अध्याय पंचवीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


वधोनियां खरदूषण ॥ निष्कंटक केलें जनस्थान ॥ त्या रामपंचाननाची वस्तु चोरून ॥ घेऊन आलासी जंबुका ॥५१॥

होमशाळेंत रिघोन श्र्वान ॥ पळे पुरोडाश घेऊन ॥ कीं देवगृहांत मलिन ॥ हिंसक जैसा संचरे ॥५२॥

की गृहीं नसतां मुख्य धनी ॥ तस्कर रिघे कोशसदनीं ॥ तैसी जानकी उचलोनि ॥ आलासि घेऊन पतिता ॥५३॥

त्या तुज चोराचा काढीत माग ॥ सुवेळेसी आला सीतारंग ॥ तुझे आयुष्याची भरली सीग ॥ तें तूं नेणसी शतमूर्खा ॥५४॥

पुच्छीं पाय पडतां देख ॥ खवळे जैसा दंदशूक ॥ तैसा प्रतिउत्तर दशमुख ॥ अंगदासी देतसे ॥५५॥

म्हणे रे मर्कटा मी दशवदन ॥ वानरांसहित रामलक्ष्मण ॥ क्षणें टाकवीन गिळोन ॥ कुंभकर्णांतें सांगोनियां ॥५६॥

सुरांसहित सहस्रनयन ॥ बंदी घातला आकळून ॥ तेथें काय मानव रामलक्ष्मण ॥ जीतचि आणीन धरूनी ॥५७॥

गरुडें सर्पमस्तकींचा मणी ॥ नेला तो जरी देईल आणोनी ॥ तरी तुम्हांस जनकनंदिनी ॥ प्राप्त होईल माघारी ॥५८॥

गजमस्तक विदारून ॥ मुक्तें घेऊन गेला पंचानन ॥ तो भिऊन देईल जरी परतोन ॥ तरी जानकी देईन मी ॥५९॥

अरे इंद्र माळा गुंफोन ॥ नित्य देई मजलागून ॥ छत्र धरी रोहिणीरमण ॥ सहस्रकिरण दीपिका धरी ॥६०॥

रसनायक वाहे पाणी ॥ वस्त्रें धूत सदा अग्नि ॥ गृहींचा केर काढूनि ॥ लोकप्राणेश टाकीतसे ॥६१॥

ऐसा मी समर्थ दशवक्र ॥ तेथें कायसे नर -वानर ॥ मागें एक पालेखाइर ॥ चोरून लंकेत आला होता ॥६२॥

तेणें उपडितां अशोकवन ॥ आम्ही सभेस आणिलें धरून ॥ पुच्छास लावितां अग्न ॥ नगर जाळूनि पळाला ॥६३॥

तो पुन्हां भेटेल जरी वानर ॥ तरी तात्काळचि करीन चूर ॥ मग म्हणे वाळीपुत्र ॥ ऐक मशका राक्षसा ॥६४॥

तुझें असंख्य दळ संहारून ॥ टाकिले सात पुत्र मारून ॥ इंद्रजित विवरीं कोंडून ॥ अशोकवन विध्वंसिलें ॥६५॥

तैं तुझें बळ रावणा ॥ कोठें गेलें होते खळा मलिना ॥ तुज शिक्षा करावया दुर्जना ॥ पुनः मारुति आला आहे ॥६६॥

त्रिभुवनपती सीतावल्लभ ॥ जो त्रैलोक्यनगरारंभस्तंभ ॥ त्यास मनुष्य म्हणसी तूं रासभ ॥ दशमुखाचा यथार्थ तूं ॥६७॥

इतर ओहळ आणि भागीरथी ॥ वरकड गज आणि ऐरावती ॥ उच्चैःश्रवा जो सूर्यरथीं ॥ इतर अश्र्वांसमान नोहे ॥६८॥

खद्योत आणि चंडकिरण ॥ किंवा काग आणि सुपर्ण ॥ तैसें वानर आणि वायुनंदन ॥ नव्हती समान राक्षसा ॥६९॥

परिस आणि इतर पाषाण ॥ वरकड पशू आणि शिववहन ॥ भगणें आणि रोहिणीरमण ॥ नव्हे समान राक्षसा ॥७०॥

इतर पर्वत आणि कनकाचळ ॥ इतर किरडें आणि फणिपाळ ॥ तैसा मनुष्यासमान ॥ तमालनीळ ॥ अपवित्रा तूं केंवि म्हणसी ॥७१॥

तूं दशमुखांचा बस्त होसी ॥ शिववरें मातलासी ॥ सीतादेवी निश्र्चयेसीं ॥ आदिमाया भवानी ॥७२॥

रणमंडळ हें होमकुंड ॥ राक्षस आहुती पडतील उदंड ॥ शेवटीं पूर्णाहूती प्रचंछ ॥ तुझी पडेल दशमुखा ॥७३॥

तुवां केलें वेदाध्ययन ॥ जैसा रासभावरी वाहिला चंदन ॥ कीं षड्रसांमाजी नेऊन ॥ दर्वीं जेवीं फिरविजे ॥७४॥

तूं दशमुखाचें वनचर ॥ तुज वधावया पारधी रघुवीर ॥ सुवेळाचळीं समरधीर ॥ येऊन उभा ठाकला ॥७५॥

अंगदशब्द परम कठीण ॥ हृदयीं खोंचती जैसे बाण ॥ परम सक्रोधें रावण ॥ वालीनंदनाप्रति बोले ॥७६॥

म्हणे रे मर्कटा वनचरा ॥ तूं भूभार झालासि पामरा ॥ तुझा पिता मारूनि तारा ॥ सुग्रीवासी दीधली ॥७७॥

पितृसूड न घेववे तुझेनि ॥ तरी प्राण देईं समुद्रजीवनीं ॥ अथवा माझे पाठीसी येऊनी ॥ रिघे वेगी मशका रे ॥७८॥

वधोनि सुग्रीव रघुनंदन ॥ तुज किष्किंधेचें राज्य देईन ॥ तुझी माता व्यभिचारिण ॥ सुग्रीवासी तिणें वरिलें ॥७९॥

सुग्रीव आणि रघुवीर ॥ तुझे मुख्य शत्रु साचार ॥ अंगद म्हणे शक्रकुमर ॥ रामबाणें मुक्त जाहला ॥८०॥

राघवप्रसादेंकरूनी ॥ वाळी अक्षय्य सायुज्यसदनीं ॥ दशमुखा तुज ये क्षणीं ॥ शिक्षा करीन पाहें पां ॥८१॥

माझिया पाणिप्रहारेंकरूनी ॥ दशमुखें तुझी टाकीन फोडूनी ॥ तुझा पुरुषार्थ त्रिभुवनीं ॥ सर्व जाणतो अपवित्रा ॥८२॥

सहस्रार्जुनाचे बंदी जाऊन ॥ पडला होतासि तूं कित्येक दिन ॥ तो तूं आजी येथें वदन ॥ दाखवितां न लाजसी ॥८३॥

मग बळीचे गृहा जाऊन देखा ॥ बंदीं पडिलासि तूं मशका ॥ तेथे तुज दासी झेलती कीटका ॥ कक्षेसीं दाटिती घडी घडी ॥८४॥

ऐसा पुरुषार्थी तूं देख ॥ न लाजसी दावितां मुख ॥ तुझे छेदावया दहाही मस्तक ॥ रघुवीर सिद्ध जाहलासे ॥८५॥

ऐसें ऐकोनि दशकंधर ॥ द्विजपंक्तीनें चावी अधर ॥ सवेगे ओढिलें शस्त्र ॥ विद्युत्प्राय ते काळीं ॥८६॥

सेवकांसी म्हणे दशकंठ ॥ धरारे वेगीं मर्कट ॥ तों चौघे राक्षस बळकट ॥ धांवोनियां धरिते जाहले ॥८७॥

अंगद दंडी दृढ धरिला ॥ वाळिपुत्रें देखोनि तेवेळां ॥ अद्भुत पराक्रम प्रकट केला ॥ क्षणमात्र न लागतां ॥८८॥

कृतांतकिंकाळीसमान ॥ हाकेसरसे गाजवी गगन ॥ रावणाचे हृदयी पूर्ण ॥ पुच्छघाय दिधला ॥८९॥

रावण मस्तकींचा मुकुट तेजाळ ॥ पदांगुष्ठें उडविला तात्काळ ॥ ऊर्ध्व उडाला सबळ ॥ मंडपमस्तकी बैसला ॥९०॥

चौदा गांवें जो विस्तीर्ण ॥ प्रभेस उणा चंडकिरण ॥ तो घेऊन वाळिनंदन ॥ गेला क्षण न लागतां ॥९१॥

भुजीं जडले चौघेजण ॥ त्यांचे अंतराळी गेले प्राण ॥ लोंबती प्रेते होऊन ॥ वाळिनंदन जातसे ॥९२॥

आला देखोनि वाळिसुत ॥ आश्र्चर्य करी जनकजामात ॥ अंगद उतरला अकस्मात ॥ कपिनाथ हर्षले ॥९३॥

दंडीची प्रेतें सोडवूनी ॥ मंडप तेव्हां ठेविला धरणी ॥ त्रिभुवनपतीचे चरणीं ॥ मस्तक अंगद ठेविला ॥९४॥

प्रीतीनें येऊनि मिलिंद ॥ सेवी पद्मकोशींचा सुगंध ॥ तैसाच वीर अंगद ॥ रघुवीरपदाब्जीं मीनला ॥९५॥

मग तो जगदानंदकंद ॥ आलिंगी हृदयीं प्रेमें अंगद ॥ सकळ कपींसी आनंद ॥ वाळिपुत्रासी भेटतां ॥९६॥

रावणाचा मुकुट तेवेळां ॥ अंगदें रामापुढें ठेविला ॥ तो बिभीषणाचे मस्तकीं घातला ॥ दशरथात्मजें ते वेळीं ॥९७॥

अंगदास म्हणे रघुनंदन ॥ मंडप येथें आणिला उचलोन ॥ पुढें कोठें बैसेल बिभीषण ॥ सिंहासन घालूनियां ॥९८॥

ऐसें वाळिसुतें ऐकोनी ॥ मंडप उचलिला ते क्षणीं ॥ शेष मस्तकीं धरी अवनी ॥ तैसा घेऊन जातसे ॥९९॥

जेथींचा तेथें मंडप ठेविला ॥ सुवेळेसी परतोन आला ॥ राक्षससमुदाय ते वेळां ॥ आश्र्चर्य परम मानित ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP