नववा स्कंध - अध्याय ३

’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.


श्रीशुकाचार्य म्हणतात -

मनुपुत्र राजा शर्याती वेदपारंगत होता . त्याने अंगिरा ऋषीच्या यज्ञामध्ये दुसर्‍या दिवसाचे कर्म सांगितले होते . ॥१॥

त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती . एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता च्यवन ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचला . ॥२॥

सुकन्या आपल्या मैत्रिणीसह वनात फिरत -फिरत झाडांचे सौंदर्य पाहात होती . तिने एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणार्‍या दोन ज्योती पाहिल्या . ॥३॥

दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले . त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले . ॥४॥

त्याचवेळी राजा शर्यातीच्या सैनिकांचे मल -मूत्र थांबले . हे पाहून शर्यातीला अत्यंत आश्चर्य वाटले . तो आपल्या सैनिकांना म्हणाला . ॥५॥

" अरे ! तुम्ही महर्षी च्यवनांच्याबाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना ? आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कुत्य केले असावे ." ॥६॥

तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली , "माझ्याकडूनच काही चूक घडली आहे . अजाणतेपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे . " ॥७॥

आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला . त्याने स्तुती करुन वारुळात असलेल्या च्यवन -मुनींना कसेबसे शांत केले . ॥८॥

त्यानंतर च्यवन -मुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला . ॥९॥

इकडे सुकन्या अतिशय रागीट च्यवन -मुनीना पती म्हणून स्वीकारुन अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेचवागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करु लागली . ॥१०॥

काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनीकुमार आले . च्यवन मुनींना त्यांचे यथोचित स्वागत करुन म्हटले , "आपण दोघेजण समर्थ आहांत ; म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा . तरुण स्त्रियांना आवडणारे रुप आणि वय मला द्या .आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत , हे मी जाणतो . तरीसुद्वा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देईन ." ॥११॥१२॥

वैद्यशिरोमणी अश्विनीकुमारांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद देऊन म्हटले , " ठीक आहे ." आणि त्यांना सांगितले की " हे सिद्वांनी बनविलेले कुंड आहे . आपण याच्यामध्ये स्नान करावे . " ॥१३॥

च्यवन मुनीचे शरीर म्हतारपणाने व्यापले होते . सर्व अंगावर शिरा दिसत होत्या . सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरुप दिसत होते . आपल्या -बरोबर त्यांना घेऊन अश्विनीकुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला . ॥१४॥

नंतर त्या कुंडातुन तीन पुरुष बाहेर आले . त्या तिघांच्याही गळ्यात कमळांच्या माळा , कानांत कुंडले होती . त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती . तिघेही एकसारखे दिसत होते . ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील , असे होते . ॥१५॥

साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत , असे पाहिले , तेव्हा त्यांतून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनीकुमांराना शरण गेली . ॥१६॥

तिचे पातिव्रत्य पाहून अश्विनीकुमार संतुष्ट झाले . त्यांनी तिला तिचा पति दाखविला आणि नंतर च्यवन मुनीची आज्ञा घेऊन विमानातुन ते स्वर्गाकडे गेले . ॥१७॥

एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरिता शर्याती च्यवन मुनीच्या आश्रमात आला . तेथे त्याने पाहिले की , आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे . ॥१८॥

सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले . शर्यतीने तिला आशिर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले . ॥१९॥

कुलटे ! हे तू काय केलेस ? सर्वाना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलेस ! तू त्यानां म्हतारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस . ॥२०॥

तुझा जन्म तर फार मोठया कुळात झाला होता . ही उलटी बुद्वी तुला कशी सुचली ? तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे . तू निर्लज्जपणे जाराची सेवा करु लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्य व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस !" ॥२१॥

राजा शर्यातीने असे म्हटल्यांनतंत पवित्र हास्य करणार्‍या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले , "बाबा ! हे आपले जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत . " ॥२२॥

यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनांच्या तारुण्य , आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला . तो ऐकून शर्याती आश्चर्यचकीत झाला . त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले . ॥२३॥

महर्षी च्यवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसूनसुध्दा आपल्या प्रभावाने अश्विनीकुमारांना सोमपान करविले . ॥२४॥

शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले . महर्षी च्यवनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला . ॥२५॥

तेव्हा सर्व देवांनी अश्विनीकुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले . वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनीकुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते . ॥२६॥

परीक्षिता ! शर्यातीला उत्तानबर्ही , आनर्त आणि भुरिषेण असे तीन पुत्र होते . आनर्तापासून रेवत झाला . ॥२७॥

महाराज ! रेवतीने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी वसविली होती . तेथेच राहून तो आनर्त इत्यादी देशांवर राज्य करीत होता . ॥२८॥

त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते . त्यांपैकी सर्वात थोरला ककुद्मी होता . ककुद्मी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्या -साठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्यदेवाकडे रजतमरहित ब्रह्यलोकात गेला . ब्रह्यलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला . ॥२९ -३०॥

त्यानंतर ब्रह्यदेवांना नमस्कार करुन त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला . त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्यदेव हसून त्याला म्हणाले . ॥३१॥

राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास , ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत . आता त्यांचे मुलगे , नातू , पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्वा शिल्लक नाहीत . ॥३२॥

मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युंगाचा काळ निघून गेला आहे . म्हणून तू जा . यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत . ॥३३॥

राजा ! त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर . ज्यांचे नाम , लीला इत्यादींचे श्रवण -कीर्तन अतिशय पवित्र आहे , तेच प्राण्याचे जीवनसर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत . ककुद्मीने ब्रह्यदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्य चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला . यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे -तिकडे कुठेतरी निवास करीत होते . ॥३४ -३५॥

ककुद्मीने आपली सर्वागसुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या बदरीकाश्रमाकडे निघून गेला . ॥३६॥

अध्याय तिसरा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP