तीच शृंखला विशेषण - विशेष्यभावरूपी संबंध असल्यास एकावली होतें.
ती एकावली दोन प्रकाराची - पूर्वीं पूर्वींचे पदार्थ पुढच्या पुढच्यांचीं विशेष्यें होत असल्यास, एक प्रकारची; व तीं विशेषणें होत असल्यास, दुसर्या प्रकारचीं. पैकीं पहिल्या प्रकारांत, पुढचीं पुढचीं विशेषणें विशेष्यांना स्थापन करीत असल्यास पहिला प्रकार; व विशेष्याला काढून टाकीत असल्यास, दुसरा प्रकार. स्थापन करणें म्ह० स्वत:च्या (म्ह० विशेषणाच्या) संबंधानें (विशेषणानें) विशेष्याच्या अवच्छेदक धर्माला. (म्ह० विशिष्ट स्वरूपाला) नियमित करणें; व अपोहकत्व म्ह० काढून टाकणें, याचा अर्थ स्वत:च्या (म्ह० विशेषणाच्या) अभावानें विशेष्याच्या विशिष्ट धर्माच्या अभावाचें ज्ञान उत्पन्न करणें,
उदाहरणार्थ :---
“जो स्वत:च्या हिताचा अर्थ पाहतो तोच पंडित. दुसर्यांना (परांना) अपकार न करणें हेंच हित. सज्जनपणा धारण करतात तेच पर; व ज्या ठिकाणीं भगवान् प्रकट होतात तोच सज्जनपणा.”
ह्या ठिकाणीं, (पंडित, हित, पर वगैरे पदार्थांची म्ह०) विशेष्यांची (स्वहितार्थदर्शी इ० पुढच्या पुढच्या) विशेषणांनीं स्थापना केली आहे.
‘जो स्वत:चें हित समजत नाहीं तो सभ्य पुरुष नव्हे. दुसर्याला संतोष न देणें, हें हितही नव्हे. जे सज्जनपणा धारण करीत नाहींत ते दुसरे (पर) ही नव्हेत; व ज्या ठिकाणी भगवान् प्रकट होत नाहींत, ती सज्जनताही नव्हे’
ह्या दुसर्या श्लोकांत विशेषणें (पुढचीं पुढचीं विशेषणें) पूर्वी पूर्वींच्या विशेष्यांना काढून टाकीत आहेत आतां एखादें विशेष्य सिद्ध करणें (स्थापन करणें) याच्या पोटांत त्याच्या अभावाला काढून ट्काणें हें आलेंच म्ह० तेंही सूचित होतें. उदाहरणार्थ, जो स्वत:चें हित पाहत नाहीं तो पंडित नाहीं. अथवा एका विशेष्याला काढून टाकण्यांत त्याच्याविरुद्ध विशेष्याला स्थापित करणें हेंही आलेंच. उदा० ज्याला हित समजतें तो सभ्य. असें असलें तरी, विरुद्ध वस्तु अशा ठिकाणीं प्रत्यक्ष शब्दांनीं सांगितलेली नसतें. ती फक्त सुचविली जाते; म्हणून पहिल्यानंतर दुसरा (विरुद्ध) प्रकार सांगण्यांत दोष नाहीं.
‘हे राजा, धर्माच्या योगानें तुझी बुद्धि शुद्ध आहे; बुद्धीच्या योगानें तुझ्या ठिकाणीं लक्ष्मी एकदम स्थिर झाली आहे. लक्ष्मीच्या योगानें सर्व लोक या पृथ्वीवर संतुष्ट झाले आहेत; व लोकांनीं तुझी कीर्ति त्रिभुवनांत पसरविली आहे.’
ह्या ठिकाणीं पूर्वीपूर्वीच्या तृतीयांत विशेषणांनीं पुढील जवळच्या विशेष्यांना विशेषित केले आहे. ह्या एकावलीच्या दुसर्या प्रकारांत पूर्वीपुर्वीच्या पदार्थांनीं पुढच्या पुढच्या पदार्थावर केलेला उपकार (म्ह० उपस्कारकता) जर एकरूप असेल तर त्यालाच प्राचीन साहित्यकार ‘मालादीपक’ असें म्हणतात. त्यांनीं म्हटलेंच आहे - ‘मालादीपकमाद्यं चेद्यथोत्तरगुणावहम् । (पहिले पहिले पदार्थ, पुढच्या पुढच्या पदार्थांत विशिष्ट गुण उत्पन्न करीत असल्यास, तें मालादीपक म्हणावें.) ह्या ठिकाणीं माला शब्दानें शृंखला हाच अर्थ सांगितला जातो, व दीपक ह्या शब्दानें, दिव्याप्रमाणें ही व्युत्पत्ति करून, एक ठिकाणी असूनही सर्वांना उपकारक क्रिया जिच्यांत आहे अशी जी शृंखला, ति मालादीपक. अशा रीतीनें यामालादीपकाचे प्राचीनांनीं दीपकालंकाराच्या प्रकरणांत लक्षण दिलें असलें तरी, हा एक दीपकाचाच प्रकार आहे अशी भ्रांति करून घेऊं नये. कारण दीपक अलंकार हा साद्दश्यगर्भ असतो ही गोष्ट सर्व आलंकारिकांनीं मान्य केली आहे. ह्या ठिकाणी शृंखलेचे अवयव असलेल्या पदार्थांत साद्दश्यच नाहीं, मग त्याला दीपक म्हणणें हे आम्हाला कसें पटेल ? शिवाय मालादीपकांतील पदार्थ, कांहीं प्रकृत व कांहीं अप्रकृत असे नसून, सर्वच प्रकृत अथवा सर्वच अप्रकृत असतात. त्यामुळेंही त्याला दीपक म्हणतां येणार नाहीं. याचें विवेचन उदाहरण देऊन आम्ही दीपक प्रकरणामध्यें केलें असल्यामुळें, त्याकरतां पुन्हां येथें फारसे श्रम घेत नाहीं. वरील विवेचनावरून दीपक व एकावली यांच्या मिश्रणानें मालादीपक होतें, असें जें कुवलयानंदकारांनीं म्हटलें आहे, तें भ्रांतिमूलक आहे, हें विद्वानांनीं सूक्ष्म द्दष्टीनें पाहून घ्यावें.
येथें रसगंगाधरांतील एकावली प्रकरण समाप्त झालें.