“एखाद्याची कोणती तरी वस्तु घेऊन त्याला स्वत:ची कोणती तरी वस्तु देणें ह्याला परिवृत्ति म्हणतात.”
परिवृत्ति म्ह० विकत घेणें (अथवा अदलाबदल). ही परिवृत्ति (अलंकार) दोन प्रकारची :--- (१) सम परिवृत्ति (२) विषम परिवृत्ति. पुन्हां सम परिवृत्ति दोन प्रकारचीं :--- (१) उत्तमांनीं (उत्तम वस्तूंनीं) उत्तम वस्तूंची केलेली अदलाबदल व (२) निकृष्टांनीं (म्ह० कमी अथवा हीन दर्जाच्या वस्तूंनीं) निकृष्टांची केलेली परिवृत्ति (अदलाबदल). विषम परिवृत्ति ही दोन प्रकारची :--- (१) उत्तमांनीं निकृष्टाची केलेली व (२) निकृष्टांनीं उत्तमाची केलेली. अदलाबदल, (एवंच, परिवृत्ति चार प्रकारची०. क्रमानें उदाहरणें :---
“हे सुवर्णांगी ! तूं आपलीं अंगें देऊन (म्ह० शरीर देऊन) पुरुषांचे प्राण विकत घेतलेस, तर तें योग्य तरी होईल; पण केवळ दोन नयनकमळें देऊन (म्ह० नुसते कटाक्ष फेकून, डोळे मारून,) पुरुषांचे प्राण (विकत) घेणें हें मात्र (तुला) शोभत नाहीं.”
ह्यांतील पूर्वार्धांत, समपरिवृत्ति (योग्य अदलाबदल) आहे; पण उत्तरार्धांत विषय परिवृत्तीच आहे (कारण कटाक्ष देऊन प्राण घेणें ही अदलाबदल मात्र विषम आहे.).
“हाडकांच्या माळांचा बनलेला स्वत:चा देह (तुला) देऊन, तुझ्याकडून मुंडमाळा धारण करणारा देह घेणार्या अशा, तुझ्या नगरींत (काशींत) राहणार्यांना, हे शंकरा ! काय लाभ (झाला ?).”
“(स्वत:चा) गौरव [(१) जडपणा (२) प्रतिष्ठा, अब्रू ] देऊन, सुंदर स्त्रियांकडूना लाघव [(१) हलकें वजन असणें (२) हलकटपणा, अप्रतिष्ठा] घेणार्या तरुणंच्या विवेकहीन धैर्याला नमस्कार असो.”
“तोंडल्याचें फळच जणुं अशा ओठाला देऊन ज्या (सुंदर स्त्रिया) शहाण्यासुरत्यांची सुरस अशीं पुण्याचीं फळें तत्काळ हरण करतात, त्या स्त्रियांची गोष्ट काय वर्णावी ? (मी काय सांगावी ?)”
वरील सर्व श्लोकांत, देणें व घेणें हा व्यवहार केवळ कविकल्पित आहे, वास्तविक (खरा) नाहीं. (अर्थात्) ज्या ठिकाणीं हा देण्याघेण्याचा व्यवहार खरोखरीचा असेल (असल्याचें वर्णन येईल) तेथें हा अलंकार होत नाहीं. उदा० :--- “ज्या ठिकाणीं टपोर्या डोळ्यांच्या बालिका चोहोंकडे मोतीं देऊन बोरें विकत घेत आहे.” (येथें खरोखरीची देवघेव असल्यानें अलंकार नाहीं.)
येथें हें आणखी लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, :--- ह्या अलंकाराच्या लक्षणांत दुसर्याला स्वत:ची कसली तरी वस्तु द्यायची इतका अर्थ सांगायचा आहे, नुसतें स्वत:च्या वस्तूचा त्याग (केला) एवढेंच, सांगायचें नाहीं. असें जर न मानलें तर, ‘किशोरभावं परिहाय रामा बभार कामानुगुणां प्रणालीम’ (ह्या सुंदरीनें बालपण सोडून मदनाला अनुकूल अशी वागण्याची पद्धति स्वीकारली) ह्या वाक्यांत परिवृत्तीच्या लक्षणाची अतिव्याप्ति होईल. “तरीपण हें परिवृत्तीचें उदाहरणे आहेच.” असें म्हणूं नका; कारण पूर्वींचें बालपण सोडून नंतरची यौवनावस्था धारण करणें ही यांतील गोष्ट खरोखरीची असल्यानें (कविकल्पित नसल्यानें) ह्याला अलंकार म्हणतां येत नाहीं. अशी वस्तुस्थिति असल्यानें, ‘कांहीं तरी टाकून कांहीं तरी घेणें हा विनिमय” असें जें परिवृत्तीचें लक्षण अलंकारसर्वस्वकारांनीं केलें आहे, व त्या परिवृत्तीचें उदाहरणे म्हणून “किमित्यपास्याभरणानि यौवने धृतं त्वया वार्धकशोभि वल्कलम” हा श्लोक दिला आहे :--- तें त्यांचें लक्षण व तें उदाहरणे दोन्हींही चुकीचींच आहेत.
येथें रसगंगाधरांतील परिवृत्ति प्रकरण संपलें.