एकधर्माश्रया या ( कारिकेंतील ) विशेषणानें, ‘ रजोभिर्भूरिव द्यौर्धन-संनिभैर्गजैश्च द्यौरिव भू: । ह्या कोण्यातरी कवीच्या श्लोकांतील परस्परोपमेंत होणारी या उपमेयोपमेच्या लक्षणाची अतिव्याप्ति दूर केली आहे; कारण, या श्लोकांतील अर्थरूप परस्परोपमेंत, उपमेला आवश्यक असलेला एक ( साधारण ) धर्म नाहीं. ( परस्परोपमेंतील दोन उपमावाक्यांत, निरनिराळे दोन साधारण धर्म असतो. ) कारण, वरील श्लोकांतील परस्परोपमेंत, भूतल उपमान असलेल्या उपमावाक्यांत, रजस् हा उपमाप्रयोजक अनुगामी धर्म आहे; व नभस्तल उपमान असलेल्या उपमावाक्यांत, मेघाप्रमाणें असलेले हत्ती हा बिम्बप्रतिबिंबभावयुक्त धर्म उपमाप्रयोजक आहे; आणि हे दोन धर्म ( अर्थातच ) भिन्न आहेत. कारिकेंतील व्यक्त्या हें विशेषण, व्यंग्य उपमेयोपमेचा ( लक्षणांत ) समावेश करता यावा, म्हणून घातलें आहे-असें हें उपमेयोपमेचें लक्षण आहे.
( अप्पय दीक्षितांनीं उपमेयोपमेचें केलेलें ) हें लक्षण ( व त्याचें त्यांनीं केलैलें विवेचन ) योग्य नाहीं.
“ मी लतेसारखी आहे असा भलताच गर्व, हे सुंदरी, तूं कधींही करूं नकोस; कारण ह्या बाबतींत दुसर्यांना शोधायला तर जायलाच नको; पण ही लतासुद्धां, तुझ्यासारखी आहे, ( म्ह० ही लता तुझी उपमान आहे. )
ह्या श्लोकांत उपमान आणि उपमेय ह्या दोघांनीं आळीपाळीनें सादृश्याचे प्रतियोगी होण्यानें झालेली उपमा तनुत्व वगैरे-रूप, एक साधारण धर्मावर आधारलेली आहे. व तिचा बोध व्यञ्जनेहून निराळी जी अभिधा-वृत्ति तिच्या योगानें झाला आहे; आणि म्हणूनच ह्या श्लोकांत उपमेयोपमा मानण्याचा प्रसंग येईल. तुम्हीं म्हणाल कीं, सादृश्याचें उपमेव व उपमान या दोघांनींही ( आळीपाळीनें ) प्रतियोगी होणें ही गोष्ट वरील श्लोकांतील उपमेंत दिसत नाहीं; कारण वरील श्लोकांतील मी ह्या पदार्थांशीं, लतेच्या
सादृश्याचा आश्रय जी सदृशी ( म्हणजे लतेसारखी असलेली नायिका ) तिचा अवन्य होतो ” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं; कारण, तुम्ही दाखविलेला अन्वय मान्य केला तर, “ मुखस्य सदृशश्चन्द्रश्चन्द्रस्य सदृशं मुखम् ” ( तुझ्या मुखासारखा चन्द्र आहे व चन्द्रासारखें तुझें मुख आहे ) ह्या सर्वांना मान्य असमेल्या उपमेयोपमेंत, तुम्ही केलेल्या लक्षणाची अव्याप्ति होईल. ( कारण सादृश्याच्या प्रतियोगी व अनुयोगीची स्पष्ट प्रतीति येथें सादृश्य वाचक पदानें होत नाहीं. ) शिवाय, “ मी लतेसारखी आहे ” ह्या ठिकाणीं, उपमेयोपम होऊं शकत नाहीं; कारण कीं, ह्या श्लोकाच्या उत्तरा-र्धांत आलेल्या उपमेचें तात्पर्य, नायिकेच्या गर्वाचा निरास करणें, हेंच असल्यामुळें, ह्या श्लोकांतील सादृश्य, तिसर्या सदृश वस्तूचा अभाव हा अर्थ सूचित करीत नाहीं; आणि म्हणूनच, “ तुझ्यासारखें दुसरें सुद्धा पदार्थ आहेतच; पण ते शोधण्यांत काय अर्थ ? ” अशा अर्थाचां, ह्या श्लोकाचा जो उत्तरार्ध ( गवेषणे० इत्यादि उत्तरार्ध ) त्याची संगति बरोबर लागते. तिसर्या सदृश पदार्थाचा अभाव हे उपमेयोपमा अलंकाराचें प्राणभूत तत्त्व आहे, असा आलंकारिकांचा सिद्धांत मान्य केला नाहीं तर “ भुवस्तलमिव व्योम कुर्बन्व्योमेव भूतलम् । ” ( पृथ्वीतलासारखें आकाशाला करून टाकणारा व आकाशाप्रमाणें पृथ्वीतलाला करून टाकणारा ) ह्या ठिकाणीं उपमेयोपमेचें निवारण करण्याचा तुम्ही जो प्रयास केला आहे तो फुकट जाण्याचा प्रसंग येईल. यावर तुम्ही म्हणाल कीं, ‘ तिसर्या सदृश पदार्थाचा अभाव हें जिचें फळ आहे असें विशेषण उपमेला द्यावे, म्हणजे झालें ’ पण हेंहीं तुमचें म्हणणें बरोबर नाहीं; कारण उपमेयोपमेला तुम्ही हें विशेषण दिलें तर, तुमचीं दुसरीं विशेषणें व्यर्थ होतील. म्हणजे त्या दुसर्या विशेष-णांनीं दूर केले जाणारे परस्परोपमादिक अलंकार, तुम्ही हें आतां सुचविलेलें विशेषणच दूर करील. याचप्रमाणें, अन्योन्यप्रतियोगिकत्वविशिष्ट अशी ही उममेयोपमा मात्र एकच व्यापारानें जाणतां येतें हेंहीं तुमचें म्हणणें योग्य नाहीं. कारण कीं, ‘ खमिव जलं जलमिव खम् ’ ( आकाशाप्रमाणें पाणी , पाण्याप्रमाणें आकाश ) वगैरे वाक्यांत आकाश व पाणी यांचा सादृश्य या अर्थाशीं अन्वय करतांना, प्रतियोगी हा त्याचा अर्थ केवळ सादृश्य-संबंधानेंच प्रतीत होत असल्यानें, तो ( प्रतियोगित्व हा अर्थ ) अभिधा व्यापाराचा विषय होत नाहीं. अभिधादिक व्यापारानें जाणण्यास योग्य अशा पदार्थांचा परस्परांशीं असलेला संबंध, त्याच अभिधादिक व्यापारानें जाणतां येत नाहीं, हा सिद्धांत सर्व आलंकारिकांनीं स्वीकारला आहे. तो स्वीकारला नाहीं तर, संबंधाला विशेषण मानण्याची आपत्ति येऊन पडेल.