जून ६ - परमार्थ

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले , तरी त्याच्याखाली पाणीच असते . असत्य हे नेहमी सत्याला धरुनच राहाते . जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया . तिला आपण खरे मानतो . मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते . आपण मायेच्या पाठीमागे जातो , पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो . जन्माच्या वेळेस ‘ सोऽहं ’ म्हणत होता , नंतर कोऽहं म्हणू लागला आणि शेवटी ‘ देहच मी ’ म्हणू लागला ! वास्तविक , सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत , त्याप्रमाणे ‘ भगवंत ’ आणि ‘ मी ’ वेगळे नाहीत .

सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते , म्हणजे परमात्मस्वरुप होय . सच्चिदानंदस्वरुपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात . भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय . ‘ मला कळत नाही ’ असे वाटणे , ही परमार्थाची पहिली पायरी आहे ; आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय . ‘ जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे , मी फक्त कर्तव्यापुरता आहे , ’ असे वाटणे , यालाच निष्काम कर्म असे म्हणतात ; आणि ‘ आले तर भोगले , गेले तर सोडले ’, हे सहजकर्म होय . दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय ; आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात . ‘ अमुकच फळ मला मिळावे ’ ही वृत्ती सोडणे , याचे नाव निरासक्ती होय . विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात . थोडक्यात म्हणजे , जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान , आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे . कर्ममार्ग , उपासनामार्ग , नवविधाभक्ती , इत्यादि सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते . लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन , दुसरा कमी करीन , असे माणूस म्हणतो , पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे ; त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय . आपली देहबुध्दी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये . भगवंताच्या , स्वरुपदर्शनाच्या आड माझ्या देहबुध्दीचा पर्वत येतो . सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो . नामस्मरणाने हे काम लवकर होते , आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे . ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरुप व्हावे . आपण प्रयत्न करीत असताना , भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरुन नेईल याची खात्री बाळगा , आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा .

N/A

References : N/A
Last Updated : June 05, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP