श्रावणवध श़ृंगीचें आगमन ॥ याग दशरथें केला पूर्ण ॥ त्यावरी हनुमंतजन्मकथन ॥ तृतीयाध्यायीं हेचि कथा ॥५१॥
कौसल्या सुमित्रा कैकयीप्रती ॥ डोहाळे पुसों गेला नृपती ॥ श्रीरामध्यान जन्मस्थिती ॥ चतुर्थाध्यायीं हेचि कथा ॥५२॥
श्रीरामाचे मौंजीबंधन ॥ ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥ विश्वामित्र मागे रघुनंदन ॥ हें निरूपण पंचमाध्यायीं ॥५३॥
योगवासिष्ठकथन ॥ मायेनें गाधिज केला दीन ॥ वेदांतभागनिरूपण ॥ सहावा संपूर्ण जाणावा ॥५४॥
ताटिका मर्दूनि याग रक्षिला ॥ अहल्योद्धार पुढें केला सातव्यामाजी संपूर्ण ॥५५॥
आठव्यामाजी सीतास्वयंवर ॥ आपमानिला दशकंधर ॥ लग्न लागलें जिंकिला फरशधर ॥ आला रघुवीर अयोध्येसी ॥५६॥
राज्यीं बैसतां रघुनाथ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ त्याकरितां दुःखी दशरथ ॥ नवमाध्यायीं हेंचि कथा ॥५७॥
श्रीराम वनासी निघाला ॥ कौसल्येनें शोक केला ॥ जान्हवीतीरा श्रीराम आला ॥ दशमाध्यायीं हेचि कथा ॥५८॥
मग दशरथें त्यागिला प्राण ॥ भरत आला मातुलगृहाहून ॥ भक्तिरस दिव्य निरूपण ॥ गोड बहुत अकरावा ॥५९॥
चित्रकूटीं भेटला रघुनंदन ॥ भरतें बहुत केलें स्तवन ॥ नंदिग्रामीं भरत स्थापन ॥ हें निरूपण बाराव्यांत ॥१६०॥
बहुत ऋषींचे दर्शन घेता जाहला रघुनंदन ॥ अगस्तीचा महिमा पूर्ण ॥ तेराव्यांत कथियेला ॥६१॥
शूर्पणखा विटंबून ॥ वधिले त्रिशिरा खरदूषण ॥ दशमुखासी वर्तमान ॥ हेचि कथा चवदाव्यांत ॥६२॥
मृग वधूं गेला रघुनंदन ॥ सीता घेऊनि गेला रावण ॥ जटायु वधिला कपटेंकरून ॥ पंधराव्यांत हेचि कथा ॥६३॥
सीताविरहे राम व्यापिला ॥ त्यावरी जटायु उद्धरिला ॥ पंपासरावरीं आला ॥ सोळाव्यांत हेचि कथा ॥६४॥
वाळिसुग्रीवांची उत्पत्ती ॥ मग शक्रसुत वधी रघुपति ॥ सत्रावें अध्यायी निश्चिती ॥ कथा हेचि निश्चयें ॥६५॥
तारेप्रति बोध करून ॥ शुद्धीस गेले वानरगण ॥ समुद्रातीरीं संपातीदर्शन ॥ हें निरूपण अठराव्यांत ॥६६॥
समुद्र उल्लंघून लंका शोधून ॥ रावणसभा विटंबून ॥ विजयी जाहला वायुनंदन ॥ हें चरित्र एकुणिसाव्यांत ॥६७॥
हनुमंतास सीतादर्शन ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥ वधिला अखया आणि राक्षस संपूर्ण ॥ हेचि कथा विसाव्यांत ॥ ६८॥
इंद्रजिताचें विटंबन ॥ रावणा छळूनि लंकादहन ॥ किष्किंधेसी आला अंजनीनंदन ॥ हेचि कथा एकविसाव्यांत ॥६९॥
ब्रह्मपाशबंधन ॥ मिष घेऊनि वायुनंदन ॥ सागरीं पुच्छ विझवून ॥ सुवेळेसी पातला ॥१७०॥
ब्रह्मपत्र वाचून ॥ समुद्रतीरास आला रघुनंदन ॥ मग बिभीषणें बोधिला रावण ॥ हेचि कथा बाविसाव्यांत ॥७१॥
मग बिभीषण भेटे श्रीरामास येऊन ॥ सागरदर्शन सेतुबंधन ॥ सुवेळेसी आला सीतारमण ॥ हें निरूपण तेविसाव्यांत ॥७२॥
कापट्य दाविलें सीतेसी ॥ मंदोदरी भेटली जनककन्येसी ॥ मग सुग्रीवे त्रासिले रावणासी ॥ कथा हेच चाविसाव्यांत ॥७३॥
अंगदें बोधिला रावण ॥ अपार युद्ध जाहले दारुण ॥ नागपाशीं बांधिले रामलक्ष्मण ॥ हे लीला पंचविसाव्यांत ॥७४॥
प्रहस्तवध मंदोदरीनीति ॥ मग युद्धा आला लंकापति ॥ तो पराभव पावला निश्चतीं ॥ हे चरित्र सव्विसाव्यांत ॥७५॥
जागा केला कुंभकर्ण ॥ त्यावरी युद्ध जाहले दारुण ॥ समरीं घटश्रोत्रें दिधला प्राण ॥ हें निरूपण सत्ताविसाव्यांत ॥७६॥
नरांतकादि सहाजण पाडिले ॥ शक्रजितें शरजाल सोडिलें ॥ मारुती द्रोणाचळ आणि ते वेळे ॥ अठ्ठाविसाव्यांत हेंचि कथा ॥७७॥
निकुंभिलेसी जाऊन ॥ वानरीं होम विध्वंसून ॥ शक्रजितासी मारी लक्ष्मण ॥ एकुणतिसाव्यांत हेचि कथा ॥७७॥
तिसाव्यांत सुलोचना गहिंवर ॥ एकतिसाव्यांत अहिमहिसंहार ॥ शक्ति भेदोनी निर्धार ॥ बत्तिसावा संपूर्ण पैं ॥७९॥
रावणाचा होम विध्वंसून ॥ अपार माजविलें तेव्हां रण ॥ रावण वधोनि स्थापिला बिभीषण ॥ हे चरित्र तेतिसाव्यांत ॥१८०॥
जानकीनें दिव्य देऊन ॥ मग इंद्र वर्षला अमृतपर्जन्य ॥ देवस्थाना गेले स्तवून ॥ हे कथा संपूर्ण चौतिसाव्यांत ॥८१॥
पुष्पकी बैसोन रघुनंदन ॥ घेतलें अगस्तीचें दर्शन ॥ त्यावरी भरतभेटी पूर्ण ॥ हें चरित्र पस्तिसाव्यांत ॥८२॥
नंदिग्रामीं राहिला राघवेश ॥ मग केला अयोध्याप्रवेश ॥ राज्यीं स्थापून रामास वानर गेले स्वस्थाना ॥८३॥
छत्तिसावें अध्यायीं जाण ॥ हेचि कथा असे पूर्णं ॥ एकोणचाळीस अध्यायीं कौतुक गहन ॥ लहूकुशाख्यान गोड पैं ॥८४॥
चाळिसाव्यांत रघुवीरें ॥ मृत्यु पावलीं ऋषींचीं कुमरें ॥ किरात वधोनियां त्वरें ॥ बाळें माघारी आणिली ॥८५॥
चाळीस अध्यायपर्यंत ॥ रामविजय सपूर्ण ग्रंथ ॥ श्रवणमननें पुरे अर्थ ॥ जाणती पंडित विवेकी ॥८६॥
रामविजय ग्रंथ नृपती ॥ चाळिस अध्याय वीर निश्चितीं ॥ दोषदळ संहारिती ॥ प्रचंड प्रतापी वीर हे ॥८७॥
कीं रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें चाळीस खणांचे दिव्य मंदिर ॥ सीतेसहीत रघुवीर ॥ क्रीडा करित तेथें पैं ॥८८॥
कीं हें चाळिस खणांचे वृंदावन ॥ रघुनाथकथा तुळसी पूर्ण ॥ दृष्टांत ती पत्रें जाण ॥ आवर्तन प्रदक्षिणा भक्त करिती ॥८९॥
रामविजय ग्रंथ मंदिर ॥ चाळीस कोठड्या अति सुंदर ॥ साहित्य द्रव्य अपार ॥ माजी भरलें न गणवें ॥१९०॥
कीं ग्रंथ हा वासरमणी ॥ वेष्टिला असे दृटांत किरणीं ॥ कीं साहित्य तारागणीं ॥ ग्रंथचंद्र वेष्टिला ॥९१॥
कीं ग्रंथ हाचि रघुवीर ॥ दृष्टांत हे त्याचे वानर ॥ मारूनि अहंदशकंधर ॥ विजयरूप सर्वदा ॥९२॥
रामविजय मांदुस आळी ॥ आंत होती चाळीस कोहळीं ॥ नररत्नद्रव्यें पूर्ण भरली ॥ मज दिधली ब्रह्मानंदें ॥९३॥
पळालें भवदुःखदरिद्र ॥ भाग्य घरा आलें अपार ॥ कीं ग्रंथ हा पंढरीनगर ॥ दृष्टांत अपार यात्रा तेथें ॥९४॥
रामविजय रत्नखाणी ॥ वर्णितां धन्य जाहली वाणी ॥ ब्रह्मानंदकृपेकरूनीं ॥ ग्रंथ सिद्धीस पावविला ॥९५॥
आनंदसांप्रदाय पूर्ण ॥ वाढत आले मुळींचे ज्ञान ॥ सृष्टीचे आदिकाळी कमलासन ॥ उपदेशिला नारायणें ॥९६॥
पद्मोद्भवें तेंचि ज्ञान ॥ अत्रीस दिधलें संपूर्ण ॥ त्याचे पोटीं आदिपुरुष जाण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९७॥
दत्तात्रेयें ज्ञान शुद्ध ॥ सांगूनि बोधिला सदानंद ॥ तेथूनि रामानंद प्रसिद्ध ॥ यतीश्वर अगाध पैं ॥९८॥
तेथोनि मंगलानंद ईश्वर ॥ गंभीर ज्ञानानंद दिवाकर ॥ सहजानंद योगेश्वर ॥ कल्याणधामवासी जो ॥९९॥
तेथूनि पूर्णानंद महायतिराज ॥ जो तपोज्ञानें तेजःपुंज ॥ तेथोनि दत्तानंद यति सहज ॥ पूर्ण दत्तात्रेय अवतार ॥२००॥
त्या दत्तात्रेयाचे उदरीं शुद्ध ॥ पूर्ण अवतरला ब्रह्मानंद ॥ पिता आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोचि माझा जाणिजे ॥१॥
पंढरीहूनि चार योजनें दूरीं ॥ नैऋत्यकोनीं नाझरें नगरी ॥ तेथील देशलेखक निर्धारी ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२॥
मग पंढरीस येऊन ॥ विधीनें केलें संन्यासग्रहण ॥ भीमातीरीं समाधिस्थ पूर्ण ॥ ब्रह्मानंद यतिराव ॥३॥
तों ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्रीधरें वंदोनियां उभयतां ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥४॥
शके सोळाशे पंचवीस ॥ सुभानु नाम संवत्सरास ॥ भानुसप्तमी शुद्ध विशेष ॥ श्रावणमास विख्यात पैं ॥५॥
पंढीरीक्षेत्रीं निश्चयेंसीं ॥ ग्रंथ संपविला ते दिवशीं ॥ लेखक आणि श्रोतयांसी ॥ कल्याण असो सर्वदा ॥६॥
सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशीं जन्मला रघुवीर ॥ भानु आणि रोहिणीवर ॥ तोंवरी ग्रंथ असो हा ॥७॥
ब्रह्मानंद पांडुरंगा ॥ श्रीधरवरदा पूर्ण अभंगा ॥ पुराणपुरुषा भक्तभवभंगा ॥ श्रोता वक्ता तूंचि पैं ॥८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चत्वारिंशत्तमोध्याय गोड हा ॥२०८॥
श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥अध्याय॥ ॥४०॥
ओंव्या ॥२०९॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥