जे दैवी संपत्तीनें सभाग्य होती ॥ तेच रामपंक्तीस जेविती ॥ तृप्तीचे ढेंकर देती ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥५१॥
जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वाढी जानकी त्रिजगज्जननी ॥ तेथें न्यून पदार्थांची काहाणी ॥ कदाकाळीं पडेना ॥५२॥
स्वानुभव जळ सेवून ॥ कर्मधर्माचे उत्तरापोशन ॥ घेऊनि उठले ते जन ॥ आंचवले पूर्ण संसारा ॥५३॥
अमानित्व अदंभित्व ॥ हे विडे घेती समस्त ॥ निजधन नाममुद्रांकित ॥ दक्षिणा देती याचकां ॥५४॥
भक्तीचीं भूषणें वस्त्रें ॥ सद्भक्तांसी दिधली राजीवनेत्रें ॥ तो सोहळा वर्णावया वक्रें ॥ सहस्रवदना शक्ति नोहे ॥५५॥
ऐसे स्वपंक्तीस बैसवून ॥ दिधलें सकळांसी भोजन ॥ मग सभामंडपास येऊन ॥ रघुनंदन गौरवी तयां ॥५६॥
मुकुट कुंडलें सर्व अलंकार ॥ आपण स्वयें देत रघुवीर ॥ तैसेचि इतर वानर ॥ गौरविले रघुनाथें ॥५७॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ त्यांच्या सेना ज्या ज्या समस्त ॥ तितुक्या गौरवी रघुनाथ ॥ वस्त्रें अलंकार देऊनियां ॥५८॥
दोन सिंहासनें दोन छत्रें ॥ बिभीषणसुग्रीवा दिधली राजीवनेत्रें ॥ दिधली कित्येक उत्तरवस्त्रें ॥ नानावस्तू अपार ॥५९॥
परी पुढें असे हनुमंत ॥ त्याकडे न पाहे रघुनाथ ॥ वानरगण पहाती समस्त ॥ विपरीतार्थ देखोनी ॥१६०॥
कां न पाहे रघुनंदन ॥ तरी हनुमंताऐसें निधान ॥ हें ब्रह्मांड ओंवाळून ॥ तयारून टाकावें ॥६१॥
ज्याच्या उपकारांच्या राशी अपार ॥ मेरूपरीस जाहल्या थोर ॥ त्यासी द्यावया अलंकार ॥ दृष्टीस कांही दिसेना ॥६२॥
मग उठोनिया रघुपति ॥ हृदयी दृढ धरी मारुति ॥ म्हणे तव हृदयीं निश्चितीं ॥ मीच सर्वदा राहेन ॥६३॥
तुजवेगळा एक क्षण ॥ जिवलगा मी नव्हे जाण ॥ हनुमंतें दृढ धरिले चरण ॥ म्हणे मज हेंचि देईं ॥६४॥
सीतेनें वस्त्रें अलंकार ॥ देऊनि गौरविले सकळ वानर ॥ परी आपुले गळ्याचा दिव्य हार ॥ हनुमंतासी दीधला ॥६५॥
त्या हारासी तत्वतां ॥ उपमा नाहीं सर्वथा ॥ त्रिभुवनींचे मोल देतां ॥ तेंही उणे तयासी ॥६६॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ एक एक मणी जाण ॥ तो हार जानकीनें घेऊन ॥ मारुतीच्या गळां घातला ॥६७॥
हनुमंत तात्काळ उडाला ॥ वृक्षावरी समोर बैसला ॥ एक एक मणि फोडिला ॥ दाढेखालीं घालूनियां ॥६८॥
जो मणि पाहे फोडून ॥ म्हणे यांत नाहीं रघुनंदन ॥ म्हणोनि देतसे भिरकावून ॥ व्यर्थ पाषाण काय हे ॥६९॥
बोलती सुग्रीवादि वानर ॥ व्यर्थ कां फोडिसी दिव्य हार ॥ मारुती म्हणे रघुवीर ॥ याचे अंतरीं दिसेना ॥१७०॥
वानर म्हणती तुझे हृदयीं ॥ राम दावीं ह्या समयीं ॥ ऐसें बोलतां लवलाहीं ॥ काय केलें हनुमंतें ॥७१॥
हृदयकपाट उघडिलें ॥ उदर विदारून दाविलें ॥ ती आंत श्रीरामरूप सांवळे ॥ समस्ती देखिलें एकदांचि ॥७२॥
जैसा सिंहासनी रघुनाथ ॥ तैसा मारुतीचे हृदयी दिसत ॥ मग वानर उठोनि समस्त ॥ नमस्कारिती हनुमंता ॥७३॥
असो अयोध्येसी निरंतर ॥ राहिला अंजनीचा कुमर ॥ वरकड सिद्ध जाहले वानर ॥ निजग्रामासी जावया ॥७४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ तिहीं सुग्रीव बिभीषण ॥ वस्त्राभरणीं गौरविलें पूर्ण ॥ सदना आपुलें नेऊनियां ॥७५॥
कौसल्या सुमित्रेप्रति ॥ सुग्रीव बिभीषण पुसती ॥ म्हणे माता हो आम्हांवरी प्रीति ॥ असो द्यावी बहुसाल ॥७३॥
कौसल्या सुमित्रा बोलत ॥ बारे तुमचे उपकार अमित ॥ विजयी करून रघुनाथ ॥ माझा मज भेटविला ॥७७॥
अमोल्य अलंकार देऊन ॥ गौरविले ते दोघेजण ॥ मग सुग्रीव आणि बिभीषण ॥ कैकयीसदना चालिले ॥७८॥
तों आडवा येऊन भरत ॥ तिकडे न जावें जी म्हणत ॥ कैकयी विपरीत बोलत ॥ चित्त खेद पावेल तुमचें ॥७९॥
ऐसें भरतें बोलोन ॥ परतविलें सुग्रीव बिभीषण ॥ रघुनाथाजवळी येऊन ॥ आज्ञा मागती जावया ॥१८०॥
उभे राहिले जोडोनि कर ॥ सर्वांचे अश्रूंनी भरले नेत्र ॥ म्हणती राघवा निरंतर ॥ सर्वथा आम्हां न विसरावें ॥८१॥
त्रिभुवनींचे राज्य टाकावें ॥ रामा तुजजवळीच नित्य राहावें ॥ परी हें प्राक्तन नाही बरवें ॥ ओढून नेतें बळेचि ॥८२॥
काय आठवावे उपकार ॥ जन्मोजन्मीं न पडावा अंतर ॥ तुझे बोल गोड निरंतर ॥ राघवा हृदयीं आठवती ॥८३॥
स्फुंदस्फुंदोनि दोघजण ॥ बोलती सुग्रीव बिभीषण ॥ मग म्हणे रघुनंदन ॥ तुमच्या हृदयीं वसें मी ॥८४॥
मग उठोनियां रघुनाथ ॥ दोघांचे मस्तकीं ठेवी हस्त ॥ मग सव्य घालोनि सीताकांत ॥ निघते जाहले ते काळीं ॥८५॥
तयांसी बोळवीत रघुवीर ॥ गेला अयोध्येबाहेर मग सर्व वानरीं नमस्कार ॥ रघुनाथासी घातला ॥८६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥ इहीं साष्टांग नमूनि रघुनाथ ॥ जाते जाहले ते काळीं ॥८७॥
दक्षिणपंथें चालिले त्वरित ॥ मागुती राघवाकडे पाहात ॥ तेथून नमस्कार घालित ॥ सद्रद चित्ती होऊनियां ॥८८॥
मग पवनवेगेंकरून ॥ कपि असुर निघाले तेथून ॥ किष्किंधेस सूर्यनंदन ॥ राहिला कपींसमवेत ॥८९॥
तेणें बिभीषण गौरविला ॥ मग घेऊनि असुरमेळा ॥ रावणानुज लंकेसीं आला ॥ स्वस्थानीं स्वस्थ राहिला ॥१९०॥
इकडे अयोध्येसीं रघुनाथ ॥ बंधूंसहित राज्य करित ॥ पृथ्वी संपूर्ण आनंदभरित ॥ दुःख किंचित असेना ॥९१॥
अकरा सहस्र वर्षेवरी ॥ अयोध्यानाथ राज्य करी ॥ लोक सर्व धर्माधिकारी ॥ पाप तिळभरी असेना ॥९२॥
अवतार हरि उदंड धरी ॥ परी बहुत सुख रामावतारीं ॥ अकरासहस्र वर्षवरी अक्षय राज्य चालविलें ॥९३॥
जरा मृत्यु दुःख दरिद्र ॥ राज्यांत नाहीं अणुमात्र ॥ सीतेसहित राजीवनेत्र ॥ ब्रह्मांनंदें वर्ततसे ॥९४॥
वसिष्ठ विश्वामित्र अगस्ति ॥ आणिक ऋषि जैसे गभस्ति ॥ अयोध्येमाजी सदा वसती ॥ जनकजापतीचे समीप ॥९५॥
अगस्तीच्या मुखें श्रवण ॥ नित्य करी रघुनंदन ॥ सदा तृप्त याचकजन ॥ राघवदर्शन घेतांचि ॥९६॥
सुरस रामविजय ग्रंथ ॥ उत्तराकांड कथा अद्भुत ॥ राज्यीं बैसला राजीवनेत्र ॥ धन्य कार्यार्थ सुरस हा ॥९७॥
रामविजयाचें एक आवर्तन ॥ करी संपूर्ण पापाचें दहन ॥ आणि शत्रुपराजय पूर्ण ॥ श्रवण करितां होतसे ॥९८॥
अज्ञानांसी होय ज्ञान ॥ निपुत्रिकांसी पुत्रसंतान ॥ भवरोग जाय विरून ॥ भावेंकरून परिसतां ॥९९॥
अयोध्याप्रवेश जाहला पूर्ण ॥ पुढें रसाळ कथा गहन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ राघवीं मन समर्पूनियां ॥२००॥
अयोध्यापुरवासिया रामा ॥ श्रीब्रह्मानंदा कल्याणधामा ॥ श्रीधरवरदा पूर्णकामा ॥ नामा अनामा अतीत तूं ॥१॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षट्त्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२०२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरामचंद्रार्पणामस्तु ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ अध्याय ॥ ॥३६॥
ओंव्या ॥२०२॥
॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥