कारणमाला अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
हीच शृंखला ज्या वेळीं कार्यकारणभावला अनुकूल (अशास संबंधानें युक्त) असेल, त्या वेळीं तिला कारणमाला म्हणावें.
ह्या ठिकाणीं पहिलें पहिलें तें कारण व पुढें पुढें येणारें तें कार्य, अशी एक शृंखला; व पहिलें पहिलें तें कार्य व पुढें पुढें येणारें तें कारण, अशी दुसरी शृंखला. यांचीं क्रमानें उदाहरणें :---
‘पुण्यामुळेंच सुंदर गृहिणी मिळते, गृहिणीमुळेंच सर्व द्दष्टीनें पवित्र असे चांगले पुत्र मिळतात; त्या पुत्रांच्या योगानें मोठें यश मिळतें व त्या यशानेंमनुष्याला नित्य स्वर्गाची प्राप्ति होते.’
‘दानरूपी लक्ष्मी स्वर्ग व मोक्ष यांना जन्म देते; विपुल सम्रुद्धी दानाला जन्म देते; थोर भाग्य सम्रुद्धीला जन्म देते व हे शंकरा ! तुज्या पायाची भक्ति भाग्याला जन्म देते.’
ह्या ठिकाणीं नेहमींचा नियम असा आहे कीं, प्रथम (कोणत्या तरी कार्याचें) कारण सांगितलेलें असेल तर तें (पुढील पंक्तींत) कार्य होऊन पुन्हां त्याचें कारण व नंतर त्याचें कारण असा क्रम होतो (हा एक प्रकार); अथवा (दुसरा प्रकार म्ह०) प्रस्तुत वस्तु कोणत्या तरी कार्याचें कारण व तें कार्य पुन्हां कशाचें तरी कारण, असा क्रम होतो. अशारीतीनें कारणांची मालिका, येऊन कारणमाला होणें आहे. पण ज्या वेळीं प्रथम कार्य सांगितलें असेल त्या वेळीं, त्या कार्याचें कार्य व नंतर त्याचें कार्य असा क्रम अथवा (दुसरा प्रकार म्ह०) प्रस्तुत वस्तु कुणातरी कारणाचें कार्य व तें कारण कुणातरी कारणाचें कार्य असा क्रम येणें योग्य आहे. कांहीं असलें तरी, एखादा शब्द कार्य अथवा कारण याचें प्रतिपादन करणारा पहिल्यानें आला असेल तर, तोच शब्द पुढेंहि कायम ठेविला पाहिजे. असा क्रमानें कार्याची अथवा कारणाची योजना झाल्यास, ती अपेक्षेला अनुकूल होत असल्याकारणानें, सुंदर दिसते; पण तशी होत नसेल तर, त्या ठिकाणीं प्रक्रमभंग हा होतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP