अध्याय पस्तीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


धन्य तुमचे बंधुपण ॥ शक्रपदातुल्य राज्य टाकून ॥ सकळ मंगलभोग त्यजून ॥ नंदिग्रामीं बैसलां ॥१॥

भरत म्हणे हो मारुति ॥ मृगजीवनीं बुडेल अगस्ति ॥ तमार्णवीं पडेल दिनपति ॥ दोष भागीरथी जरी लिंपे ॥२॥

शेष जरी भागेल धरितां क्षिती ॥ जरी मर्यादा टाकील सरितापती ॥ तरी राज्यवासना मारुती ॥ मज होईल जाणा पां ॥३॥

असो शत्रुघ्नासी म्हणे भरत ॥ तूं अयोध्येसी जाई त्वरित ॥ वसिष्ठ मातादि समस्त ॥ तयासी श्रुत करा वेगीं ॥४॥

अरुणोदय होतां सत्वर ॥ प्रजा सेना घेऊनि समग्र ॥ जगद्वंद्यासी सामोर ॥ गजरेंकरून येइंजे ॥५॥

ऐसी आज्ञा होतां शत्रुघ्न ॥ अयोध्येसीं गेला धांवोन ॥ टवटवीत प्रसन्नवदन ॥ सुमंतासी भेटला ॥६॥

म्हणे पाहता काय उठा त्वरित ॥ जवळी आलें श्रीरघुनाथ ॥ नंदिग्रामीं आला हनुमंत ॥ पुढें सत्वर सांगावया ॥७॥

हर्षें धांवत सुमंत ॥ आनंद न माये गगनांत ॥ दुंदुभी त्राहाटिल्या त्वरित ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥८॥

दणाणिल्या राजभेरी ॥ नाद न समाये अंबरी ॥ शत्रुघ्नें राजसदनावरी ॥ कळस चढविला लवलाहें ॥९॥

सूर्योदयीं अकस्मात ॥ पृथ्वीवरी किरणें धांवत ॥ तैसी नगरीं प्रकटली मात ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥११०॥

आळोआळी जन धांवती ॥ आंगीं रोमांच उभे राहाती ॥ सुख न समायें तयां चित्तीं ॥ नयनीं लोटती प्रेमबिंदु ॥११॥

सोळा पद्में दळभार ॥ सिद्ध जाहले तेव्हां सत्वर ॥ कुंजरभेरी चवदा सहस्र ॥ एकसरें ठोकिल्या ॥१२॥

शत्रुघ्न आणि सुमंत ॥ आले कौसल्येच्या सदनांत ॥ म्हणती माते आला रघुनाथ ॥ सीतासौमित्रासहित पै ॥१३॥

कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ उचंबळल्या आनंदेकरूनी ॥ सुखाश्रु लोटले नयनीं ॥ बैसल्या वहनी सत्वर ॥१४॥

वसिष्ठापासीं जाऊन ॥ आनंदे सांगे शत्रुघ्न ॥ स्वामी आले जी रघुनंदन ॥ चला सत्वर सामोरे ॥१५॥

आला ऐकतां रघुनाथ ॥ स्वानंदें उचंबळे ब्रह्मसुत ॥ चतुरंग दळ समस्त ॥ नगराबाहेर निघालें ॥१६॥

विद्युत्प्राय ध्वज झळकती ॥ मकरबिरुदें पुढें चालती ॥ अष्टादश प्रजा धांवती ॥ नगराबाहेर सत्वर ॥१७॥

कैकयी सुमित्रा कौसल्या ॥ सुखासनारूढ जाहल्या ॥ मंगलवाद्यांच्या ध्वनि लागल्या ॥ तो सोहळा न वर्णवे ॥१८॥

वसिष्ठ शत्रुघ्न सुमंत ॥ दिव्य रथीं बैसले त्वरित ॥ आनंदमय जन समस्त ॥ श्रीरघुनाथ पहावया ॥१९॥

थोडीशी उरतां लग्नघडी ॥ वेगें धांवती वऱ्हाडी ॥ कीं गंगेचिया जवळीं थडी ॥ तृषाक्रांत करिती त्वरेनें ॥१२०॥

तैसें ब्रह्मानंदेकरून ॥ पुढें धांवती अयोध्येचे जन ॥ इकडे भरत सीताशोकहरण ॥ सूर्योदयीं उठियेले ॥२१॥

नित्यनेमातें सारून ॥ पुढें चालिले दोघेजण ॥ भरत म्हणे आजि धन्य नयन ॥ रामनिधान देखती ॥२२॥

इकडे भारद्वाजाची आज्ञा घेऊन ॥ पुष्पकीं बैसे रघुनंदन ॥ सत्वर चालिलें विमान ॥ अयोध्यापट्टण लक्षित ॥२३॥

तों भरतासी म्हणे हनुमंत ॥ ऊर्ध्वपंथें पाहा जी त्वरित ॥ भरत जों ऊर्ध्व विलोकित ॥ तों अद्भुत देखिलें ॥२४॥

भरत म्हणे हनुमंतासी ॥ हें काय असंभाव्य आकाशीं ॥ वाद्यें वाजती मानसीं ॥ आश्चर्य मज वाटतें ॥२५॥

हनुमंते म्हणे पुष्पकविमान ॥ सेनेसहित सीतारमण ॥ वरी येतात बैसोन । परम वेगें करूनियां ॥२६॥

ऐसें सांगतां वायुनंदन ॥ भरतें घातलें लोटांगण ॥ मागुती ऊर्ध्व वदन करून ॥ पुनः विमान विलोकी ॥२७॥

मागुती साष्टांग नमस्कार ॥ प्रेमें घाली भरत वीर ॥ चंद्राकडे पाहे चकोर ॥ ऊर्ध्वपंथें प्रीतीनें ॥२८॥

मारुतीचा हस्त धरून ॥ पुढें चाले कैकयीनंदन ॥ तों राघवइच्छेकरून ॥ पुष्पक उतरलें भूमीवरी ॥२९॥

सीतेसहित रघुनंदन ॥ विमानाखालीं उतरून ॥ अयोध्येसी साष्टांग नमन ॥ राजीवनयन करी तेव्हां ॥१३०॥

जन्मभूमी जान्हवी जननी ॥ सद्रुरुस्थळ पवित्र अवनी ॥ शिवहरिप्रतिमा संत देखोनी ॥ साष्टांग नमन करावें ॥३१॥

तपस्वी वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण ॥ यज्ञप्रसाद ध्वज देखोन ॥ वंद्यद्रुम समाधिस्थान ॥ महापुरुष वंदावे ॥३२॥

सत्यव्रती श्रीरघुनाथ ॥ म्हणोनि अयोध्येसी नमस्कारित ॥ तों हनुमंतासमवेत ॥ जवळी भरत देखिला ॥३३॥

दाटला अष्टभावें करून ॥ घालीत येतसे लोटांगण ॥ श्रीरामवियोगेंकरून ॥ शरीर कृश जाहले ॥३४॥

भस्म लाविलें शरीरासी ॥ वल्कलें वेष्टित तो तापसी ॥ तैसा भरत देखोन मानसीं ॥ सीतावर कळवळला ॥३५॥

चरणीं क्रमीत भूमंडळ ॥ पुढें चाले तमालनीळ ॥ तान्हया वत्सालागीं स्नेहाळ ॥ धेनु हंबरत जैसी कां ॥३६॥

भरतें कैसें देखिले रघुनाथा ॥ बहुत दिवस गेला पिता ॥ तों कुमरें दृष्टीं देखतां ॥ धांवे जैसा स्नेहभरें ॥३७॥

तैसें भरतें धांवोनी ॥ मिठी घातली श्रीरामचरणीं ॥ की गेले धन देखतां नयनीं ॥ मिठी घाली जेविं लोभी ॥३८॥

कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं मृत्युसमयीं अमृतपान ॥ कीं दरिद्रीयास निधान ॥ अकस्मात प्राप्त जाहलें ॥३९॥

किंवा मारिता तस्करीं ॥ अकस्मात धांवला कैवारी ॥ तों जेविं सुखावे अंतरीं ॥ भरतासी तैसें वाटत ॥१४०॥

राघवें उचलूनि ते समयीं ॥ भरत दृढ धरिला हृदयीं ॥ दोघांचे नयनप्रवाही ॥ जलसरिता लोटल्या ॥४१॥

हरिहर दोघे भेटले ॥ शशिमित्र एकवट जाहले ॥ कीं क्षीराब्धीचे एवकटले ॥ लोट जैसे एकत्र ॥४२॥

कीं वेदांतग्रंथीचें अर्थ ॥ ऐक्यत्वा परस्परें येत ॥ तैसा दशमुखांतक आणि भरत ॥ एकपणें मिळाले ॥४३॥

सम संतोष समान प्रीति ॥ सोडावें हें न वाटे चित्तीं ॥ वियोगव्यथा दिगंतराप्रति ॥ जाती जाहली ते काळीं ॥४४॥

आलिंगन देऊन वेगळे होती ॥ परी अंतरीं नव्हेच तृप्ति ॥ तो सोहळा डोळां पाहती ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥४५॥

म्हणती भरत रघुपति ॥ अद्भुत दोघांची प्रीति ॥ एकास एक आवडती ॥ प्राणाहून पलिकडे ॥४६॥

बंधु साधु विरक्त भक्त ॥ चारी प्रकारें वंद्य भरत ॥ राज्य टाकूनि अरण्यांत ॥ चतुर्दश वर्षें बैसला ॥४७॥

नाहीं तरी आमुचें बंधुपण ॥ एकमेकांचे घेतले प्राण ॥ आतां रघुनाथ म्हणोन ॥ वंद्य जाहलों त्रिलोकीं ॥४८॥

परी धन्य वाळी आणि रावण ॥ त्यांचे विरोधप्रसंगेकरून ॥ सखा जोडला रघुनंदन ॥ सच्चिदानंदस्वरूप जो ॥४९॥

असो भरते प्रेमेंकरून ॥ वंदिले जनकजेचे चरण ॥ जैसें वत्स प्रीतीनें धांवोन ॥ रिघे धेनूचे कांसेसीं ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP