कुंजर दृष्टीं देखोन ॥ उगा न राहे पंचानन ॥ कोणास न पुसतां मित्रनंदन ॥ अकस्मात उडाला ॥५१॥
वज्र पडे पर्वतशिखरी ॥ तैसा सुग्रीव ते अवसरीं ॥ येऊन आदळला रावणावरी ॥ परमावेशें करूनियां ॥५२॥
सव्यहस्तचपेटेतळीं ॥ दाही छत्रे खाली पाडिलीं ॥ वामहस्तघायें तळीं ॥ मुगुट सर्व पाडिले ॥५३॥
जैसी विंध्याद्रीवरी अकस्मात ॥ विद्युल्लता येऊन पडत ॥ तैसा अर्कजें केलें विपरीत ॥ लंकानाथ घाबरला ॥५४॥
मग लत्ताप्रहार ते वेळां ॥ सुग्रीवानें समर्पिला ॥ सवेंच हृदयीं दिधला ॥ मुष्टिघात ते वेळीं ॥५५॥
मल्लयुद्ध परम अद्भुत ॥ जाहलें एक घटिका पर्यंत ॥ रावण म्हणे वाळीऐसें त्वरित ॥ धरून नेईल सुग्रीव हा ॥५६॥
रामापाशी नेऊन त्वरित ॥ विंटंबील सूर्यसुत ॥ पळावयासी निश्र्चित ॥ मार्ग कोठे दिसेना ॥५७॥
षोडश खणांचे गोपुर ॥ तयावरूनि महावीर ॥ कोसळले तेव्हां लंकानगर ॥ गजबजिलें एकदांचि ॥५८॥
एक म्हणती आला हनुमंत ॥ नगर जाळावया समस्त ॥ एक म्हणती समुद्रांत लंका घालील पालथी ॥५९॥
असो तेव्हां दशकंधर ॥ चुकवोनियां पैं सत्वर ॥ पळाला वेगें जैसा तस्कर ॥ जागा होतां गृहस्वामी ॥१६०॥
मृगेंद्राचे कवेंतून देख ॥ पूर्वभाग्यें सुटला जंबुक ॥ कीं भुजंगकवेंतूनि मूषक ॥ पळोनि जाय स्वस्थळा ॥६१॥
असो सुग्रीव तेथोनि उडाला ॥ सुवेळागिरीं पावला ॥ एकचि जयजयकार जाहला ॥ हृदयीं धरिला रघुनाथें ॥६२॥
वृदाकर गगनींहूनी ॥ पुष्पें वर्षती ते क्षणीं ॥ धन्य सुग्रीव म्हणोनी ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥६३॥
श्रीराम सूर्यकुमरा ॥ आजी बृहस्पति चेवला विचारा ॥ तैसें तूं महावीरा ॥ केलें होतेस विपरीत ॥६४॥
समीप असतां सर्व दळें ॥ पुढें उडी न घालावी भूपाळें ॥ असो जय पावला शीघ्रकाळें ॥ हाच लाभ थोर आम्हां ॥६५॥
तेव्हां आणोनि पुष्पजाती ॥ वानरीं पूजिला किष्किंधापती ॥ दळभारेंसी सीतापती ॥ पूर्वस्थळास उतरला ॥६६॥
सकळ जुत्पत्तिंसह रघुनंदन ॥ बैसला तेव्हा सभा करून ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥ अवघे जवळी बैसले ॥६७॥
राजाधिराज रामचंद्र ॥ जो चातुर्यगुणसमुद्र ॥ राजनीति बहुविचार ॥ करिता झाला ते समयीं ॥६८॥
म्हणे आतां द्विपंचवदन ॥ सीता नेदी युद्धाविण ॥ यावरी मग बिभीषण ॥ बोलता जाहला तेधवां ॥६९॥
म्हणे साम दाम दंड भेद करून ॥ शत्रु कीजे आपणाधीन ॥ ओळखूनि समयाचेंं चिन्ह ॥ तैसें चातुरीं वर्तावें ॥१७०॥
मंत्रें आकर्षिजे विखार ॥ उदकें शांतविजे वैश्र्वानर ॥ वेदांतज्ञानें भवसमुद्र ॥ उतरूनि जावें पैलतीरा ॥७१॥
कामक्रोधादि शत्रु थोर ॥ विवेकें जिंकावे साचार ॥ भक्तिबळें सर्वेश्र्वर ॥ आपणाधीन करावा ॥७२॥
शमदमबळेंकरून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥ व्यत्पुत्तीच्या बळेंकरून ॥ अर्थ काढिती पंडित ॥७३॥
पाषाणाखाली सांपडे हात ॥ तो युक्तीनें काढावा अकस्मात ॥ बळें करूनि ओढितां प्राप्त ॥ व्यथा मात्र होय पैं ॥७४॥
तैसे आधीं साम करून ॥ वश करावा द्विपंचवदन ॥ समयोचित जाणे ज्ञान ॥ ऐसा शिष्टाईस पाठवा ॥७५॥
सभेसि बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा बृहस्पति प्रवीण ॥ सरस्वती जयासी प्रसन्न ॥ यमयोचित शब्द देत ॥७६॥
वेदशास्त्रपुराण ॥ हे जयासी करतलामलक पूर्ण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभास्थानीं तेवी दिसे ॥७७॥
जरी वरी लोटले शत्रु समस्त ॥ ते समयीं जैसा वैवस्वत ॥ जैसा कलशोद्भव निश्र्चित ॥ शत्रुसागर प्राशावया ॥७८॥
हृदय निर्मळ कपटरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥ श्रेष्ठत्वें सभेंत विराजत ॥ शचीनाथ ज्यापरी ॥७९॥
ईश्र्वरीं जयाचे प्रेम ॥ संतांसी मित्रभाव परम ॥ आचरे सदा सत्कर्म ॥ क्रोध काम दवडोनीयां ॥१८०॥
यालागीं जगद्वंद्या राघवा ॥ या चिन्हीं मंडित बरवा ॥ ऐसा शिष्टाईस पाठवावा ॥ मयजाधवाजवळिकें ॥८१॥
तरी नर वानर रीस ॥ कोणास पाठवूं शिष्टाईस ॥ तुम्ही आम्हीं किष्किंधाधीश ॥ विचार एक काढावा ॥८२॥
वारणचक्रांत रिघोन ॥ स्वकार्य साधी पंचानन ॥ कीं एकलाचि जाऊन सुपर्ण ॥ अमृतकुंभ घेऊन आला ॥८३॥
एकलाच जाऊन गुरुपुत्र ॥ साधून आला संजीवनी मंत्र ॥ कीं सागर उडोनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि पातला ॥८४॥
तैसेंचि कार्य साधून ॥ सत्वर येई परतोन ॥ ऐसा पाठवावा निवडोन ॥ शीघ्रकाळीं तत्वतां ॥८५॥
ऐसें बोलतां बिभीषण ॥ परम संतोषला रघुनंदन ॥ म्हणे धन्य तुझें ज्ञान ॥ सकळकळाप्रवीण होसी ॥८६॥
रत्नराशी पडल्या अपार ॥ त्यांत अनर्घ्यरत्न प्रभाकर ॥ परीक्षक निवडती तैसा वीर ॥ वाळिपुत्र काढिला ॥८७॥
बिभीषण म्हणे राजीवनेत्रा ॥ जलदवर्णा चारुगात्रा ॥ पद्मोद्भवजनका स्मरारि मित्रा ॥ अंगदासी पाठवावें ॥८८॥
हा सर्व लक्षणी आहे चतुर ॥ जैसा नवग्रहांत दिनकर ॥ कीं विखारांत धरणीधर ॥ तैसा वानरांत अंगद हा ॥८९॥
कीं शास्त्रांमाजी वेदांत ॥ शस्त्रांत सुदर्शन लखलखित ॥ कीं पक्ष्यांमाजी विनतासुत ॥ बळें उद्भुत तैसा हा ॥१९०॥
ऐकतां तोषला रघुनंदन ॥ म्हणे हे तुम्ही उतम निवडिलें रत्न ॥ तंव तो अंगद कर जोडून ॥ रघुपतीप्रति बोलत ॥९१॥
म्हणे पुराणपुरुषा परमानंदा ॥ भक्तहृत्पद्मकोशमिलिंदा ॥ जगदंकुरमूळकंदा ॥ आज्ञा काय ते मज द्यावी ॥९२॥
राजीवाक्षा रणरंगधीरा ॥ असुरकाननवैश्र्वानरा ॥ जनकजामाता अतिउदारा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९३॥
चराचरफलांकितद्रुमा ॥ विशाळभाळा पूर्णकामा ॥ अजअजित आत्मारामा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९४॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ ये क्षणीं येथें आणूं बांधोन ॥ कीं हे लंका उचलून ॥ घालूं पालथी सागरीं ॥९५॥
ऐकोन अंगदाचे बोल ॥ संतोषला तमालनीळ ॥ म्हणे धन्य तो वाळी पुण्यशीळ ॥ अद्भुत बळ तयाचें ॥९६॥
कक्षेसी दाटोनि रावण ॥ चतुःसमुद्रीं केले स्नान ॥ त्याचे पोटी पुत्रनिधान ॥ बळ गहन तैसेंच तुझें ॥९७॥
तरी लंकेसी जाऊन ये समयीं ॥ रावणासी करी शिष्टाई ॥ म्हणावे जानकीस देईं ॥ सामोपचारें करूनियां ॥९८॥
तुवां मज न कळतां येऊन ॥ चोरिले जानकीचिद्रत्न ॥ तरी एकदा क्षमा केली पूर्ण ॥ देईं आणोनि झडकरी ॥९९॥
सीता देतांचि तात्काळ ॥ तूं लंकेसी नांदसी अचळ ॥ नाही तरी निर्मूळ कु ळ ॥ तुझें करीन निर्धारें ॥२००॥
ऐसें ऐकतां वाळिसुत ॥ नमसकारिला जनकजामात ॥ आज्ञा घेऊन त्वरित ॥ गगनपंथें उडाला हो ॥१॥
दशमुखाचे सभेआंत ॥ उतरता जाहला अकस्मात ॥ कीं वानररूपें जैसा आदित्य ॥ एकाएकीं प्रगटला ॥२॥
कीं वैकुंठाहूनि सर्पारी ॥ अवचिता येत उर्वीवरी ॥ कीं कर्मभूमीस निर्धारी ॥ योगभ्रष्ट उतरला ॥३॥
दृष्टीं देखतां अंगदवीर ॥ चमकले सभेचे असुर ॥ शस्त्रें उभारूनि समग्र ॥ सरसावले ठायी ठायी ॥४॥
म्हणती एकचि आला वानर ॥ तेणें पूर्वी जाळिलें लंकानगर ॥ सुग्रीवें गोपुरीं येऊनि समग्र ॥ छत्रे पाडिली रावणाचीं ॥५॥
हा निर्भय निःशंक बहुत ॥ एकलाचि आला सभेआंत ॥ असो चहुंकडे तारासुत ॥ पाहे न्याहाळोनि सभेतें ॥६॥
मग बोले वाळिनंदन ॥ सभेस आला जो परमस्थळींहून ॥ त्यासी न पुसती सभाजन ॥ तरी ते शतमूर्ख जाणावे ॥७॥
श़ृगालसभेत पंचानन ॥ येतां दचकती अवघेजण ॥ कीं देखतां विनतानंदन ॥ विखार जैसे दचकती ॥८॥
कीं उदया येतां दिनकर ॥ दिवाभीतें विटती समग्र ॥ कीं इंदु विलोकितां तस्कर ॥ कंटाळिती जैसे कां ॥९॥
कीं पंडित येतां सभेप्रति ॥ मनी विटती अल्पमति ॥ कीं ते कोकिळ गर्जती वसंतीं ॥ वायस मानिती संताप ॥२१०॥
दृष्टीं देखतां संतभक्त ॥ निंदक विटती समस्त ॥ तैसे तुम्ही राक्षस उन्मत्त ॥ मज देखतां त्रासलेती ॥११॥
मग सभास्तंभ पृष्ठीं घालून ॥ पुच्छासनीं बैसे वालिनंदन ॥ उंच दिसे रावणाहून ॥ तेजें करूनी विशेष ॥१२॥
म्हणे गर्विष्ठा दशवदना ॥ मी आलों असे कवण्या कारणा ॥ तें कां न पुससी मलिना ॥ कोणें विचारें सांग पां ॥१३॥
मी आहे शक्रात्मजसुत ॥ अयोध्यापतीचा असें दूत ॥ तरी मी शिष्टाईस आलों येथ ॥ अंतर तुझें पहावया ॥१४॥
याउपरी वीर अंगद ॥ रावणासी करील बोध ॥ तें संतीं परिसावें विशद ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥१५॥
रविकुलभूषण रघुवीर ॥ जो साधुहृदयपंकजकीर ॥ तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग साचार न विटे कदा ॥१६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ चतुर्विंशतितमोध्याय गोड हा ॥२१७॥
अध्याय ॥२४॥