अध्याय सत्तावीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .

 


तुझें नासिक आणि कर्ण ॥ क्षण न लागतां छेदीन ॥ विमानीं वृंदारकगण ॥ जेणेंकरून तोषती ॥१॥

तुझा अग्रज दशकंधर ॥ पंचवटीस येऊनि तस्कर ॥ जानकी चिद्रत्न सुंदर ॥ घेऊनि आला चोरूनियां ॥२॥

तरी तस्करातें दंड हाचि पूर्ण ॥ छेदावें नासिक आणि कर्ण ॥ तूं रावणानुज कुंभकर्ण ॥ शिक्षा लावीन तुज आतां ॥३॥

कुंभकर्ण म्हणे सुग्रीवासी ॥ मशक आगळें बहुत बोलसी ॥ जैसा पतंग वडवानळासी ॥ विझवावया धांवत ॥४॥

मशक जाहलें क्रोधायमान ॥ म्हणे सगळा पर्वत गिळिन ॥ वृश्चिक स्वपुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥५॥

ऊर्णनाळाींचा उदरतंतु ॥ तेणें केवीं बांधिजे ऐरावतु ॥ सूर्यमंडळ धगधगितु ॥ खद्योत केवी गिळिल पां ॥६॥

तैसा तूं बळहीन वानर ॥ रागें आलासी मजसामोर ॥ मत्कुणप्राय शरीर ॥ चूर्ण करीन तुझें आतां ॥७॥

ऐसें बोलतां रावणानुज ॥ पर्वत घेऊनि धांवे अर्कज ॥ कुंभकर्णाचे हृदयीं सहज ॥ येऊनियां आदळला ॥८॥

पर्वत गेला चूर्ण होऊन ॥ क्रोधें धांवे कुंभकर्ण ॥ सुग्रावासी चरणीं धरून ॥ भोवंडिला गरगरां ॥९॥

पृथ्वीवरी आपटूं पाहत ॥ तों प्रतापी सूर्यसुत ॥ पिळूनि कुंभकर्णाचा हात ॥ ऊर्ध्वपंथे उडाला ॥११०॥

ग्रहमंडळपर्यंत ॥ उडोन गेला कपिनाथ ॥ त्याहून कुंभकर्णाचा हात ॥ उंचावला तेकाळीं ॥११॥

मागुती वानेश्वर धरिला ॥ बळेंच कक्षेंत दाटिला ॥ कक्षेमाजी गुंडाळला ॥ कंटाळला दुर्गंधीनें ॥१२॥

म्हणे वाळीनें रावण ॥ कक्षेंत घालोनि केलें स्नान ॥ तो सूड आजि घेतला जाण ॥ टाकीन रगडोनि मर्कटा ॥१३॥

जयवाद्यांचा गजर ॥। होता जाहला पैं अपार ॥ रणीं आजि साधिला वानेश्वर ॥ मग घटश्रोत्र परतला ॥१४॥

संसारजाळें परम थोर ॥ त्यांत गुंतला साधक नर ॥ तो पळावया पाहे बाहेर ॥ तेवीं वानरेश्वर निघों इच्छी ॥१५॥

दुर्गंधींत पडिलें मुक्ताफळ ॥ कीं पंकगर्तेत मराळ ॥ कीं ब्राह्मणश्रोत्री निर्मळ ॥ हिंसकगृहीं कोंडिला ॥१६॥

असो मस्त जाहला कुंभकर्ण ॥ नसे तया देहस्मरण ॥ तों कक्षेंतून सूर्यनंदन ॥ न लागतां क्षण निसटला ॥१७॥

नेत्रपातें जंव हेलावत ॥ इतुक्यांत साधिलें कृत्य ॥ कुंभकर्णस्कंधी उभा ठाकत ॥ तारानाथ तेधवां ॥१८॥

दोनी विशाळ कर्ण ते वेळे ॥ दोनी करी दृढ धरिले ॥ दंतसंधीत सांपडविलें ॥ नासिक कुंभकर्णाचें ॥१९॥

कर्ण नासिक उपडोनि ॥ सुग्रीव उडाला गगनीं ॥ रामचरणांवरी येऊनि ॥ मस्तक ठेवी सप्रेम ॥१२०॥

एकचि जाहला जयजयकार ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥ यशस्वी जाहला सूर्यकुमर ॥ आलिंगी रघुवीर तयातें ॥२१॥

घ्राण कर्ण नेले सूर्यसुतें ॥ परी शुद्धि नाहीं कुंभकर्णातें ॥ वर्तमान कळलें रावणातें ॥ घटश्रोत्रातें विटंबिलें ॥२२॥

परम चिंताक्रांत रावण ॥ नापिक दीधला पाठवून ॥ गगनचुंबित वंश घेऊन ॥ तयासी दर्पण बांधिला ॥२३॥

सप्तखणी महाद्वार देख ॥ त्यावरी उभा ठाके नापिक ॥ कुंभकर्णाचें सन्मुख ॥ आदर्श तेव्हां दाखविला ॥२४॥

छेदोनि नेले नासिक कर्ण ॥ दर्पणीं देखे कुंभकर्ण ॥ सुग्रीव गेला कक्षेंतून ॥ झाले स्मरण ते काळीं ॥२५॥

जैसा किंशुकीं फुलला पर्वत ॥ तैसा कुंभकर्ण दिसे आरक्त ॥ परम विटला मनांत ॥ स्वरूप आपुलें देखतां ॥२६॥

मनांत म्हणे कुंभकर्ण ॥ आतां व्यर्थ काय वांचून ॥ दशग्रीवास परतोन ॥ काय हें वदन दाखवूं ॥२७॥

कपींसहित रामलक्ष्मण ॥ गिळीन रणीं न लागतां क्षण पृथ्वी पालथी घालीन ॥ निर्दाळीन देव सर्व ॥२८॥

कुंभकर्ण परतला दळीं ॥ दांते रगडी अधपाळीं ॥ कृतांतवत हांक दीधली ॥ डळमळली उर्वी तेव्हां ॥२९॥

परतला देखोनि कुंभकर्ण ॥ पळों लागले वानरगण ॥ आले रघुपतीस शरण ॥ रक्षीं रक्षीं म्हणूनियां ॥१३०॥

दृष्टीं लक्षूनि राघव ॥ कुंभकर्णे घेतली धांव ॥ तंव तो सौमित्र बलार्णव ॥ पाचारीत तयातें ॥३१॥

म्हणे उभा राहें एक क्षण ॥ पाहें माझें शरसंधान ॥ परी तो न मानी कुंभकर्ण ॥ रामाकडे धांविन्नला ॥३२॥

परम कोपें सुमित्राकुमर ॥ कुंभकर्णावरी टाकी सप्त शर ॥ ते सपक्ष बुडाले समग्र ॥ मध्येंच गुप्त जाहले ॥३३॥

सौमित्रें टाकिले बहुत बाण ॥ परी ते न मानी कुंभकर्ण ॥ जेवीं पर्वतावरी पुष्पें येऊन ॥ पडतां आसन न चळेचि ॥३४॥

पंडितवचनें रसाळीं ॥ पाखांडी न मानी कदाकाळी ॥ तैसा कुंभकर्ण ते वेळीं ॥ न गणी शर सौमित्रांचे ॥३५॥

तों गदा घेऊनि बिभीषण ॥ बंधूवरी आला धांवोन ॥ म्हणे निर्नासिका एक क्षण ॥ मजसीं आतां युद्ध करी ॥३६॥

म्या पूर्वी बोधिला दशवक्र ॥ परी त्यासी झोंबला कामविखार ॥ तेणें भुलला तो समग्र ॥ शुद्धि अणुमात्र नसेचि ॥३७॥

गोड वचनें कडू वाटती ॥ कडू तें गोड वाटे चित्तीं ॥ एश्वर्यमद झेंडू निश्चितीं ॥ कंठी दाटला तयाचे ॥३८॥

रावणदुष्कृतवल्लीचीं फळें ॥ तुम्हांस प्राप्त जाहली शीघ्रकाळें ॥ त्याचे प्रत्युत्तर ते वेळे ॥ कुंभकर्ण ते देतसे ॥३९॥

म्हणे बिभीषणा शतमूर्खा ॥ हांससी माझ्या कर्णनासिका ॥ मी कोण हें तुज देखा ॥ नाही कळलें अद्यापि ॥१४०॥

कुळक्षयास कारण ॥ तूं मिळालास इकडे येऊन ॥ मजपुढें दावूं नको वदन ॥ क्षणें प्राण घेईन तुझा ॥४१॥

राक्षससिंहांमाजी देख ॥ तूं एक जन्मलासी जंबुक ॥ कपटिया न दाखवीं मुख ॥ कुळवना पावक तूं ॥४२॥

तुझीं शतखंडें करितों ये वेळीं ॥ परी आम्हासी द्यावया तिळांजळी ॥ तुज रक्षिलें ये काळीं ॥ कुलोत्पत्तीकारणें ॥४३॥

होई माघारा वेगेंसी ॥ निघे रामाचे पाठीसी ॥ आजि कपिसेना निश्चयेसी ॥ मी ग्रासीन क्षणार्धें ॥४४॥

ऐकूनि बंधूचें वचन ॥ माघारला बिभीषण ॥ पुढें रामावरी कुंभकर्ण ॥ मुद्रर घेऊनि धांविन्नला ॥४५॥

श्रीराम म्हणे कुंभकर्णा ॥ आजि तूं पात्र जाहलासी माझिया बाणा ॥ तुम्ही पीडिलें त्रिभुवना ॥ जाणोनि ऐसें अवतरलो ॥४६॥

तुवां जे गिळिले वानरगण ॥ ते पोट फोडोनि बाहेर काढीन ॥ तुझें जवळीं आले मरण ॥ पाहें सावधान मजकडे ॥४७॥

ऐसें बोलोनि दिनकर कुळदीप ॥ क्षण न लागतां चढवी चाप ॥ जो आदिपुरुष त्याचा प्रताप ॥ न वर्णवेचि वेदशास्त्रां ॥४८॥

रणरंगधीर रघुवीर ॥ उभा राहिला कुंभकर्णासमोर ॥ कीं निशा संपतां दिनकर ॥ उदयाचळीं विराजे ॥४९॥

म्हणे मृत्युपुरीस राहें जाऊन ॥ सवेंच पाठवितों रावण ॥ लंकेस स्थापिला बिभीषण ॥ चंद्रार्क भ्रमती गगनीं जों ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP