परिसंख्या अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ही परिसंख्या प्रथम दोन प्रकारची :--- (१) शुद्धा व (२) जिच्यांत प्रश्न पहिल्यानें येतो अशीं, प्रश्नपूर्विका. ह्या दोन्हीही प्रकारची परिसंख्या प्रत्येकीं आर्थ व शाब्द; मिळून परिसंख्या चार प्रकारची.
उदा :--- “हे मना, तुला जर सेवा करण्याची इच्छा (अभिलाषा) असेल तर, तूं विष्णूची सेवा कर. तुला जर ध्यान करायची इच्छा (स्पृहा) असेल त्र विष्णूचें खूप वेळ ध्यान कर. तुला जर गायन करायचें असेल, (कुणाला आळवायचें असेल) तर विष्णूच्या कथेला आळव (म्ह० आळवून गा.) तुला जर कुठें पडून राहायचें असेल (पहूडायचें असेल) तर ज्याला कुणीही प्रतिबंध करणार नाहीं अशा (आत्म) सुखाचें ठायीं तूं पडून रहा.”
ह्या ठिकाणीं ‘जर’ य शब्दानें युक्त अशा (वरील० वाक्यांनीं असें सूचित (निवेदित) होतें कीं, सेवा (कुणाची तरी) करणें ही मनुष्याच्या स्वाभाविक इच्छेमुळें (राग) प्राप्त होणारी वस्तु असून, त्या सेवेचा विषय (त्या सेवेचें कर्म) ईश्वरही होऊं शकतो व इतर पदार्थही होऊं शकतात. तेव्हां (ईश्वर व सेवेचे इतर विषय प्राप्तच होत असल्यानें) त्याच्याकरतां ‘विष्णूची सेवा कर’ इत्यादि आज्ञार्थानें युक्त वाक्यें सांगणें व्यर्थ होऊं लागेल. म्हणून त्या वाक्यांचे ‘ईश्वरावांचून दुसर्‍या पदार्थाची सेवा करूं नकोस’ इत्यादि त्या त्या क्रियांच्या (उदा० :--- ध्यान करणें. आळवणें वगैरे) कर्माची इतर विषयांहून व्यावृत्ति, हें तात्पर्य समजावें लागतें. म्हणून, ह्या ठिकाणी आर्थी परिसंख्या आहे. (म्ह० स्पष्टपणें ‘इतर विषयांचें सेवन करूं नकोस’ असें न सांगितल्यानें ही आर्थीं.) ही झाली शुद्धा परिसंख्या (आतां आर्थी प्रश्नपूर्वीका परिसंख्येचें उदाहरण :----
“तीर्थ कोणतें ? (उत्तर :---) श्रीहरीच्या चरणकमलांचा आश्रय करणें हें. रत्न कोणतें ? (उत्तर :----) शुद्ध बुद्धि. शास्त्र कोणतें ? (उत्तर :---) जें ऐकल्यानें द्वैतरूपी अंधकाराचा उदय होत नाहीं तें. सतत उपकाराविषयीं आवड बाळगणारा मित्र कोणता ? (उत्तर :---) तत्त्वज्ञान, मित्रा ! शत्रु कोणता सांग पाहूं ? (उत्तर :---) दु:ख देण्यांत कुशल असा वाईट वासनांचा समूह.”
ह्या ठिकाणीं, श्रीहरीच्या चरणाचा आश्रय वगैरे हेंच तीर्थ (वगैरे) समजावें, दुसर्‍या कुणालाही तीर्थ (वगैरे) म्हणत नाहींत, हा अर्थ तात्पर्थ म्हणून प्रतीत होतो. (कारण तो प्रत्यक्ष शब्दानें सांगितला नाहीं.) म्हणून ही आर्थी (व प्रथम प्रश्न आहे म्हणून) प्रश्नपूर्विका परिसंख्या.
“ (खरोखरी) गंगा हेंच तीर्थ; बाकीचीं तीर्थें म्हणजे केवळ स्वच्छ पाण्याचा सांठा, त्या गंगेचें उगमस्थान व लीन होण्याचें स्थान असे जे दोन देव (अनुक्रमें विष्णु व शंकर) तेच खरे देव; बाकीचे देव आहेत बिचारे. ती गंगा ज्या देशांत (वाहते) तोच खरा देश; बाकीचे देश म्हणजे शुद्ध माती. त्या गंगेला जो नित्य नमस्कार करतो तोच खरा ज्ञानी; त्याहून इतर, तो अडाणी !”
वरील श्लोकांत ‘मात्र’ वगैरे (मुळांतल्या) शब्दांनीं तीर्थ वगैरेंतील तीर्थत्व वगैरेंची व्यावृत्ति प्रतीत होत असल्यानें, शाब्दी, व (प्रश्नपूर्विका नसल्यानें) शुद्धा परिसंख्या.
“अंतकाळीं मित्र कोण ? (उत्तर :---) पुण्य; लोक, (मित्र) नव्हेत, कशाचें ध्यान करावें ? (उत्तर :---) परमेश्वराच्या पायाचें, मुलाबाळांचेम नाहीं. कशाची इच्छा करावी ? (उत्तर :---)  अकृत्रिम सुखाची; भोगांची नाहीं. कशाचा घोष करावा ? (उत्तर :---)  हरिनामाचा; दुसर्‍या कशाचा नाहीं.”
ह्या ठिकाणीं शाब्दी व प्रश्नपूर्विका परिसंख्या आहे. हें सर्व झालें प्राचीनांच्या मताप्रमाणें. पण दुसर्‍या कांहींचें म्हणणें असें :--- “व्यावृत्ति आर्थ असेल तरच परिसंख्या अलंकार होतो; नाहींतर निव्वळ परिसंख्याच होते. (म्ह० तो अलंकार होत नाहीं.) ज्याप्रमाणें, हेतुत्व आर्थ असेल तरच हेतु अलंकार होतो; नाहींतर तो केवळ हेतु होतो, (अलंकार नाहीं,) तसेंच येथेंहीं. म्हणून परिसंख्येचे प्रश्नपूर्विका आर्थी व अप्रश्नपूर्विका म्ह० शुद्धा आर्थी असे दोनच प्रकार मानावेत.”
पण दुसर्‍या कांहींचें म्हणणें असें :--- व्यावृत्ति आर्थ असली तरी सुद्धां त्या ठिकाणी परिसंख्या अलंकार मानूं नये, नाहींतर ‘पञ्च पञ्चनखा भक्ष्या:’, ‘समे यजेत् ’, ‘रात सस्य’ (पा० ८।२।२४) इत्यादि ठिकाणीं एखाद्या विशेषापासून व्यावृत्ति हीच परिसंख्या होत असल्यानें, परिसंख्या अलंकार होऊं लागेल. म्हणून कविप्रतिभेनें निर्मिलेली एखाद्या विशेषापासूनची व्यावृत्ति असेल तरच परिसंख्या अलंकार होतो. (असेंच म्हटलें पाहिजे.) उदा० :--- यस्मिञ्शासति वसुमतीपाकशासने, महानसेषु संताप: शरधिह्रदयेषु सशल्यता, मञ्जीरेषु मौखर्यम, भेरीषु ताडनम, कामिनीनां कुन्तलेषु कौटिल्यम, गतिषु मान्द्यम” इत्यादि वाक्यांत परिसंख्या अलंकर आहे. (कारण या ठिकाणीं केलेली व्यावृत्ति ही कविप्रतिमेनें निर्मित आहे.)
वरील वाक्यांत प्रथमाविभक्तियुक्त संताप वगैरे शब्दांतले अर्थ निराळे असूनही (उदा० स्वयंपाकघरांतील संताप निराळा व इतर ठिकाणचा संताप - मनस्ताप निराळा असूनही) कवीनें आपल्या प्रतिभेनें तें एक केले आहेत, व त्या एकीकृत अर्थाच्या द्वारा या शब्दाच्या दुसर्‍या अर्थाच्या प्रतियोगीपासू (उदा० संतापाचा प्रतियोगी - उत्पत्तिस्थान - जें मन त्यापासून व्यावृत्ति (म्ह० संताप मनांत नसून स्वयंपाकघरांत आहे, अशी व्यावृत्ति) निर्माण केली आहे. या द्दष्टीनें पाहतां, ‘सेवाया यदि साभिलाषमिस’ यांत दुसर्‍या कोणाची सेवा करूं नकोस असा (व्यावृत्तिरूप) अर्थ प्रतीत होत असल्यानें, शास्त्रद्दष्टया परिसंक्या येथें भले होवो; पण परिसंख्या अलंकार मात्र येथें नाहीं. कारण ही व्यावृत्तीला जरूर नाहीं). आतां ‘किं तीर्थं हरिपादपद्मभजनम’ यांत तर प्रश्नपूर्वक द्दढारोपरुपकच आहे. असें जर न मानलें तर, ‘न विषं विषमित्याहुर्ब्रम्हास्वं विषमुच्यते’ (विशाला विष म्हणत नाहीं. तर ब्राम्हाणाच्या धनाला विष म्हणतात.) या ठिकाणीं सुद्धां व्यावृत्ति असल्यानें, परिसंख्या अलंकार होण्याचा प्रसंग येईल. आतां ‘किं शास्त्रं०’ या भागांत मात्र (किं तीर्थं० ह्या श्लोकांतील दुसर्‍या चरणांतही) निव्वळ परिसंख्या आहे. ‘तीर्थं गङ्गा०’ ह्या श्लोकांतही शुद्ध परिसंख्या आहे (परिसंख्या अलंकार नाही). याचें कारण पूर्वीं सांगितलेलें अनार्थत्व हें. (म्हणजे व्यावृत्ति आर्थ असेल तरच परिसंख्या अलंकार मानावा; जसें, हेत्वलंकार, आर्थ हेतु असेल तरच होतो, तसेंच येथें. आणि तीर्थं गङ्गा० या श्लोकांतील व्यावृत्ति अनार्थ म्ह० शाब्द आहे, सबब त्यांत परिसंख्या अलंकार मानतां येणार नाहीं.)
एवंच (वर दिलेलें) ‘महानसेषु संताप: इ०’ हेंच या परिसंख्यालंकाराचें खरें उदारण. (असें दुसर्‍या कुणाचें म्हणणें.)

येथें रसगंगाधरांतील परिसंख्या प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP