अध्याय तीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥

जो पद्मिनीवल्लभकुलभुषण ॥ जो पद्मजातजनक पद्मलोजन ॥ विषकंठहृदय दशकंठदलन ॥ सच्चिदानंदतनु जो ॥१॥

जो रघुकुलकमलदिवाकर ॥ अजित भ्रांतिविपिनवैश्वानर ॥ जो भक्तहृदयाब्जभ्रमर ॥ लीलावतार धरी जो ॥२॥

जो षड्गुणैश्वर्यसंपन्न ॥ यश श्री कीर्ति विज्ञान ॥ जो औदार्यवैराग्यपरिपूर्ण ॥ सत्यज्ञान शाश्वत जो ॥३॥

जो कां निर्विकल्प अनंत ॥ हेतुदृष्टांत विवर्जित ॥ तो सुवेळाचळीं रघुनाथ ॥ राक्षसवधार्थ पातला ॥४॥

जो भवगजविदारक मृगनायक ॥ मोक्षफळाचा परिपाक ॥ तो राम ताटिकांतक ॥ सुरपाळ जगद्रुरु ॥५॥

गतकथाध्यायीं निरूपण ॥ गुणसिंधूचा बंधु लक्ष्मण ॥ इंद्रजिताचा वध करून ॥ शिर घेऊन पैं गेला ॥६॥

शरीराचे प्राक्तन विचित्र ॥ ऋषभें सुवेळेसी नेलें शिर ॥ धड रणीं भुजा सत्वर ॥ लंकेवरी पडियेली ॥७॥

भुजा आपटोनि मागुती उडत ॥ जैसा कंदुक आदळोनि उसळत ॥ तैसा भुजदंड अकस्मात ॥ निकुंभिलेंत पडियेला ॥८॥

सुलोचनेचे आंगणीं ॥ भुजदंड पडिला ते क्षणीं ॥ तों रावणस्नुषा अंतरसदनीं ॥ सुखरूप बैसली असे ॥९॥

ते दशशतवदनाची कुमरी ॥ कीं लावण्यसागरींची लहरी ॥ ज्येष्ठ स्नुषा निर्धारीं ॥ राघवारीची ती होय ॥१०॥

जे नगारिशत्रूची राणी ॥ यामिनाचरांची स्वामिणी ॥ जिचें स्वरूपलावण्य देखोनी ॥ सुरांगना होती लज्जित ॥११॥

देवगणगंधर्वराजकुमरी ॥ सेवा करिती अहोरात्री । सहस्रनेत्राची अंतुरी ॥ न पवे सरी जियेची ॥१२॥

आंगींचा सुवास अद्भुत ॥ धांवे एक कोशपर्यंत ॥ विषकंठरिपूची कांता यथार्थ ॥ तुळितां न पुरे इयेसीं ॥१३॥

नैषधजाया परम सुंदर ॥ वर्णिती काव्यकर्ते चतुर ॥ परी शेषकन्येसी साचार ॥ उपमा द्यावया पुरेना ॥१४॥

आंगींच्या प्रभेने भूषणें ॥ झळकती अत्यंत दिव्य रत्नें ॥ किन्नरकन्या गायनें ॥ मधुरस्वरें जवळ करिती ॥१५॥

एक शृंगार सांवरिती ॥ एक चामरें घेऊनि वारिती ॥ एक उपभोग आणोनि देती ॥ संतोषविती नानाशब्दें ॥१६॥

सुलोचनेचे आनंदु ॥ तों अमृतीं पडे विषबिंदु ॥ तैसा तो भुज सुबुद्धु ॥ अंगणीं येऊन पडियेला ॥१७॥

भुज पडतांचि ये धरणी ॥ दणाणिली तये क्षणीं ॥ दूती कित्येक धांवूनी ॥ पहावया बाहेर आल्या ॥१८॥

ते पाचबंध अंगणांत ॥ वीरपाणि पडिला अद्भुत ॥ देखोनि दासी भयभीत ॥ आल्या शंकित सांगावया ॥१९॥

म्हणती नवल वर्तलें वो साजणी ॥ महावीराचा तुटोनि पाणी ॥ येऊन पडिलासे अंगणीं ॥ निराळमार्गें अकस्मात ॥२०॥

ऐकोनि दासींचे वचन ॥ दचकलें सुलोचनेंचें मन ॥ रत्नपादुका त्वरेंकरून ॥ अंध्रियुगुळीं लेइल्या ॥२१॥

तडित्प्राय झळके अंबर ॥ आंगणांत आली सत्वर ॥ उतरला तेव्हां मुखचंद्र ॥ विव्हळनेत्र जाहले ॥२२॥

अंग जाहलेसें विकळ ॥ पुढें न घालवेचि पाऊल ॥ वदनींचें काढोनि तांबूल ॥ एकीकडे भिरकाविलें ॥२३॥

सखियांसी म्हणे सुलोचना ॥ प्राणपति आज गेले रणा ॥ सीतेलागीं अयोध्याराणा ॥ सुवेळाचळीं बैसला ॥२४॥

ऐसें बोलतां शेषनंदिनी ॥ भुजेसमीप येतां ते क्षणीं ॥ तंव ते शक्रजिताचा पाणी ॥ पतिव्रतेनें ओळखिला ॥२५॥

पंचांगुळीं मुद्रिका मंडित ॥ वीरकंकणें दिव्य विराजित ॥ दंडीं कीर्तिमुखें झळकत ॥ चपळेहूनि विशेष पै ॥२६॥

आजि माझें जहाज बुडालें ॥ म्हणोनि वदन हातीं पिटिलें ॥ परम आंकंत ते वेळे ॥ वाटे बुडाले ब्रह्मांड ॥२७॥

सुमनकळिकेवरी सौदामिनी ॥ पडतां उरी न उरे ते क्षणीं ॥ तैसी निस्तेज होउनी ॥ भोगींद्रनंदिनी पडियेली ॥२८॥

लोभियाचे गेलें धन ॥ कीं जळचरें जीवनावांचून ॥ तैसी पतिवियोगेंकरून ॥ सुलोचना तळमळे ॥२९॥

म्हणे विपरीत काळाची गती ॥ मृगाजळी बुडाला अगस्ती ॥ दीपतेजें रोहिणीपती ॥ आहाळोनि खालीं पडियेला ॥३०॥

तमकूपीं बुडाला तरणी ॥ पाडसें सिंह धरिला वनी ॥ पिपीलिकेनें मुखी घालोनि ॥ मेरु कैसा रगडिला ॥३१॥

अळिकेनें गिळिला सुपर्ण ॥ मशकीं ग्रासिला महाअग्न ॥ भूतांनीं काळ धरून ॥ समरांगणीं मारिला ॥३२॥

मग सुलोचनेसी उचलोनी ॥ सखिया बैसविती सांवरूनी ॥ पतीची भुजा हृदयीं धरूनी ॥ आक्रंदत सुलोचना ॥३३॥

मग भुजेप्रति बोले वचन ॥ कैसें प्राणपतीस आलें मरण ॥ तरी तें सर्व वर्तमान ॥ लिहून मज विदित करीं ॥३४॥

पतिचरणीं माझें मन ॥ जरी असेल रात्रंदिन ॥ तरीच पत्रीं लिहून ॥ वर्तमान दृश्य करीं ॥३५॥

हाटकरसपात्र पुढें ठेविलें ॥ भूर्जपत्र उकलोनि पसरिलें ॥ लेखनी हाती देतां शीघ्रकाळें ॥ भुजेनें लिहिलें ते समयीं ॥३६॥

नवल अद्भुत वर्तलें ॥ सर्व वर्तमान पत्रीं लिहिलें ॥ सुलोचनेनें पत्र घेतलें ॥ मस्तकीं वंदिलें ते वेळे ॥३७॥

नयनीं लोटले अश्रुपात ॥ शेषकन्या पत्र वाचित ॥ भोंवत्या ललना समस्त ॥ ऐकती निवांत ते काळीं ॥३८॥

ऐकें दशशतमुखकन्यके ॥ सुकुमारे चंपककलिके ॥ मम मानससरोवरमरालिके ॥ प्राणवल्लभे सुलोचने ॥३९॥

जयआशा अंतरीं धरून ॥ गूढस्थळीं करितां हवन ॥ अग्नींतून दिव्य स्यंदन ॥ निघाला पूर्ण राजसे ॥४०॥

फळप्राप्तीचा समय लक्षून ॥ शत्रू आलें तेथें धांवून ॥ चंउ शिळा वरी घालोन ॥ आराध्यदैवत क्षोभविलें ॥४१॥

पर्वत चढला संपूर्ण ॥ शिखरीहून दिधला ढकलून ॥ कीं नदी अवघी उतरून ॥ तीरासमीप बुडाला ॥४२॥

प्रगटतां वैराग्यज्ञान ॥ वरी विषयघाला पडे येऊन ॥ कीं प्राप्त होतां निधान ॥ विवसी येऊनि वरी पडे ॥४३॥

कष्टें करितां वेदाध्ययन ॥ वरी धाड घाली अभिमान ॥ सूर्य सर्व अंबर क्रमून ॥ राहुमुखीं सांपडें जेवीं ॥४४॥

वल्लभे तैसेंच येथे जाहलें ॥ शत्रूंनीं शेवटी वैर साधिलें ॥ प्रारब्धबळ उणें पडलें ॥ होणार न टळे कल्पांतीं ॥४५॥

पुढें दारुण संग्राम मांडिला ॥ परी जय आम्हांस पारखा जाहला ॥ जाऊनि सौमित्रासी मिळाला ॥ शत्रूचा वाढला पराक्रम ॥४६॥

सौमित्र परम निधडा वीर ॥ धनुर्विद्या त्याची अपार ॥ देखोनि उचित दिधलें शिर ॥ राम मित्र जोडिला ॥४७॥

देहआशा जीवीं धरून ॥ भयें शरण गेला बिभीषण ॥ म्यां देहत्रय निरसून ॥ विदेहजामात मित्र केला ॥४८॥

सौमित्र तपस्वी पूर्ण पवित्र ॥ बहुत दिवस निराहार ॥ उतरूनियां सिंधु समग्र ॥ मागावया शिर पातला ॥४९॥

मग मी कृपणता टाकून ॥ निजशिराचें केले दान ॥ तेणें रामचरणीं नेऊन ॥ शिर माझे समर्पिलें ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP