आडवे महाउरग धांवती ॥ पतिवियोग पिंगळे वदती ॥ वायस वामभागें जाती ॥ शोक सांगती अत्यंत ॥५१॥
ऐसें अपशकून देखतां ॥ मनी दचके जनकदुहिता ॥ देवराप्रति पुसे तत्वतां ॥ चिन्हें विपरीत कां दिसती ॥५२॥
तंव तो भूधरावतार ॥ सहसा नेदी प्रत्युत्तर ॥ नयनीं वहातसे नीर ॥ कंठ सद्दित जाहला ॥५३॥
सीता म्हणे बंधुसहित ॥ सुखरूप असो जनकजामात ॥ त्याचें अशुभ दुःख समस्त ॥ ते मजवरी पडो कां ॥५४॥
मग म्हणे देवरा सुमती ॥ विलोकून वन आणी भागीरथी ॥ सत्वर जाऊं अयोध्याप्रती ॥ रघुपतीस पहावया ॥५५॥
परी तो न बोलेचि सर्वथा ॥ तटस्थ पाहे रघुवीरकांता ॥ पुढें नौकेमाजी जनकदुहिता ॥ रथासहित बैसविली ॥५६॥
सुरनदी उतरूनि ते वेळीं ॥ सत्वरपैल पार नेली ॥ मागुती रथ भूमंडळी ॥ पवनवेगें चालविला ॥५७॥
परम भयंकर कानन ॥ नाहीं मनुष्याचें दर्शन ॥ सिंह सर्प व्याघ्र पूर्ण ॥ वास्तव्य करिती त्या स्थळीं ॥५८॥
सीता म्हणे वो ऊर्मिलापती ॥ कां येथें ऋषिआश्रम न दिसती ॥ कोणीकडे राहिली भागीरथी ॥ नेतां निश्चिंतीं मज कोठें ॥५९॥
विप्रवेदघोष कानीं ॥ कां ऐकूं न येती अजूनी ॥ स्वाहास्वधावषट्कारध्वनीं ॥ यागसदनीं कां न उठतीं ॥६०॥
तों गहनवनीं नेऊनि रथ ॥ सौमित्र तृणशेज करित ॥ जानकीस उतरूनि त्वरित ॥ बैसविली तये ठायीं ॥६१॥
तों भूगर्भीचें दिव्य रत्न ॥ वनिताचक्रांत मुख्य मंडण ॥ की लावण्यभूमीचें निधान ॥ वनीं लक्ष्मण टाकित ॥६२॥
तें सौंदर्यनभींचे नक्षत्र ॥ कीं त्रिभुवनींचे कृपापात्र ॥ अंगींच्या तेजे अपार ॥ वन तेव्हां उजळले ॥६३॥
चंद्री वसे सदा कलंक ॥ त्याहूनि सुंदर जानकीचे मुख ॥ चपळेहूनि अधिक ॥ अलंकार शोभती ॥६४॥
असो तृणशेजेसी सीता बैसवून ॥ सौमित्र करी साष्टांग नमन ॥ खालतें करूनियां वदन ॥ स्फुंदत उभा ठाकला ॥६५॥
प्रदिक्षणा करून लक्ष्मण ॥ पुढती दृढ धरी चरण ॥ देवराचें शुभ वचन ॥ तटस्थ ऐके जानकी ॥६६॥
सौमित्र म्हणे जगन्माते ॥ तुज वनीं सोडिलें रघुनाथें ॥ त्याची आज्ञा अलोट मातें ॥ घेऊनि आलों म्हणोनी ॥६७॥
रजकें निंदा केली म्हणोनी ॥ तुज सोडविलें घोर वनी ॥ आतां रघुपतीचे चरण मनीं ॥ आठवीत राहें सुखेंचि ॥६८॥
कमळिणी सुकुमार बहुत ॥ तयेवरी वीज पडे अकस्मात ॥ मग पद्मिणीचा होय अंत ॥ तेवीं मूर्च्छित पडे सीता ॥६९॥
रुदन करी भूधरावतार ॥ रथारूढ झाला सत्वर ॥ तेथोनि परतला ऊर्मिलावर ॥ कठिण मन करूनियां ॥७०॥
वनदेवतां वृक्ष पाषाण ॥ वारण उरग पंचानन ॥ तयांसी विनवी लक्ष्मण ॥ जानकी जतन करा हे ॥७१॥
पृथ्वी आप तेज समीर ॥ अवघियांनो जनत करा सुकुमार ॥ असो पवनवेगें सौमित्र ॥ अयोध्यापुरा पातला ॥७२॥
इकडे सीता मूर्च्छना सांवरून ॥ उघडोन पाहे पद्मनयन ॥ तों दूरी गेला लक्ष्मण ॥ उभी ठाकून हांक फोडी ॥७३॥
बाह्या उभारून तत्वतां ॥ म्हणे परत वेगें सुमित्रासुता ॥ माझा अन्याय कांही नसतां ॥ कां हो जातां टाकूनि मज ॥७४॥
सत्वर माझा वध तरी करोनी ॥ सांगा रघुपतीस जाऊनी ॥ मी एकली दुस्तर वनीं ॥ कवण्या ठाया जाऊं आतां ॥७५॥
म्हणे धांव धांव रघुनाथा ॥ म्हणोनि हांक देत जगन्माता ॥ वनीं श्वापदें वृक्ष लता ॥ तयांस गहिंवर दाटला ॥७६॥
थरथरां कांपत मेदिनी ॥ पर्वत पक्षी रडती वनीं ॥ गज व्याघ्र मूर्च्छना येऊनी ॥ दुःखेकरून पडताती ॥७७॥
हंस मुक्तहार सांडोनी ॥ सीता देखतां रडती वनीं ॥ नृत्यकला विसरोनी ॥ शिखी शोक करिताती ॥७८॥
पक्षी स्वपदें ते वेळीं ॥ सीतेवरी करिती साउली ॥ जळें चंचू भरूनि सकळी ॥ जनकजेवरी शिंपिती ॥७९॥
वनगाई पुच्छेकरून ॥ सीतेवरी घालिती पवन ॥ वनदेवता करिती रुदन ॥ सीतादेवी देखोनियां ॥८०॥
वनचरकळप कांतारीं ॥ रुदन करित दीर्घस्वरीं ॥ वैरभाव ते अवसरीं ॥ विसरती मोहशोकें ॥८१॥
हे राम हे राम म्हणोन ॥ सीता विलापें अतिगहन ॥ गुल्मलता वापी कूप जाण ॥ सरिता शोकें कांपिन्नल्या ॥८२॥
हे रामा राजीवनेत्रा ॥ मज कां त्यागिलें पवित्रा ॥ तूं दीनदयाळा पवित्रा ॥ विसरलासी ये काळीं ॥८३॥
कांहो मोकलिले एकलीतें ॥ आतां सांभाळील कोण मातें ॥ कोठें थ्ज्ञारा न दिसेचि येथ ॥ तुजविण मज राघवा ॥८४॥
काय अन्याय जाहला मजपासूनी ॥ मज टाकिलें घोरवनीं ॥ कृपासागरा चापपाणी ॥ श्रुत मज त्वां न केले ॥८५॥
जन्मोनि नेणें दोषांते ॥ स्वप्नी नातळे दुर्बुद्धीते ॥ परी जन्मांतर न कळे मातें ॥ तें कां ठाकोनि आलें भोगावया ॥८६॥
तूं अनाथबंधु करुणाकर ॥ मी दासी हीन पामर ॥ माझा न कीजे अव्हेर ॥ सकळ गण -गोत तूं माझे ॥८७॥
अगा हे श्रीदशरथी ॥ माझी करुणा नुपजे चित्तीं ॥ कैसा स्नेह सांडोनि रघुपती ॥ निष्ठुर जाहलासी मजवरी ॥८८॥
मी अज्ञान बाळ भोळें ॥ सहज पुसिलें कृपा कल्होळें ॥ त्याचें फळ कीं त्यागिले ॥ महावनी एकटें ॥८९॥
आतां जाऊं कोणीकडे ॥ कवण जिवलग येथें सांपडे ॥ जें माझें जन्मसांकडे ॥ निवारील दर्शनी ॥९०॥
रामा तूंचि बापमाय ॥ बंधु सुहृद गोत होय ॥ मम अपराध विसरून जाय ॥ अभय देईं मज आतां ॥९१॥
करुणासागरा रघुवीरा ॥ मातें उद्धरी दयासमुद्रा ॥ तुझें ध्यान असंख्यमुद्रा ॥ चित्तीं वसो माझिया ॥९२॥
तंव अयोध्यापुराा लक्ष्मण ॥ पावला तेव्हां म्लानवदन ॥ तो गुणसिंधु रघुनंदन ॥ एकांतसदनीं बैसला असे ॥९३॥
तेथें ऊर्मिलावरें जाऊनी ॥ भाळ ठेविलें रामचरणीं ॥ करुणार्णवे सीता आठवूनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥९४॥
सौमित्र म्हणे रघुराया ॥ चित्रींच्या वृक्षाची छाया ॥ स्वप्नवत् संसारमाया ॥ लटकी जैसी मुळींहूनी ॥९५॥
नावरे अत्यंत शोकसागर ॥ परी कलशोद्भव जाहला रघुवीर ॥ आचमन करूनि समग्र ॥ उगाचि मौने बैसला ॥९६॥
असो इकडे जनकनंदिनी ॥ निघाली चालत दुःखें वनीं ॥ मूर्च्छना येऊनि क्षणक्षणीं ॥ जमिनीवरी पडतसे ॥९७॥
मागुती उठे हस्त टेंकूनी ॥ रुदन करी धाय मोकलूनी ॥ म्हणे कोण्या ठायां जाऊनी ॥ राहूं आता राघवेंद्रा ॥९८॥
मी अनाथ अत्यंत दीन ॥ जरी देऊं येथे प्राण ॥ तरी आत्महत्त्या पाप गहन ॥ दुजी गर्भहत्त्या घडेल ॥९९॥
कळपांतून धेनू चुकली ॥ कीं हरिणी एकटी वनी पडली ॥ जीवनेंविण मासोळी ॥ तळमळीत जैसी कां ॥१००॥