अध्याय चवतीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥

जयजय जगद्वंद्या वेदसारा ॥ प्रणवरूपा विश्वंभरा ॥ करुणार्णवा परम उदारा ॥ राघवेंद्रा श्रीरामा ॥१॥

मन्मथदहनहृदयरत्न ॥ चतुरास्यजनका मनरंजना ॥ मंगलभगिनीमनमोहना ॥ जगज्जीवना भक्तवरदा ॥२॥

लागतां प्रळयरूप आघात ॥ शरीरप्रारब्धें येती अनर्थ ॥ तेथें खेद न मानी चित्त ॥ सीतावल्लभ करीं ऐसें ॥३॥

बोध बैसो हृदयीं अनुदिनीं ॥ शांति क्षमा दया उन्मनी ॥ या विलसोत मानससदनीं ॥ ऐसें करी श्रीरामा ॥४॥

विविध आकृती चराचरचना ॥ तुझीं स्वरूपें भासोत नयना ॥ वमन देखोन वीट ये मना ॥ विषयीं वासना न रामो तैसी ॥५॥

श्रवणकीर्तनादि नवविधा भक्ति ॥ सत्समागम घडो अहोरात्रीं ॥ तुझीं लीला चरित्रें ऐकतां सीतापती ॥ चित्तवृत्ति आनंदो ॥६॥

माझें मन आणि बुद्धि पाहीं ॥ वांकीं नेपुरें होऊत पायीं ॥ प्रेमीपीतांबर सर्वदाही ॥ जघनीं विलसो तूझिया ॥७॥

माझे स्थूल देह लिंग देखा ॥ तुझे पायीं विलसोत पादुका ॥ ताटिकांतका अयोध्यानायका ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥८॥

माझिया पंचप्राणांचा मेळा ॥ यांचीं कुंडलें पदकमाळा ॥ ब्रह्मानंदा भक्तवत्सला ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥९॥

उत्तराकांड हेचि भागीरथी ॥ प्रावारूपें चाले सरस्वती ॥ तरी दृष्टांतक्षेत्रें विराजती ॥ एकाहून एक विशेष ॥१०॥

असो गतकथाध्यायीं दशकंधर ॥ वधोनि विजयी जाहला रघुवीर ॥ याउपरी सकळ सुरवर ॥ श्रीरामदर्शना पातले ॥११॥

सुरांची दाटी जाहली बहुत ॥ मुकुटांसी मुकुट आदळत ॥ रत्नें झळकती अमित ॥ भगणांहूनि तेजागळीं ॥१२॥

गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ सुरासुर नर वानर ॥ सुवेळाचळीं जाहले एकत्र ॥ गजर थोर होतसे ॥१३॥

तो मारुतीचे मनांत ॥ केव्हां आज्ञा देईल रघुनाथ ॥ कीं जानकी आणावी त्वरित ॥ रावणांतक वदेल तेव्हां ॥१४॥

क्षणक्षणांत वायुकुमर ॥ विलोकी राघववदनचंद्र ॥ तों मारुतीसी अयोध्याविहार ॥ आज्ञापिता जाहला ॥१५॥

म्हणे प्राणसखया हनुमंता ॥ सत्वर जाऊन गुणभरिता ॥ जानकी सौभाग्यसरिता भेटवीं आतां मजलागीं ॥१६॥

बिभीषणासी सांगून ॥ सीतेसी घालिजे मंगलस्नान ॥ वस्त्रें अलंकार देऊन ॥ सुखासनारूढ आणिजे ॥१७॥

ऐसें ऐकतां हनुमंत ॥ निराळपंथें चालिला त्वरित ॥ जैसें तान्हें वत्स काननांत ॥ जाय शोधीत धेनूसी ॥१८॥

मानसाप्रति मराळ जात ॥ कीं जीवन शोधी तृषाक्रांत ॥ कीं झेंपावें विनतासुत ॥ दर्शना जातां इंदिरेच्या ॥१९॥

तैसाच अशोकवनात ॥ प्रवेशता जाहला हनुमंत ॥ साष्टांगें शीघ्र प्रणिपात ॥ जानकीस घातला ॥२०॥

तान्हें बाळ चुकोनि गेलें ॥ तें जननीतें अकस्मात भेटलें ॥ कीं हरपलें रत्न सांपडलें ॥ तैसें वाटलें जानकीतें ॥२१॥

कीं प्राण जातां निःशेष ॥ वदनीं घालिजे सुधारस ॥ तैसी देखतां मारुतीस ॥ सीता परम संतोषली ॥२२॥

कर जोडोनि हनुमंत ॥ सीतेपुढें उभा राहत ॥ म्हणे सुखी आहे अयोध्यानाथ ॥ सेनेसहित सुवेळे ॥२३॥

कंटक दशकंठ वधून ॥ राज्यीं स्थापिला बिभीषण ॥ बंदीचें देव सुटून ॥ भेटों आले रघुत्तमा ॥२४॥

ऐसें सांगतां हनुमंत ॥ जगन्माता काय बोलत ॥ बारे वचन तुझें गोड बहुत ॥ अमृताहून आगळें ॥२५॥

प्राणसखया तूं यथार्थ ॥ मजकारणें श्रमलासी बहूत ॥ तुझें उपकार अमित ॥ अयोध्यानाथ जाणतसे ॥२६॥

षणमास मी कंठिलें अद्भुत ॥ आतां भेटवीं रघुनाथ ॥ ऐसें ऐकतां हनुमंत ॥ बिभीषणसदनीं प्रवेशला ॥२७॥

सांगे सकळ वर्तमान ॥ सीतेसी करवून मंगलस्नान ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ चाल घेऊन सुवेळे ॥२८॥

ऐकोनि आनंदे बिभीषण ॥ मारुतीसी करी धरून ॥ प्रवेशला अशोकवन ॥ सीतादर्शन घ्यावया ॥२९॥

चिरंजीव दोघेजण ॥ रघुपतीचे प्रियप्राण ॥ जानकीजवळ येऊन ॥ बिभीषणें लोटांगण घातलें ॥३०॥

जगन्माता बोले वचन ॥ जोंवरी शशी चंडकिरण ॥ तोंवरी चिरंजीव होऊन ॥ राज्य करी लंकेचे ॥३१॥

बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहे सीतेसमोर ॥ जैसा अपर्णेजवळी कुमार ॥ कीं फरशधर रेणुकेपासीं ॥३२॥

बिभीषण म्हणे जगन्माते ॥ प्रणवरूपिणी सद्रुणसरिते ॥ अनादिसिद्धे अपरिमिते ॥ आदिमाये इंदिरे ॥३३॥

तुवां आदिपुरुष जागा करून ॥ अनंत ब्रह्मांड रचिलीं पूर्ण ॥ ब्रह्मा विष्णु उमारमण ॥ तुझीं बाळें तान्हीं हीं ॥३४॥

उत्पत्तिस्थिति पालन ॥ करविसी तिघांकडोन ॥ इच्छा परततां पूर्ण ॥ सवेंचि गोळा करिसी तूं ॥३५॥

तुझें तुजचि सर्व ठाऊकें ॥ नेणतपण धरिलें कौतुकं ॥ रावणें तुज आणिलें लंकें ॥ हेही इच्छा तुझीच पैं ॥३६॥

बंदीचें सुटले सुरवर ॥ मारुति सुग्रीवादि वानर ॥ आम्हां सर्वां जाहला राममित्र ॥ हा तों उपकार तुझाची ॥३७॥

यावरी करून मंगलस्नान ॥ वस्त्रें भूषणें अंगिकारून ॥ सुवेळेसी पाहावया रघुनंदन ॥ शीघ्र आतां चलावें ॥३८॥

जगन्माता बोले वचन ॥ राम न करितां मंगलस्नान ॥ म्यां आधीं करितां पूर्ण ॥ वाटे दूषण परम हें ॥३९॥

पतिव्रतेचा ऐसा होय धर्म ॥ पतीविण न करावा कार्य उपक्रम ॥ रघुपतीची आज्ञा नसतां अधर्म ॥ होय सर्व आम्हांसी ॥४०॥

मारुति म्हणे जगन्माते ॥ आज्ञा दिधलीं रघुनाथें ॥ दुजें बिभीषणवचनातें ॥ मान दिधला पाहिजे ॥४१॥

अवश्य म्हणे जनकनंदिनी ॥ तंव ते बिभीषणाची राणी ॥ सकळ उपचार घेऊनी ॥ अशोकवना पातली ॥४२॥

सरमा त्रिजटा दोघीजणी ॥ सीतेच्या प्राणसांगातिणी ॥ दोघींनीं जानकीची वेणी ॥ उकलिली तेधवां ॥४३॥

हनुमंत आणि बिभीषण ॥ बैसले एकीकडे जाऊन ॥ सरमेनें जानकीचें पूजन ॥ आरंभिलें स्वहस्तें ॥४४॥

उत्तम पट्टदुकूल आणूनी ॥ सीतेसी दिधली पडदणी ॥ मणिमय चौरंग घालोनि ॥ पाय धूतले सरमेनें ॥४५॥

सुगंध तेलाचा ते वेळीं ॥ त्रिजटा सीतेचे मस्तकीं घाली ॥ आशीर्वाद वचनें बोलिली ॥ स्नेहआदरेंकरूनि ॥४६॥

अनंत कल्याण कल्पपर्यंत ॥ दोघें नांदा आनंदभरित ॥ मृगमदाचें उटणें लावित ॥ सरमा आपण स्वहस्तें ॥४७॥

मळी काढिता म्हणे माये ॥ कृश जाहलीस जनकतनये ॥ असे उष्णोदक लवलाहें ॥ स्नानालागीं आणिलें ॥४८॥

त्रिजटा उदक घाली सवेग ॥ सरमा घांसी सीतेचें अंग ॥ बिभीषणें अलंकार सुरंग ॥ अमोलिक पाठविले ॥४९॥

प्रळयविजेहून तेजागळी ॥ चीर नेसली जनकबाळी ॥ दिव्य अलंकार लेइली ॥ जे त्रिभुवनीं दुर्लभ ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP