भाषणस्वातंत्र्य , इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण .
१९ . ( १ ) सर्व नागरिकांस ---
( क ) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ;
( ख ) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ;
( ग ) अधिसंघ वा संघ बनविण्याचा ;
( घ ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ;
( ड ) भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा ; [ ** आणि ]
( च ) * * * * * *
( छ ) कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याचा , हक्क असेल .
[ ( २ ) खंड ( १ ) चा उपखंड ( क ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता ], राज्याची सुरक्षितता , परकीय देशांशी मैत्रीचे संबंध , सार्वजनिक सुव्यवस्था , सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा . अवमान , अब्रूनुकसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही . ]
( ३ ) उक्त खंडाचा उपखंड ( ख ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता ] किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
( ४ ) उक्त खंडाचा उपखंड ( ग ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा ] सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
( ५ ) उक्त खंडामधील [ उपखंड ( घ ) व ( ड ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडांनी प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे , सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
( ६ ) उक्त खंडाचा उपखंड ( छ ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही , आणि विशेषतः [ उक्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे , जो कायदा ---
( एक ) कोणताही पेशा आचरण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याकरता आवश्यक असलेल्या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक अर्हता , किंवा
( दोन ) नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून अथवा अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार , धंदा , उद्योग किंवा सेवा चालवणे
यांच्याशी जेथवर संबद्ध असेल तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही . ]