“ याचकांनीं कापला असतांनासुद्धां तो दधीचि ऋषि मुळीं-सुद्धां डगमगला नाहीं. श्रेष्ठ पुरुष, विनाश होत असतांनासुद्धां, मनाचा स्थिरपणा सोडीत नाहीं; उदाहरणार्थ-ताठ उभा असलेला वृक्ष. ”
ह्या श्लोकांत रति हा स्थायिभाव प्रधान आहे. ह्या स्थायिभावांत दधीचि ऋषि हा आलंबनविभाव आहे व त्या ऋषीच्या लोकोत्तर चारित्र्याचें स्मरण, हा उद्दीपनविभाव आहे. त्याचप्रमाणें, ह्या पद्याचा प्रयोग करणें हा ह्या ठिकाणीं अनुभाव आहे व हा रतिभाव, हें पद्य निर्माण करणार्या कवीच्या ठिकाणीं आहे. अशा ह्या प्रधान असणार्या रतिभावाला, गौण म्हणून आलेला, दधीचि ऋषीमध्यें असलेला उत्साह हा स्थायिभाव आहे. ह्या उत्साहस्थायिभावाचा, याचक हा आलंबनविभाव आहे व याचकांनीं केलेली याचना ऐकणें, हा उद्दीपनविभाव आहे. स्वत:च्या गात्रांच छेद करण्याला ( ऋषीनें ) संमति देणें हा या स्थायिभावाचा अनुभाव आहे; आणि धैर्य हा ह्या ठिकाणीं व्यभिचारी असून तो या उत्साहाला पुष्ट करतो.
वरील श्लोकांतील तिसर्या व चौथ्याच्या अर्ध्या चरणांत, अर्थान्तर-न्यास आला आहे. आणि तो अर्थान्तरन्यास, पूर्वार्धांत आलेल्या विशेषरूप वाक्यार्थाचें सामान्यरूप अर्थानें समर्थन करणारा असून तो रतिस्थायि-भावाचा उत्कर्षक आहे. आणि ह्या अर्थान्तरन्यासाला, विवेचक दृष्टांत देऊन तद्वारा, पुष्ट करण्याकरतां, चतुर्थ चरणाच्या शेवटच्या भागांत उदाहरण हा अलंकार आलेला आहे. अशाच रीतीनें-
“ असंख्य रत्नांना जन्म देणार्या त्या हिमालय पर्वताचें सौंदर्य नष्ट करण्यास, त्या हिमालयावरील बर्फहि समर्थ झालें नाहीं. कारण कीं, अनेक गुणांच्या समुदायांत एखादा दोष ( सहज ) बुडून जातो. ज्याप्रमाणें चंद्राच्या किरणांत त्यावरील एक डाग लपून जातो, त्याप्रमाणें. ”
(कुमारसंभव १।३ )
वरील कालिदासाच्या श्लोकांतहि हाच प्रकार झाला आहे. ( म्हणजे येथेंहि उदाहरण अलंकार शेवटच्या चरणांत आलेला आहे. ) ह्या उदाहरण अलंकारांत , ( मुख्य ) अवयवी वाक्य व त्याचें अवयव म्हणून आलेलें वाक्य यांचा संबंध दाखविण्याकरतां ह्या इव वगैरे शब्दांचा प्रयोग केलेला असतो व सामान्य आणि विशेष ह्या दोहोंचाहि, एकच क्तियारूप बिधेयाच्या ठिकाणीं,अन्वय झालेला असतो. हाच, ह्या अलंकारांत व अर्थान्तरन्यास अलंकाराच्या एका प्रकारांत ( ह्या दोहोमत ) फरक आहे. पण ह्या मुद्याचा विशेष विस्तार आम्ही पुढें अर्थान्तरन्यास अलंकाराच्या प्रकरणांत करणार आहोंत.
ह्या अलंकाराचे बाबर्तीत प्राचीनांचें म्हणणें असें-
“ ह्या अलंकाराला निराळा मानूं नये. कारण कीं, उपमा अलं-कारानेंच ह्या अलंकाराचें काम भागतें. कुणी म्हणतील कीं, सामान्य व विशेष ह्या दोहोंमध्यें सादृश्य असूच शकत नाहीं; मग तुम्ही सामान्य-विशेषांनी होणार्या ह्या उदाहरण अलंकारांत उपमा आहे असें कसें म्हणतां ?
पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण कीं, विशेषावाचून सामान्य राहूंच शकत नाहीं, असा शास्त्रीय सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताप्रमाणें, कोणत्याहि सामान्याचें, त्याचा कसला तरी विशेष घेतल्याशिवा, प्रकृत वस्तु म्हणून वर्णन करतांच येत नाहीं. मग तो विशेष घेऊन केलेलें जें सामान्याचेम वर्णन, त्यांत ह्या प्रथम आलेल्या विशेषाकरतां उपमा म्हणून दुसरा विशेष आल्यास, त्यांत कांहीं बिघडत नाहीं. आणि अशा रीतीनें प्रारंभाला आलेला हा उदाहरण अलंकार, इव वगैरे वाचकाच्या योगानें बोधित झालेल्या मागून येणार्या उपमेंत समाविष्ट झाला तर, त्यांत बिघडलें कोठें ? ”
ह्या ठिकाणीं, रसगंगाधरांतील उदाहरण अलंकाराचें प्रकरण समाप्त झालें.