आतां काव्यलिंगाचें उदाहरण :---
‘उन्मत्त माणसांनींही संपूर्णपणें निंदलेलीं, पतित माणसांनीं टाळलेलीं, संस्कारहीन माणसांनीं तोंडानें बोलून न दाखविलेलीं, दुष्ट माणसांनीं अंगावर शहारे येऊन सोडून दिलेलीं, अशीं कितीतरी लोकांचीं पापें सतत हरण करीत असतांना, तूं केव्हांही थकून जात नाहींस, तेव्हां तूं एकटीच या जगांत विजयशाली आहेस.’
ह्या ठिकाणीं, दुसर्या कोणाच्याही उत्कर्षासारखा नसलेला असा भगवती भागीरथीचा उत्कर्ष सांगितला आहे. हा उत्कर्ष वरवर पाहतां बरोबर जुळत नाहीं. (कारण तूं एकटीच उत्कर्षशाली आहेस व बाकीचीं तीर्थें तुझ्याहून कमी दर्जाची आहेत, हें म्हणणें मनाला पटत नाहीं). तेव्हां त्याचें समर्थन करण्याकरतां, ‘सतत सर्व लोकांचें पाप हरण करताना होणार्या श्रमाचा अभाव,’ हा विशेषप्रकारचा सुबंतार्थ (म्ह० नामार्थ) कारण म्हणून सांगितला असून, त्या सुबंतार्थाला, ‘अशारीतीच्या पापांचें हरण करणारी’ असें दुसरें केवळ सुबंत विशेषण म्हणून दिलें आहे.
“ज्याचा उद्धार करतांना सर्व तीर्थें एकदम लाजतात, व शंकर वगैरे देवही ज्याचा उद्धार करण्याच्या बाबतींत कानावर हात ठेवतात, अशा मला पावन करणार्या हे आई ! करुणेनें जिचें अंत:करण व्यापून गेलें आहे अशी तूं, पापहरण करण्याच्या सर्वांच्या गर्वाला चिरडून टाकतेस. ।
ह्या ठिकाणीं सर्व देव व तीर्थें यांच्या गर्वाला चिरडून टाकणें, ही गोष्ट सिद्ध करण्याकरतां, स्वत:सारख्या अत्यंत पाणी मनुष्याला पावन करणें, हा अर्थ वक्त्यानें श्लोकांत योजला आहे. आतां एकटया जगन्नाथ कवीला पावन करणें हा हेतु (अर्थ) अगदी क्षुद्र आहे; त्याच्या योगानें, सर्व देवांच्या व तीर्थांच्या गर्वांचें हरण होणें (ही गोष्ट) सिद्ध होणें शक्य नाहीं. तेव्हां अशा गर्वाचें हरण होणें या वस्तूचें समर्थन करण्याकरता, दुसर्या एखाद्या विशेषणाची जरूर आहे. म्हणून तीर्थें लाजणें व शंकर वगैरे देवांनीं कानावर हात ठेवणें, हे दोन वाक्यार्थ, ज्यांच्यांत स्वत: वक्त हा कर्म आहे त्या वक्त्याच्या द्वारा, वक्त्याचीं विशेषणें म्हणून, सांगितलें आहेत; व अशा विशेषणांनीं विशिष्ट वक्त्याचें पवित्रीकरण भागीरथीणें केलें असल्याचें ह्या ठिकाणीं सांगितलें आहे; म्हणून हें पवित्रीकरण, इतर तीर्थांचा व देवांचा गर्व हरण करणें या कार्याचें समर्थन करूं शकत असल्यानें, हेतु होतें.
‘ब्रम्हादेव वगैरे देवांच्या चित्तवृत्तीलाही ज्याचा दिव्य महिमा मिळणें (म्ह० कळणें) कठीण आहे, अशा हे भगवान् शंकरा ! तुझ्या गुणांच्या समूहाची स्तुति करू पहाणार्या अत्यंत उच्छृंखल अशा (या) बालकाचा (माझा) अपराध मानणें, तुला योग्य नाहीं.’
ह्या ठिकाणीं अपराधाची क्षमा करणें याला कारण (हेतु) शिशुत्व हें असून, तो केवळ एक सुबंतार्थ (नामार्थ) आहे. याचप्रमाणें दिव्य महिमत्व (म्ह० अचिंत्यमाहात्म्य) हा जो दिव्य या सुबंतार्थानें विशेषित असलेला सुबंतार्थ तो, ‘ब्रम्हादिकांच्या चित्तालाही दुष्प्राप्य’ या अर्थाचें समर्थन करण्यास कारण आहे. अशा तर्हेच्या म्ह० अचिंत्यमाहात्म्य परमेश्वराच्या गुणांची स्तुति ही अपराधाला कारण आहे व अशा स्तुतीला उच्छृंखलपणा हें कारण आहे. अशा रीतीनें हें शुद्ध सुबंत कारण होण्याचे उदाहरण असून, विशिष्ट सुबंतार्थ हेतु झाल्याचेंही उदाहरण हा श्लोक होऊं शकेल.
‘हे आई ! तुझ्या आधारावर अतिशय गर्वानें फुगून जाऊन मी एकदम सर्व देवांचा तिरस्कार केला; (शब्दश: अर्थ, अवज्ञारूपी मार्गावर ज्या देवांना नेले) पण हे भागीरथी ! आतां तूं माझी उपेक्षा करशील तर मात्र, निराधार असा मी कोणापुढें रडूं, सांग बरें ?’
ह्या ठिकाणीं निराधार ह्या विशेषणानें सूचित केलेला वक्त्याविषयींचा सगळ्या लोकांचा जो द्वेष, त्याचें समर्थन करण्याकरतां वक्त्यानें केलेला सर्व देवांचा तिरस्कार हा तिदन्तार्थ, सुबन्तार्थानें विशेषित होऊन आला आहे.
‘आपल्या गोड बोलण्यानें विश्वास उत्पन्न करुन व नम्रता दाखवून जे सज्जनांना फसवतात, त्यांनाही, हे आई पृथ्वी ! तूं धारण करतेस, तेव्हां तुझाही विवेक (अजिबात) गेला म्हणायचा.
ह्या ठिकाणीं पृथ्वीचा विवेक नष्ट झाला या (समर्थ्य अथवा उपपाद्य) अर्थाचें उपपादन करण्याकरतां, ‘धारण करणें’ हा जो तिडन्तार्थ तो असमर्थ असल्यानें, अथवा सुबंतार्थानें विशेषित, म्हणजे लोकांना धारण करणें हा तिडन्तार्थही असमर्थ असल्यानें, सज्जनांना फसवणें इ० जें पूर्वींचें वाक्य, त्यानें विशेषित जी धारण क्रिया म्ह० तिडन्तार्थ, हा कारण झालेला आहे. येथें पूर्व वाक्यार्थ हा जो विशेषण झाला आहे तो, साक्षात नसून तान्ह्या कर्माला विशेषण होण्याच्या द्वारा झाला आहे. प्राचीनांनीं कल्पिलेल्या पदार्थकाव्यलिंग व वाक्यार्थकाव्यलिंग ह्या दोन भेदांप्रमाणें, वरील भेदही आम्ही केवळ चातुर्यानें कल्पिले आहेत. खरें म्हणजे, त्यांत विशेष प्रकारचा चमत्कार आहे म्हणून कांहीं ते कल्पिलेले नाहींत.
आतां (येथें प्रश्न असा कीं) अनुमान अलंकाराहून या अलंकाराचा फरक काय ? कुणी म्हणतील, “अनुमानांत (साध्याला साधक होणारा) हेतु व्याप्य असतो (व साध्य व्यापक असते); शिवाय तो हेतु पक्षधर्मही असतो. अशा हेतूचें, अशा दोन स्वरूपांनीं (वैशिष्टयानें), ज्ञान होत असेल तरच तो हेतु अनुमानांत साध्य या अर्थाचा साधक होतो. पण व्याप्यत्व अथवा तो हेतु अनुमानांत साध्य या अर्थाचा साधक होतो. पण व्याप्यत्व अथवा पक्षधर्मत्व या रूपानें न सांगितलेला व केवळ स्वरूपानें जाणला जाणारा असा हेतु (सुद्धां), काव्यलिंगांत प्रस्तुत अर्थाचें समर्थन करतो; हा या दोन अलंकारांत फरक.” पण हेंही म्हणणें बरोबर नाहीं; कारण एखाद्या अर्थाचें दुसरा अर्थ उपपादन करतो तें तरी केव्हां ? तर, त्या दुसर्या अर्थांत युक्ति (प्रामाण्य) असेल तेव्हां. (१) व्यभिचार व (२) हेतूचें पक्षवृत्तित्व (म्ह० पक्षावर हेतु नसणें) या दोहोंपैकीं एक कोणतें तरी आहे असें कळल्यास, ही युक्ति संभवतच नाहीं. (अर्थात् अशा हेतूनें केलेलें समर्थनही लंगडें पडतें.) उदाहरणार्थ :--- “विनिंद्यान्युन्मत्तै:” इ० वर उदाहरण म्हणून दिलेल्या पद्यांत (१) भागीरथींतील (श्रमाचा अभाव हा नेहमीं उत्कर्ष दाखवितोच असेंही नाहीं; म्हणून) हा शअमाभाव उत्कर्षाशीं व्यभिचरित आहे. (२) अथवा हा श्रमाभाव भागीरथी या पक्षावर राहत नाहीं; यांपैकीं कोणतेंही ज्ञान झालें तर, श्रमाभाव हा भागीरथीचा सर्वोत्कर्ष सिद्ध करूं शकणार नाहीं. पण तोच श्रमाभाव सर्वोत्कर्षाशीं अव्यभिचरित व भागीरथीवर राहाणारा आहे, असें ज्ञान झाल्यास, तो (श्रमाभाव) भागीरथीचा सर्वोत्कर्ष सिद्ध करू शकेल.