आतां (परिणामवाक्याचा) शाब्दबोध सांगतों :---
‘हरिनवतमाल;’ इत्यादि श्लोकांत, ‘भगवान् श्रीहरीहून अभिन्न असा तमालवृक्ष’ असा शाब्दबोध होतो ही गोष्ट निर्विवाद आहे. त्याचप्रमाणें “श्रावं श्रावं वच:सुधाम्” इत्यादि श्लोकांत विशेषणसमासांत आलेल्या परिमाणालंकारात, वचनाहून अभिन्न अशी सुधा, असा शाब्दबोध होतो. पण, “पायं पायं वच:सुधाम् ,” ह्या रूपकाच्या उदाहरणांत, ‘अनुयोगी जें वचन त्याचा, अभेदाची प्रतियोगी जी सुधा तिच्याशीं अभेद आहे,’ असा शाब्दबोध होतो. अशा रीतीनें ‘वदनरूप चंद्रानें ही सुंदरी मदन - संताप दूर करत,’ ह्या व्यस्त म्ह० समास नसलेल्या पदांत झालेला परिणामालंकाराचा शाब्दबोध व ‘ही सुंदरी आपल्या वदनचंद्रानें आझ्या द्दष्टीला थंडगार करते,’ ह्या व्यस्त म्ह० वाक्यगत रूपकाचा शाब्दबोध ह्या दोहोंत (स्पष्ट) फरक आहे. (असें समजावें.) त्याचप्रमाणें :---
“तुला शांतीची इच्छा असेल तर तूं सत्वर सज्जनांचे वाणीरूपी अमृत ऐक. तें अमृत. ह्रयांत धारण करण्यानें, पुन्हां केव्हांही व्यथा होण्याचा संभव नाहीं.’’
ह्या परिणामालंकारांतील, व ह्याच श्लोकांतील, ‘श्रृणु’ हा शब्द काढून, व त्याऐवजीं ‘पिब’ हा शब्द घालून, रूपक अलंकार केला असतां होणारा शाब्दबोध, व “दुष्ट लोकांकडून मर्मस्थलावर वाणीरूपी बाणानें विद्ध केलेले सज्जन व्यथा पावतात. पण सज्जनांकडून वाणीरूपी अमृतानें ते शिंपडले गेले असतां पुन्हां शांत होतात” ह्या रूपकालंकाराचा शाब्दबोध, या दोहोंत निश्चित फरक आहे, अशी व्यवस्था करतां येते. त्याचप्रमाणें, “अहीनचंद्रा०” इत्यादि भिन्नविभक्तिक परिणामालंकारांत, तृतीयेचा अर्थ अभेद असा होत असल्याने, ‘तेजस्वी वदनाशीं अभिन्न अशा पूर्णचंद्रानें युक्त’ असा शाब्दबोध होतो. पण. ‘मीनवती नयनाभ्याम्० ह्या श्लोकांत सरसीच्या तादात्म्याचा आरोप करण्यांत कांहींही बिघदत नसल्यामुलें, तो आरोप सिद्धच आहे. पण दोन मीनांचा मनयनांशीं होणारा जो अभेदारोप त्यायोगानें, पूर्वींच्या, सुंदरीशीं होणार्या सरसीच्या तादात्म्यारोपाचें समर्थन होत नसल्यानें, दोन डोळ्यांचा मीनांसी होणारा अभेदारोप शोधून काढावा लागेल. तो अभेदारोप, तृतीयेचा, प्रकृतीच्या अर्थाशीं अभेद केल्यानें संभवत नाहीं; म्हणून कसेंत्री करून, प्रकृतीच्या अर्थाला अनुयोगी मानून, अभेदाच्या प्रतीयोगीशीं त्या तृतीयेचा अन्वय करून, जुळवावा लागेल. महणजे नयन या अनुयोगीशीं अभेदाचा प्रतियोगी जो मीन त्याचा अन्वय करणारा शाब्दबोध होऊ शकेल; म्ह० या शाब्दबोधांत नयन हा अभेदाचा अनुयोगी व मीन हा अभेदाचा प्रतियोगी असें मानून त्या दोहोंचा अभेदाशीं अन्वय करता येईल. अशा रीतीनें, आरोप्यमाण म्ह० विषयीच्या ठिकाणीं, विषय ज्यामध्यें प्रतियोगी आहे अशा अभेदाचें भान होत नसल्यामुळें, ह्या ठिकाणीं परिणामालंकार होणार नाहीं, पण रूपकच होणार, हाच मार्ग, ‘नद्या: शेखरिणे०’ इत्यादि पूर्वीं आलेल्या अप्पय दीक्षितांच्या उदाहरणाच्या बाबातींत व ‘वचोभिरुपायनं चकार० ह्या अलंकारसर्वस्वकारांनीं दिलेल्या उदाहरणच्या बाबतीतही स्वीकारावा लागेल. पण यावरही पुन्हां, विषयीच्या ठिकाणीं कसा तरी विषयाच्या अभेदाचा प्रत्यय होतो एवढयावरून येथें परिमाणालंकारच होतो, असें म्हणाल, आणि प्रस्तुत वृत्तांताकरतां होणारा (विषयीचा) उपयोग मान्यच करीत नसाल तर, “प्रवृरूपी लतेचें सेचन करण्याला प्रवृत्त झाला आहे.) ह्या अलंकारसर्वस्वकारांनीं रूपकाच्या म्हणून दिलेल्या उदाहरणांत, परिणामालंकार मानण्याचा प्रसंग येईल. कारण कीं, प्रेमलतिका या समासामध्यें विषय जें प्रेम तें, विषयी लतिकेचे विशेषण होत आहे. या विषयाचें एवढें दिग्दर्शन केलेलें पुरें झालें.
आतां परिणामध्वनीचा विचार करूं या :---
येथें प्रथम, अप्पय्य दीक्षितांनीं, विद्याधरांनीं दिलेल्या परिणामध्वनीचें उदाहरण उद्धृत करून त्याला दूषण दिलें आहे, तें पाहूं या. तें दूषण असें :---
“ ‘हे राजा नृसिंह, ज्या तुझें यश शत्रु - राजाचें आक्रमण करून विस्तार पावतें, त्या तुझे वर्णन आम्ही काय करणा ?”
या श्लोकांत राजन् या पदानें चंद्र ह्या विषयाचा निर्देश केला आहे. त्या विषयाचें आक्रमणरूप जें कार्य त्याला शत्रूरूप राजा हा विषयी उपयोगी पडत आहे अशी प्रतीति होत असल्यानें, ह्या ठिकाणीं परिणामालंकार व्यंग्य आहे” असें जें विद्याधरांनीं म्हटलें आहे तें योग्य नाहीं. कारण कीं, प्रस्तुत श्लोकांत विषयी जो शत्रु - राजा त्याचा राजा या रूपानेंच आक्रमणाच्या बाबतींत उपयोग होत आहे. चंद्र या रूपानें (आक्रमाणा) करतां उपयोग होत नाहीं.
(पण अप्पय्य दीक्षितांचें हें म्हणणें बरोबर नाहीं. ह्या ठिकाणीं विजृम्भते (विस्तार पावणें) ह्याचा सर्व ठिकाणीं पसरणें एवढाच अर्थ कवीला इष्ट नाहीं. एवढाच अर्थ इष्ट असतां तर, यशानें केलेल्या आक्रमणाच्या बाबतींत, शत्रुराजाचा, रजा या रूपानेंच (आक्रमणक्रियेचें) कर्म होऊन उपयोग झाला असता. परंतु ह्या श्लोकांत विजृंभते याचा अर्थ, “अत्यंत निर्मळपणा ह्या गुणाच्या बाबतींत यशाला आपल्या तोडीच दुसरा कोणताही पदार्थ सापडत नाहीं, ह्या द्दष्टीनें असणारी त्या यशाची विशिष्ट प्रकारची प्रौढि” हा (अर्थ) आहे. पण आक्रमणक्रिया याचा अर्थ ह्या ठिकाणीं, गौण करून टाकणें अथवा निष्प्रभ करून टाकणें हाच आहे. अशा रीतीच्या विजृंभणक्रियेच्या अर्थाच्या द्दष्टीने, चंद्र ज्याचें कर्म आहे असें आक्रमणच उपयोगी पडेल. शत्रु राजा ज्याचेम कर्म आहे असें आक्रमण उपयोगी नाहीं. अशा रीतीनें विषयी म्हणून व्यंग्य असलेल्या शत्रुराजाचा, चंद्ररूपानेंच आक्रमणाला उपयोग होतो; अर्थात् विद्याधरानें परिणाम वनीचें उदाहरण म्हणून जो हा श्लोक दिला आहे तो सुंदरच आहे. आता अप्पय्य दीक्षितांनीं दुसर्याचें उदाहरण दोषयुक्त ठरवून स्वत: परिणामध्वनीचें म्हणून जें उदाहरण दिलें आहे ते असें :---
“हे माझ्या मना, तूं फार अदिव्सापासून संताप सहन करीत आहेस. पण आतां तूं चिंता सोडून दे. कारण. श्रीहरीच्या चरणकमलाचा नखरूप शीतल चंद्रमा हा तुझ्याजवळच आहे कीं.”
हा श्लोक देऊन त्यावर त्यांनीं असें लिहीलें आहे :--- ह्या ठिकाणीं दीर्घकालपर्यंत संतापानें पीडित झालेल्या चित्ताला, श्रीहरीच्या चरणनखरूप चंद्राचें अस्तित्व दाखवून, ‘त्या चंद्राचेंच तूं सेवन कर, त्यामुळेंच तुझा संताप शांत होईल.’ असें म्हटलें असल्यानें. ह्या ठिकानीं परिनामध्वनि आहे.” हें त्यांचें म्हणणें अगदीं चुकीचें आहे; कारण, “विषयीचा विषयरूपानें प्रस्तुत कार्याला उपयोग होणें हाच परिणामालंकार,” असें त्यांनीं स्वत:च म्हटलें आहे. पण प्रस्तुत कार्याला उपयोग होणें हाच परिणामालंकार.” असें त्यांनीं स्वत:च म्हटलें आहे. पण प्रस्तुत कार्याला उपयोगी होणें एवढेंच परिणामाचें स्वरूप नाहीं. पण विषयीमध्यें असलेली प्रकृत कार्याविषयीची जी उपयोगिता त्या उपयोगितेचें खास स्वरूप विषयईचे विषयाशीं ताद्रूप्य होणें हें आहे, (आणि तेंच परिणामालंकाराचें खरें स्वरूप आहे). एवंच, ह्या श्लोकांत, नखरूपी चंद्राचें अस्तित्व दाखवून त्याच्या सेवनानें तुझा संताप शांत होईल असें म्हणण्यानें होणारी जी प्रस्तुत कार्याविषयींची (विषयीची) उपयोगिता, ती जरी व्यंग्य असली तरी, परिणामालंकाराचें वैशिष्टय जें ‘विषयीचें विषयाशीं ताद्रूप्य होणें,’ तें, ह्या ठिकाणीं परिणामालंकारवाक्याचा (वैयाकरणमतें) वाक्यार्थच होत असल्यामुळें, किंवा (फार तर नैयायिकांच्या मतें) लक्षार्थच होत असल्यामुळें, तो ताद्रूप्यरूप अर्थ व्यंग्य आहे असें म्हणणें हें केव्हांही योग्य होणार नाहीं. पण परिणामालंकार ध्वनीचें उदाहरणच पाहिजे असेल तर हें देणें योग्य होईल :---
“परमसौदर्याचा सागर अशा चंद्रमा (रूप) बंधूवांचून माझा हा भयंकर संताप कशानें शांत होईल बरें ?”
ह्या ठिकाणीं बोलणारा विरही असल्यामुळें, त्याला, ह्या श्लोकांत सुचित केलेलें जें रमणीय वदन त्याच्याशीं अभिन्न होणारा चंद्रच इष्ट आहे; आणि रमणीय वदनाशीसं अभिन्न होणार्या या चंद्राच्या योगानेंच वक्त्याच्या प्रस्तुत विरहसंतापाची शांति होणार असल्यामुळें, ह्या ठिकाणीं परिणामालंकार ध्वनि होऊं शकतो. कोणी म्हणेल. “जिच्यामध्यें विषयाचें निगरण असतें ती अतिशयोक्ति (अलंकार) येथें आहे, असें म्हणणें शक्य आहे.” पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण, अतिशयोक्तिमध्यें विषयीशीं अभिन्न असणें ह्या रूपानेंच विषयाचा प्रत्यय होतो. उदाहरणार्थ, ‘कमलं कनकलतायाम्’ या वाक्यांत कनकलतेशीं अभिन्न असलेल्या सुंदर स्त्रियेच्या ठिकाणीं, कमलाशीं अभिन्न असलेलें मुख (शोभतें) असा अर्थ आहे. परंतु ‘इंदुना० ’ इत्यादि, आम्ही वर दिलेल्या श्लोकांत, मुखाचा चंद्राशीं अभिन्नत्वानें असण्याचा अनुभव आल्यास त्यानें विरह संतापाची शांति हें जें प्रकृत कार्य हें सिद्ध होणार नाहीं; आणि म्हणूनच विषयी जो चंद्र त्याएं मुखरूप विषयाशीं अभिन्नत्व दाखणिणें इष्ट आहे; आणि तें अभिन्नत्व ह्या ठिकाणीं परिणामध्वनि मानला तरच होऊं शकते; म्हणून वरील श्लोकांत परिणामध्वनिच आहे, अतिसयोक्ति अलंकार नाहीं.
जा झाला अर्थशक्तिमूलक परिणामध्वनि.
आतां शब्दशक्तिमूलक परिणामध्वनीचें उदाहरण असें :---
“हे मूर्ख प्रवाशा, तू विनाकारण कां संताप पावतोस ? तूं पयोधराची इच्छा कर, त्याच्या योगानें तूं शांति मिळवू शकशील.”
ह्या ठिकाणीं प्रथम तापशांतीला हेतु म्हणून पयोधराची म्हणजे मेघाची प्रतीति झाल्यानंतर, श्लोकांतील मंदमति या विशेषणानें ज्याचा निर्देश केला आहे अशा (विशेष्याची) नायकाची विरहसंतापानें होणारी व्याकुळता, ह्या वैशिष्टयाचें ज्ञान होऊन, सह्रदय वाचकाला विरहतापाचें शमन करणारा ओ रमणीस्तनरूपी विषय त्याच्याशीं होणार्या मेघाच्या ताद्रूप्याचें ज्ञान होतें. (म्हणूण ह्या ठिकाणीं शब्दशक्तिमूलक परिणामध्वनि आहे.)
परिणामालंकाराचें दोष, पूर्वीं उपमा वगैरेंचे दोष सांगितले, त्यावरूनच अनुमानानें समजावें.
येथें रसगंगाधरांतील परिणामालंकाराचें प्रकरण समाप्त झालें.