“(वाक्यांत) वस्तु ज्या क्रमानें सांगितल्या असतील (उपदेश = सांगणें) त्याच क्रमानें त्यांचा दुसर्या, त्याच क्रमानें सांगितलेल्या, पदार्थांशीं होणारा जो संबंध त्याला यथासंख्य म्हणतात.”
‘यथासंख्य’ यांतील यथा शब्दाचा अर्थ, ‘न सोडतां’ (अनतिक्रम्य) हा आहे. (अर्थात यथासंख्य म्हणजे संख्यामनतिक्रम्य म्ह० संख्येला म्ह० संख्येच्या क्रमाला न सोडतां.) यथा चा, या अर्थीं केलेला, ‘यथासंख्य’ हा अव्ययीभाव समास आहे. ‘संख्येला न सोडता’ हा अर्थ, पहिल्यानें सांगितलेल्या एका पदार्थाचा, दुसर्या ओळींत पहिल्यानेंच सांगितलेल्या दुसर्या पदार्थांशीं, दुसर्यानें सांगितलेल्याचा दुसर्यांशीं, अशा रीतीनें संबंध झाला असतांच, संभवतो. अशा रीतीनें यथासंख्य या शब्दाचा अवयवार्था (योगार्थ) हें त्याचें लक्षण. उदा० :---
“(रामचंद्राच्या) ऐन तारुण्यामुळें अत्यंत शंकित असलेल्या, व त्याचें शील, पराक्रम, बल व कांति यांवर लोभावलेल्या, अशा, सीतेच्या नयनकमलांच्या शोभा (म्ह० शोभायुक्त कटाक्ष), रामचंद्रावर पडल्या असतां, (क्रमानें) संकोच पावत आहेत विकसित होत आहेत.” ह्या ठिकाणीं यौवनाच्या उदयामुळें शंकित झालेले (कटाक्ष) संकोचतात, व शौर्य, बल व कान्ति यांच्यावर लोभावलेले (कटाक्ष) विकास पावतात; अशा रीतीनें शंकित ह्या कटाक्षाच्या प्रथम आलेल्या विशेषणाचा संकुचन्ति या प्रथम आलेल्या क्रियापदाशीं संबंध व लोभित या दुसर्यानें आलेल्या विशेषणाचा विकसन्ति ह्या दुसर्यानें आलेल्या क्रियापदाशीं संबंध - अर्थात पहिल्या विशेषणानें युक्त कटाक्षांचा (म्ह० कटाक्ष या कर्त्याच्या) पहिल्या क्रियापदाशीं संबंध, व दुसर्या विशेषणानें युक्त कटाक्ष या कर्त्याचा, दुसर्या क्रियापदाशीं संबंध झाला आहे. हा संबंध शाब्द (शब्दानें सांगितलेला) आहे; कारण क्रमानें आलेले पदार्थ, समासांत आलेले नसून, सुटे आलेले असल्यानें, त्या पदार्थांचा परस्परांशीं सरळ क्रमानें अन्वय होतो. या श्लोकांत शंका व औत्सुक्य या दोन (व्यभिचारी) भावांचा संधि हा प्रधान असून, त्याला उपस्कारक हा यथासंख्य झाला आहे. (म्हणून त्याला अलंकार म्हणतां येतें.)
अथवा यथासंख्याचें हें दुसरें उदाहरण :---
“झाडें, कमळें व विद्वान लोक हे (तिघे) सर्वांच्या संतोषाची वृद्धि करणारे असूनही, (क्रमानें) कुर्हाड, दंव व दुष्ट लोक यांच्याकडून हरहर ! विनाकारण ठार केले जातात.”
ह्या ठिकाणीं यथासंख्य दीपकाला मदत करतो, (दीपकाचें अंग हें). अथवा (यथासंख्याचें हें तिसरें उदाहरण) :---
“वृंदावनांत राहणारा व स्मशानांत राहणारा, मदनाला जन्म देण्याचें सामर्थ्य धारण करणारा, व मदनाला मारण्याचें सामर्थ्य धारण करणारा; चक्र व शूळ यांनीं (अनुक्रेमें) ज्यांचे हात शोभत आहेत. (चिन्हयुक्त, अंकित आहेत,) असें क्रमानें विष्णु व शंकर माझी भीति हरण करोत.”
वरील ‘द्रुमपङकज०’ व वृंदावनपितृ०’ या दोन्हीही श्लोकांतल्या पदांचा (क्रमश:) अन्वय आर्थ आहे. या दोहोंत पहिल्या समासाचा पुढील समासाशीं प्रथम अन्वय होतो, व मग त्याचें पाठीमागून (पार्ष्ठिकत्वात) त्या समासांतील अवयवांचा, पुढच्या समासांतील अवयवांशीं, अन्वय होतो. अशा रीतीनें, या यथासंख्याचा विषय अपार (अमर्याद) आहे.
आतां क्रमानें अन्वय (येथें आहे) या ज्ञानाचें नियाकम प्रमाण काय ? (म्हणजे क्रमानेंच अन्वय करावा हें ठरवायला गमक काय ?) (या बाबतींत) कांहींचें म्हणणें असें :--- अमुक पदार्थाचा अमुक पदार्थाशीं अन्वय करण्याकरतां, योग्यताज्ञान हेंच नियामक असतें, कसें तें पहा :--- ‘वृंदावन व स्मशान ह्यांत राहणारे विष्णु व शंकर’ ह्या वाक्यांत विष्णूच्या ठिकाणीं स्मशानांत राहणें हें जुळत नसल्यानें, (बाधितत्वात) विष्णु व स्मशान यांचा अन्वयबोध होऊच शकत नाहीं; व शंकराच्या ठिकाणीं वृंदावनांत राहणें जुळत नाहीं. आणि (याच्या उलट) विष्णूच्या ठायीं वृंदावनांत राहण्याची, व शंकराच्या व वृंदावनाचा, त्याचप्रमाणें शंकराचा व स्मशानाचा) अन्वयबोध होतो; व त्याचा शेवट, बाकीच्या समासाचा व समासांतील अवयवांचा या क्रमानें सर्वांचाच अन्वय होण्याम्त होतो. हाच प्रकार इतर ठिकाणींही होतो”
पण दुसरे कित्येक असें म्हणतात :--- योग्यताज्ञान हें अन्वयबोधाचें नियामक मानल्यास, क्रमभंग हा दोषच होणार नाहीं (म्ह० पदार्थांचा क्रमानें अन्वय न झाल्यास प्रक्रभमंग हा दोष होतो असें आलंकारिकांनीं मानलें आहे, तें जुळणार नाहीं.) उदा० :--- ‘कीर्तिप्रतापौ भातस्ते सूर्याचंद्रामसाविव’ [हे राजा, तुझी कीर्ति व पराक्रम (अनुक्रमें) सूर्य व चंद्राप्रमाणें भासतात] या श्लोकार्धांत कीर्तीच्या ठिकाणीं चंद्राचें साद्दश्य व प्रतापाच्या ठिकाणीं सूर्याचें साद्दश्य होण्याची योग्यता असल्यानें, त्या योग्यतेच्या जोरावर, क्रम सोडून जरी (कीर्ति व चंद्र इ० चा) अन्वय केला तरी शाब्दबोधाची उपपत्ति होते. (म्हणजे शाब्दबोध जुळतो.) क्रमानें अन्वय जुळणें म्हणजेच योग्यता असें कांहीं नाहीं; व क्रम सोडून अन्वय करणें म्हणजेच अयोग्यता असेंही कांहीं ठरलेलें नाहीं. मग वरील श्लोकार्धांत क्रम सोडला तरी (योग्यतेवरून अन्वय होत असल्यानें) मुख्यार्थाचा (वाच्यार्थाचा) बाध होणार तरी कसा ? पण (वरील श्लोकार्धांत) क्रमानें अन्वय केल्यास वाच्यार्थाचा बाध होतो हें अनुभव सिद्ध आहे, म्हणून, जे पदार्थ दुसर्या पदार्थांशीं अन्वित होतात, त्यांची (म्ह० अन्वित होणार्या एका गटांतील पदार्थाची त्याच्याशीं अन्वित होणार्या दुसर्या गटांतील पदार्थांशीं) सारखी संख्या आहे, असें त्या पदार्थांचें ज्ञान हें यथासंख्य अन्वयबोधाला कारण होतें, असें म्हटलेंच पाहिजे. (म्ह० हे पदार्थ सारख्या संख्येचे आहेत असें ज्ञान हें कारण, व यथासंक्य अन्वयबोध होणें हें कार्य; अथवा शास्त्रीयभाषेंत सांगायचें म्हणजे अन्वयबोधत्व हें कार्यतावच्छेदक). अशा रीतीनें ‘कीर्तिप्रतापौ’ ह्या वाक्यांत, ज्या क्रमानें पदार्थ सांगितले आहेत (यथाश्रुत) त्या क्रमानेंच त्यांचा अन्वयबोध, बाधाच्या निश्चयज्ञानानेम कुंठित होतो. (म्ह० स्पष्ट बाधित होतो.०
तेव्हां अशा ठिकाणीं सरळ वाच्यार्थालाच बाध येत असल्यानें, क्रमभंगाचा दोष स्पष्टच होतो. यावर कुणी (म्ह० योग्यताज्ञानानें अन्वयबोध मानणारे लोक) (आम्हांला) विचारतील, “अन्वित होणारे पदार्थ सारख्या संख्येचे आहेत, असें समजलें, कीं त्यांचा यथासंख्य अन्वयबोध होतो, ही गोष्ट अनुभवसिद्ध असेल तर, (असें मानलें तर), ‘यथासंख्य मनुदेश: समानाम ।’ (पा. १-३-१०) हें पाणिनीचें सूत्र व्यर्थ होऊ लागेल. कारण अशा यथासंख्या अन्वयाचें उदाहरण असलेल्या ‘लोमादिपामादिच्छादिभ्य: शनेलच: ।’ (पा. ५-२-१००) या सूत्राम्त, समसंख्या पदार्थांचा यथासंख्य अन्वय होतो ही गोष्ट लोकप्रसिद्ध असल्यानें त्या लोकप्रसिद्धीच्या बळावरच यथासंख्य अन्वयबोध जुळेल. (तेव्हां मग यथासंख्य अन्वयबोध होतो असें पाणिनीला निराळें सूत्र करून सांगायची जरूरच काय ?) आतां योग्य्तेवरून अन्वयबोध होतो असें मानणारांच्या मतें (म्ह० पहिल्या मताप्रमाणें) केवळ शास्त्राच्या चष्म्यांतून पाहणार्या (शास्त्ररूपी डोळ्यांनीं पाहणार्या) लोकांना (म्ह० लोकांतील अनुभवसिद्ध गोष्टीकडे लक्ष न देतां केवळ शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टीवर आधार ठेवणार्या एकमार्गी लोकांना) विशेष प्रकारची प्रकृति व विशेष प्रकारचा प्रत्यय ह्यांचाच संबंध होतो, ही जी योग्यता तिचें ज्ञान (शास्त्रांत सांगितल्यावांचून) होतच नसल्यानें, त्या लोकांना यथासंख्य अन्वयाचें ज्ञान व्हावें म्हणून, ‘यथासंख्यम०’ हें सूत्र पाणिनीनें केलें. (हें म्हणणें जुळतें.)” यावर आमचें (दुसर्या मताचें) उत्तर हें - तसें नाहीं. आमच्या (म्ह० दुसर्या ) मतेंही, लोकांच्या अनुभवाची (व्युत्पत्तीची) ज्यांना माहिती नाहीं, अशा लोकांकरतां (अशा लोकांना कळावें म्हणून) ‘यथासंख्यम०’ हें सूत्र पाणिनीनें केलें असल्यानें, त्याचा उपयोग आहे, (तें व्यर्थ नाहीं) असें आम्हांला ही म्हणतां येईल.
या ठिकाणीं हें ध्यानांत ठेवावें कीं, “यथासंख्य अन्वयबोध (या अलंकारांत) कसाही होवो, त्याविषयीं आमचा आग्रह नाहीं, पण येथें हा विचार करावयाचा आहे कीं, यथासंख्य हा अलंकाराच्या पदवीला पोचू शकला तरी कसा ? लोकप्रसिद्धीवरून होणार्या या यथासंख्यांत ‘कवीच्या प्रतिभेनें निर्माण होणें हा जो अलंकाराचा प्राण, त्याचा असा लेशही सांपडत नाहीं, कीं ज्याच्या योगानें ह्याचा (अलंकार या नांवानें) व्यवहार करणें थोडें तरी योग्य होईल. तेव्हां अपक्रमत्व म्ह० प्रक्रमभंगरूप दोष नसणें म्हणजेच यथासंख्य. (दोषाभावरूप हा असल्यानें याला अलंकार हें नांव देतां येत नाहीं.) अशा द्दष्टीनें पाहतां, उद्भटाच्या मताला अनुसरणारांचें म्हणणें, खोटया नाण्यांप्रमाणें अगदीं रद्दी आहे.
“वरील विवेचनावरून, यथासंख्याचा, क्रमालंकार या नांवानें व्यवहार करणार्या वामनाच्या म्हणण्याचा परामर्श घेतल्यासारखेंच आहे. (म्ह० त्याच्याही म्हणण्याचें खंडन झालें समजावें.)” असे नवीनांचे म्हणणे.
येथें रसंगाधरांतील यथासंख्य प्रकरण संपलें.