भीमरूपी स्तोत्र - रुद्र हा समुद्र देखतांक्ष...

श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.


रुद्र हा समुद्र देखतांक्षणीं उठावला । शिराणिचें किराण सज्ज त्रीकुटास पाचला ।
वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला । नावरोनि वीवरोनि तो त्रिकूट पाहिला ॥१॥
हीन देव दीनरूप देखतांचि पावला । गहगडित घडघडित कडकडीत कोपला ।
लटि कूटि पाडि फोडि झोलि झोलि झोडला । दैत्म तोक एक हांक सर्व गर्व मोडिला ॥२॥
सानरूप पुच्छ तें स्वरूप गुप्त बैसला । कपीकेत शोध वेत त्रीकुटांत बैसला ।
गडगडी दिसेचिना बुझेल कोण कैसला । वळावळी चळाचळी विशाळ ज्वाळ जैसला ॥३॥
काळदंडसे प्रचंड ते तितंड जातसे । भारसार पुच्छभार होतसे ।
पाडिले पछाडिले रुधीरपूर व्हातसे । दैत्य बोलती बळें पळोन काय घ्यातसे ॥४॥
काळकूट तें त्रिकूत धूट धूत ऊठिलें । दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिलें ।
धोर मार तें भुमार लूट लूट लूटिले । चिर्डिलेचि घर्डिलेचि फूट फूट फूटलें ॥५॥
दाट थाट आटघाट तें कपाट घातलें । सर्व रोध तें निरोध श्रोर दु:ख पावले ।
सैन्य कट्ट त्यासि कट्ट कर्करून बांधिलें । थोर घात त्यांत पात चर्फडीत चेंदलें  ॥६
वज्र पुच्छ त्यासि तुच्छ मानिलें निशाचरीं । सर्वही खणखणाट ऊठिले घरोघरीं ।
फुटेचिना तुटेचिना समस्त भागले करीं । लटलटीत कांपती बहूत धाक अंतरीं ॥७॥
थोर थोर दूर दूर दाट दाट दाटलें । कोट मस्त तंग बस्त थाट थाट थाटलें ।
मंदिरीं घरोघरीं अचाट पुच्छ वाटलें । दैत्य नासतो घसा सकट काट काटले ॥८॥
हात पाय मान माज वोढितें पछाडितें अडचणींत अडकवूनि पीळ पेंच काढितें ।
लोहदंडसें अखंड राक्षसासि ताडितें । मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकूळ नाडितें ॥९॥
थोर धाक एक हांक त्रीकुटामत पावलें । घरोघरींच वळूवळी पुढें उदंड ऊरलें ।
बैसलें उदंड दैत्य ते सभेंत घूसले । सभा विटंबिली बळेंचि कोणसें न सूचलें ॥१०॥
देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हाललें । पुरोनि ऊरलें बळें सभेमधेंचि चालिलें ।
रत्नदीप तेलदीप तेज सर्व काढिलें । लटिकूटि धामधूम पाडिलें पछाडिलें ॥११॥
गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे । मुगूट पाडिला शिरीं कठोर वज्र ठांसरे ।
सभा विटंबिली बळेंचि गर्गरीत वावरे । बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ॥१२॥
हास्तमार दैत्यभार दंडभार होतसे । लंडसे कलंडले उलंडलेंचि भंडसें ।
येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती । गळीत बैसले भुमीं न बोलती न चालती ॥१३॥
स्वप्रदेह सौख्य देत दैत्यघात भावला । रुद्र हा उठावला कुडावयासि पावला ।
जाळिलें त्रिकुट नीट आपटून रावणीं । राक्षसांसि थोर दु:ख ऊसनें ततक्षणीं ॥१४॥
दीनरूप देव सर्व हें स्वरूप पाहिलें । कळवळून अंतरीं रघुत्तमासि बाहिलें ।
एक वीर तोष धीर थोर धीर ऊठला । तोष तोष तो विशेष अंतरींच दाटला ॥१५॥
उदंड देव आटिले तयांसि भीम आटितो । रामदूत वातसूत लटिलटि लटितो ।
ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो । धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो ॥१६॥
समस्त दैत्य आळितो बळें त्रिकूत जाळितो । पुरांत गोपुरें बरीं निशाचरांसि वाळितो ।
उदंड अग्रि लविला बहू बळें उठावला । कडाडिला तडाडिला भडाडिला धडाडिला ॥१७॥
उदंड जाळिलीं घरें कितेक भार खेंचरें । किलाल धांवती भरें सुरांस वाटले बरें ।
उदंड दैत्य धोवडी तयांत पुच्छ भोंवडी । कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ॥१८॥
बळें चपेट मारिला उदंड दैत्य हारिला । तरारिला थरारिला भयंकरूम भरारिला ।
गद्‍गदी तनू वितंड सागरीं सरारिला । जानकीस भटेला प्रभूकडे सरारिला ॥१९॥
काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला भरे। थोर धाक एक हांक काळचक्र वावरे ।
शक्ति शोधिली बळेंचि भव्य देखि ले धुरे । वानरांसहीत रामदास भेटले त्वरें ॥२०॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP