शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ८

शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.


विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायला ।
शिवाजी कोकणांत गेला ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला ।
जमाव फौजेचा केला ॥
गोंवळकुंडी जाई मागून घेई तोफांला ।
फितीवलें कसें निजामाला ॥
करनाटकीं गेला भेटे सावत्रभावाला ।
वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभी व्यंकोजी हिस्सा देईना वळासी आला ।
आशेने फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला ।
बि-हाडीं रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला ।
कैदी नाहीं केलें भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला ।
खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला ।
करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दीला ।
निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधीं लढून घेई बिलरि किल्ल्याला ।
तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागे व्यंकोजीनें छापा घातला ।
घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला ।
शिवाजी रायगडी गेला ॥
विजापुरचा साह्य नेई राजे शिवाजीला ।
मोगल मुलखी सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळविला ।
सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला ।
घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला ।
वाट पुढें चालू लागला ॥
दुसरी फौज आडवी माहाराज राजाला ।
थोडसें तोंड दिलें तिजला ॥
काळया रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला ॥
धुळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्वां पोहंचला पटा किल्ल्याला ।
फसिवलें आयदी मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला ।
आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुराला ।
बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलांचा पराभव केला ।
ज्यानी मार्ग अडीवला ॥
विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला ।
केला महाग दाण्याला ॥
शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला ।
मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला ।
पाठवी शाहाजाहानाला ॥
जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला ।
लाविला नीट मार्गाला ॥
तह करुन शिवाजी नेती विजापुरला ।
यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचे सोवळें रुचलें नाहीं भावाला ।
व्यंकोजी मनीं दचकला ॥
निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला ।
निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीनें पत्र लिहिलें बंधु व्यंकोजीला ।
लिहितों पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र ह्यणवितां. गोसावी कसे बनला ।
हिरा कां भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी साह्याला ।
तुम्ही कां मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला ।
त्यागा ढोंगधतो-याला ॥
मन उत्तम कामीं तपा आपल्या फौजेला ।
संभाळा मुळ आब्रूला ॥
कीर्त्ति तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला ।
नित्य जपतों या जपाला ॥
कमी पडतां तुह्यी कळवा माझ्या लोकांला ।
सोडा मनच्या आढीला ॥
सुबोधाचें पत्र ऐकतां शुद्वीवर आला ।
व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला ।
रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला ।
शिवाजी सोसी दु:खाला ॥
यवनीं विरास भिडतां नाहीं कुचमला ।
शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी तापदहाला ।
नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला ।
एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला ।
पडले सुख यवनाला ॥
कूळवाडी मनीं खचले करती शोकाला ।
रडून गाती गुणांला ॥

॥चाल॥
महाराज आह्यासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ।
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाही पाउसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुद्वीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेतानें खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्तीनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥
चोरघरती घेई किल्ल्याला । आखेर करी लढाईला ॥
युद्वीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेई लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ॥
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षा चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेह-याची । कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ॥

॥चाल॥
भिडस्त भारी । साबडा धरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आप्त सोयरीं । ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
इंग्लीश ज्ञान होतां ह्यणे मी पुत्र क्षेत्र्याचा ।
उडवी फटटा ब्रम्ह्याचा ॥
जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा ।
मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥८॥
समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP