चार घटिका संपूर्ण ॥ निवांत राहिला रघुनंदन ॥ सीता सोडिली त्या दिवसापासून ॥ संपूर्ण दिवस मोजिले ॥१॥
द्वादश वर्षें तीन मास पूर्ण॥ गणित करी जानकीजीवन ॥ तों लहू कुश दोघेजण ॥ एकाप्रति एक बोलती ॥२॥
म्हणती वृक्षाआड बैसोन ॥ काय करितो रघुनंदन ॥ तों कुशें सोडिला एक बाण ॥ वृक्ष छेदोनि उडविला ॥३॥
हस्तकौशल्ये देखोन ॥ हास्य करी जगन्मोहन ॥ म्हणे हे आम्हांलागून ॥ वश नव्हेति कदापि ॥४॥
आतां युद्धचि करावें यथार्थ ॥ म्हणोनि उभा राहिला रघुनाथ ॥ जे जे बाण सोडित ॥ ते ते निष्फळ जात आकाशीं ॥५॥
विमानीं इंद्रादि सुरवर ॥ आश्चर्य करिती तेव्हां थोर ॥ म्हणती रामाचे सामर्थ्य अपार ॥ काय जाहलें ये समयीं ॥६॥
अकाळींचीं अभ्रे व्यर्थ पूर्ण ॥ तैसे निष्फळ जाती रामाचे बाण ॥ मग कुशें मोहनास्त्र संपूर्ण ॥ निजबाणी स्थापिलें ॥७॥
तो मोहनबाण येऊन ॥ रघुनाथ हृदयीं भेदला पूर्ण ॥ मोहें विलोकितां पुत्रवदन ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८॥
रघुनाथ पडतां भूमंडळी ॥ एकचि हाक चोहींकडे जाहली पर्वत घेऊनि ते वेळीं ॥ हनुमंत पुढें धांविन्नला ॥९॥
त्यावरी टाकोनिया वज्रबाण ॥ मूर्च्छागत पाडिला न लागतां क्षण ॥ तों गदा घेऊन बिभीषण ॥ हाक देत पुढें आला ॥११०॥
तों कृशें बाण सोडिला ॥ लंकापतीचे हृदयी बैसला ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥ नाहीं उरला कोणी तेथें ॥११॥
मग लहू कुश दोघेजण ॥ आले रामाजवळी धांवोन ॥ पिता पाहिला अवलोकून ॥ वंदिले चरण प्रेमभावें ॥१२॥
रघुपतीचा मुकुट काढिला ॥ कुशें आपुलें मस्तकीं घातला ॥ कुंडले कौस्तुभ कटी मेखळा ॥ सर्वही लेइला कुश तेव्हां ॥१३॥
सौमित्राची भूषणें काढोनी ॥ लहू लेइला तेच क्षणीं ॥ मग श्यामकर्ण घेउनी ॥ दिव्य रथी बैसले ॥१४॥
लहू म्हणे दादा परियेसी ॥ वानर धरून आश्रमासी ॥ नेऊन दाखवूं मातेसी ॥ खेळावयासी सर्वदा ॥१५॥
मग नळ नीळ सुग्रीव मारुती ॥ यांचीं पुच्छें धरून हाती ॥ जांबुवंत अंगद ते क्षितीं ॥ ओढीतचि चालविले ॥१६॥
अंगे खरडती भूमीवरी ॥ जांबुवंत म्हणे मारुति अवधारी ॥ ऊठ वेगें झडकरी ॥ युद्ध करूं चला यांशी ॥१७॥
मग म्हणे हनुमंत ॥ पुढें आहे बहुत कार्यार्थ ॥ त्रिभुवननाथ सीताकांत ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥१८॥
आतां मेलियाचे मीस घेऊन ॥ घेऊं जानकीचें दर्शन ॥ शक्तीचें सामर्थ्य दारुण ॥ केलें विंदान अतर्क्य हे ॥१९॥
असो आश्रमा आले किशोर ॥ रथाखालीं उतरले सत्वर ॥ अलंकार मंडित सुंदर ॥ आश्रमामाजी प्रवेशले ॥१२०॥
कुश सन्मुख देखिला ॥ जानकीस ऐसा भाव गमला ॥ की रघुनाथचि आला ॥ सरसाविला अंचल ॥२१॥
तंव ते दोघेही कुमार ॥ साष्टांग घालिती नमस्कार ॥ सीतेसि दाटला गहिवर ॥ नंदन हृदयी कवळिले ॥२२॥
सीतेचे कंठीं मिठी घालून ॥ दोघे सांगती वर्तमान ॥ रामासमवेत बंधू चौघेजण ॥ रणांगणीं पहुडविले ॥२३॥
ऐकतांच ऐसी मात ॥ सीता पडली मूर्च्छागत ॥ सवेंच उठली आक्रंदत ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥२४॥
म्हणे त्रिभुवनेश्वर घनसांवळा ॥ तो रणी तुम्हां केंवि सांपडला ॥ अरे पितृवध कैसा केला ॥ जाणोनियां बाळ हो ॥२५॥
मत्स्ये कैसा सागर शोषिला ॥ जंबुकें मृगेंद्र कैसा धरिला ॥ दीपतेजें काळवंडला ॥ वासरमणि कैसा हो ॥२६॥
तृणप्रहारें भंगले वज्र ॥ कीं पतंगे गिळिला वैश्वानर ॥ सर्षपभारे भोगींद्र ॥ ग्रीवा कैशा दडपिल्या ॥२७॥
मक्षिकेचा पक्षवात सुटला ॥ तेणें मेरु कैसा उलथोनि पडिला ॥ मुंगीचे मुखवातें विदारिला प्रळयमेघ जैसा पां ॥२८॥
तंदुळभारें ऐरावत ॥ कैसा पडिला हो मूर्च्छित ॥ पुष्पप्रहारें अद्भुत ॥ पाताळीं कूर्म दुखावला ॥२९॥
तों कुश लहू तेव्हां बोलत ॥ माते ते पडले मूर्च्छागत ॥ आतां उठतील समस्त ॥ चिंता काही न करावी ॥१३०॥
आई आम्ही आणिलीं वानरें उड्या घेती बहुत सुंदरें ॥ वृक्षास बांधिली समग्रें ॥ पाहीं बाहेरी अंबे तूं ॥३१॥
मग जगन्माता येऊन पाहात ॥ तों हनुमंत नळ नीळ जांबुवंत ॥ वीर देखोनि समस्त ॥ आश्चर्य करी अंतरी ॥३२॥
म्हणे बाळकांचे सामर्थ्य दारुण ॥ महावीर आणिले धरून ॥ म्हणे यांस ओळखी देतां पूर्ण ॥ लज्जायमान होतील हे ॥३३॥
मग पुत्रांसी म्हणे ते अवसरीं ॥ अरे हे वानर ठेवूं नये घरीं ॥ सोडा जाऊं द्या वनांतरी ॥ आपुलिया स्वस्थाना ॥३४॥
मग भोवंडिले पुच्छें करून ॥ दूर दिधले भिकावून ॥ मग ते महावीर उठोन ॥ राघवाकडे पळाले ॥३५॥
रणीं सावध जाहला रघुवीर ॥ तों पळतचि आले वानर ॥ सांगती सर्व समाचार ॥ वाल्मीकाचे आश्रमींचा ॥३६॥
आम्ही मूर्च्छेचे मीस घेऊनि ॥ जाऊन पाहिली जनकनंदिनी ॥ श्यामकर्ण दोघांनी नेऊनि ॥ आश्रमांगणीं पूजिलासे ॥३७॥
तुमचा रथ अलंकार ॥ घेऊन गेले दोघे कुमर ॥ जैसा सुपर्णें जिंकिला श्रीधर ॥ तैसेंच पूर्ण येथे जाहलें ॥३८॥
कीं नंदीनें जिंकिला उमारमण ॥ आपुलेच फळभारेंकरून ॥ वृक्ष जाय कैसा मोडून ॥ तैसेंच येथ जाहलें ॥३९॥
सूर्यापासून जाहले आभाळ ॥ तेणें त्यास आच्छादिलें तत्काळ ॥ ऐसें बोलतां तमालनीळ ॥ उगाच राहिला क्षणभरी ॥१४०॥
तों इकडे वर्तला वृत्तांत ॥ रामासीं झुंजले सुत ॥ उपवनाजवळी बहुत ॥ अपार रण पडियेले ॥४१॥
समाचार ऐकोनि विपरीत ॥ तों पाताळाहून अकस्मात ॥ वाल्मीक मुनि आला धांवत ॥ आश्रमापासीं आपुलिया ॥४२॥
सीतेनें सांगितलें वर्तमान ॥ श्यामकर्ण आणिला धरून ॥ मग वाल्मीक मुनि हांसोन ॥ तेचि क्षणीं ऊठिला ॥४३॥
रणांगणाप्रति येऊन ॥ अद्भुत करणी केली पूर्ण ॥ कमंडलूचें उदक शिंपून ॥ दळ अवघें उठविलें ॥४४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ आदिकरून थोर लहान ॥ निद्रिस्थापरी उठोन ॥ उभे केले तें काळीं ॥४५॥
यावरी वाल्मीकें येऊन ॥ श्रीरामासी दिधलें आलिंगन ॥ म्हणे राघवा तूं सर्वज्ञ ॥ कर्तृत्व पूर्ण तुझेंच हें ॥४६॥
सर्वांचा गर्व झाडावया लीला तुवां केली रघुराया ॥ येरवी सीता तुजपासूनियां ॥ दूर कोठें गेली पां ॥४७॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ तो तूं पुराणपुरुष रघुनाथा ॥ लटकेंच बाहेर आतां ॥ नेणतपण धरिसी तूं ॥४८॥
श्रीराम म्हणे युद्ध करूनी ॥ दोघांस जिंकीन समरंगणी ॥ म्यां आपुली निर्वाण करणी ॥ दाविली नाही तयांते ॥४९॥
हांसोनि बोले वाल्मीक ऋषि ॥ हस्ताचा ढका लागला नेत्रासी ॥ तरी क्रोध करून मानसीं ॥ हस्त काय छेदावा ॥१५०॥