मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र एकोणचाळिसावी

श्यामची आई - रात्र एकोणचाळिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती."सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरुण तिने घातले. स्वत:च्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरुप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे - ध्रुवपद असे होते.
मेणकापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते, तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरु केले. सकाळी बिरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी ते गाळून घेई; नाहीतर त्यात लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून त्यांचा रसही ती देत असे. सार्‍या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. सार्‍या जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.
"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?" आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले. म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.
"अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी.दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर."मावशी म्हणाली.
"नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही." आई म्हणाली.
आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता. पुढेच होता. मुंबईहून माझा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.
आईला पाहून त्याला भडभडून आले."आई! काय, ग, ही तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस, आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!" असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे ह्रदय दुभंग झाले.
आई म्हणाली,"चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे. तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतोस. तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रुपयांतून त्यांना पाच रुपये पाठविलेस -- खरेच मूठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात -- चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे--आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरु नका." आई जणू निरवनिरव करीत होती;
"आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायाच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?" दादा गहिवरुन बोलत होता.
आई विचार करुन हळूच म्हणाली, " गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रुपये पाठवीत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ."
दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या  तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्यांच्या तोंडावरुन डोक्यावरुन आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला." जा, बाळ; काळजी नको करु. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!" आईने संदेश दिला.
जड अंत:करणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार  मोठा कठीण, हेच खरे.

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP