अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण .
२० . ( १ ) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही . तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही .
( २ ) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही .
( ३ ) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही .
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण .
२१ . कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही .
[ शिक्षणाचा हक्क .
२१ क . राज्य , सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी , राज्यास विधिद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने , मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील . ]