्रहस्तरथींचा ध्वज उन्मळला ॥ शोणितचर्चित भुज खंडला ॥ प्रहस्तापुढें आणूनि टाकिला ॥ निराळपंथे पक्ष्यांनीं ॥२४॥
मनांत दचकला प्रहस्त ॥ परी वीरश्रीनें वेष्टीत ॥ अपशकुनांची खंत ॥ टाकूनियां चालिला ॥२५॥
दृष्टीं देखोनि राक्षसभार ॥ सिंहनादें गर्जती वानर ॥ तेणें स्वर्गींचे हुडे समग्र ॥ येऊं पाहती धरणीये ॥२६॥
दोनी दळें एकवटलीं ॥ संग्रामाची झड लागली ॥ शस्त्रास्त्रें तये काळीं ॥ यामिनीचर वर्षती ॥२७॥
क्षणप्रभा नाभोमंडळीं ॥ तेवीं असिलता झळकती ते काळीं ॥ गदापाशशक्तिशूळीं ॥ खोंचती बळें कपीतें ॥२८॥
साहून वानरांचा मार ॥ कपिसेनेवरी अपार ॥ पिशिताशन अनिवार येऊनियां कोसळती ॥२९॥
तंव ते प्रतापमित्र हरिगण ॥ पर्वत आणि वृक्ष पाषाण ॥ बळें देती भिरकावून ॥ होती चूर्ण रजनीचर ॥३०॥
जैसा अग्नि लागे पर्वतीं ॥ त्यावरी पतंग असंख्य झेंपावती ॥ तैसें राक्षस मिसळती वानरचमूंत येउनी ॥३१॥
वानर चतुर रणपंडित ॥ निशाचर आटिले बहुत ॥ मग तो सेनापति प्रहस्त ॥ रथ लोटी वायुवेगें ॥३२॥
जैसी पर्वतीं वीज पडत ॥ तैसा कपींत आला अकस्मात ॥ बाण सोडिले अद्भुत ॥ नाहीं गणित तयांसी ॥३३॥
तंव तो बिभीषण लंकापती ॥ बोलता झाला रामाप्रति ॥ म्हणें प्रहस्त सेनापती ॥ मुख्य पट्टप्रधान रावणाचा ॥३४॥
तरी यासी सेनापति नीळ ॥ प्रतियोद्धा धाडावा सबळ ॥ तों इकडे प्रहस्तें वानरदळ ॥ बहुत आटिले ते काळीं ॥३५॥
अनिवार प्रहस्ताचा मार ॥ साहों न शकती वानर ॥ महायोद्धे समरधीर ॥ माघारले ते काळीं ॥३६॥
दृष्टीं देखोनि रघुनाथ ॥ प्रहस्तें बळें लोटिला रथ ॥ ऐसें देखोनि जनकजामात ॥ घालीत हस्त चापासी ॥३७॥
क्षण न लागतां चढविला गुण ॥ तों रामापुढें नीळ येऊन ॥ विनवीतसे कर जोडून ॥ वानरगण ऐकती ॥३८॥
म्हणे जगद्वंद्या जगदुःखहरणा ॥ जनकजापते जगन्मोहना ॥ मायाचक्रचाळका निरंजना ॥ मज आज्ञा दईंजे ॥३९॥
न लागतां एक क्षण ॥ प्रहस्ताचा घेईन प्राण ॥ अवश्य म्हणे सीतारमण ॥ विजयी होऊन येईं पां ॥४०॥
घेऊनियां महापर्वत ॥ नीळ धांवे अकस्मात ॥ जैसा पाखंडियासी पंडित ॥ सरसावला बोलावया ॥४१॥
प्रहस्तासी म्हणे नीळवीर ॥ तुम्ही म्हणवितां झुंझार ॥ शस्त्रें जवळी रक्षितां अपार ॥ मिथ्यावेष कासया ॥४२॥
बाह्यवृत्ति व्याघ्राची असे ॥ अंतरीं जंबुका भीतसे ॥ जेवी नट विरक्ताचें सोंग घेतसे ॥ परी अंतरीं त्याग नोहे ॥४३॥
वरी वैराग्य मिथ्या दावित ॥ परी मनीं तृष्णा वाढवित ॥ जैसें वृंदावन भासत ॥ रेखांकित उत्तम वरी ॥४४॥
तैसा तूं सेनापति प्रहस्त ॥ मृत्युनें तुज आणिलें येथ ॥ तुझे पितृगण समस्त ॥ काय करिती यमपुरीं ॥४५॥
त्यांचा यमपुरीं ॥४५॥ त्यांचा समाचार घ्यावयासी ॥ तुज पाठवितों यमपुरीसी ॥ आतां परतोन लंकेसी ॥ कैसा जासील पाहें पां ॥४६॥
शतमूर्ख दशमुख तत्वतां ॥ पद्मजातजनकाची कांता ॥ ती आणूनियां वृथा ॥ कुलक्षय केला रे ॥४७॥
प्रहस्त म्हणे मर्कटा नीळा ॥ तुज मुत्युकाळीं फांटा फुटला ॥ ऐसे बोलून लाविला ॥ बाण चापासी प्रहस्तें ॥४८॥
नीळें हस्तींचा पर्वत ॥ प्रहस्तावरी टाकिला अकस्मात ॥ तेणें बाण सोडिले अद्भुत ॥ अचळ फोडिला क्षणार्धें ॥४९॥
सवेंच दुसरा शैल सबळ ॥ प्रहस्तावरी टाकी नीळ ॥ तेणें फोडूनि तत्काळ ॥ पिष्टवत् पै केला ॥५०॥