“कोणत्याही एका कारणानें उत्पन्न केलेल्या कार्यांत, दुसर्या एखाद्या कारणाच्या अचानक येण्यानें सुकरता उत्पन्न झाली तर, त्याला सामाधि म्हणावें”
ती सुलभता, तें कार्य अनायसें होण्यानें, तसेंच तें कार्य सांगोपांग होण्यानें (या दोन्हींही) द्दष्टीनीं असू शकते.
पूर्वींच्यांत म्ह० समुच्चयांत व याच्यांत फरक काय, हें (सचुच्चयाच्या विवेचनांत) सांगितलेंच आहे.
उदा० :--- “तरुण स्त्रियांचीं (मृगनयनांचीं) मनें जागीं करणारी रात्र तर आली; आतां हा माझा मान माझ्या मनांत शाबूत राहील तरी कसा ? अशा रीतीनें ती सुंदरी (कमलनयना) मनांतल्या मनांत खूप विचार करीत आहे इतक्यांत, राजा मदनाच्या छत्राप्रणाणें ज्याची शोभा आहे, असें चंद्राचें बिंब वर आलें.”
ह्या ठिकाणीं नुसती रात्र जवळ येण्यानेंच मान नाहींसा होणार, हें ठरलेलेंच होतें. तरी पण चंद्र वर येण्यानें तो मान नाहींसा होणें हें कार्य अनायासें, घडून आलें. (म्हणून समाधि अलंकार),
अथवा हें उदाहरण :---
“गडद काळोखांतही प्रेमरूपी दिव्यानें जिची द्दष्टी उजळली आहे अशी ती पतीच्या घरीं जात असतां, जणु स्नेहभावानेंच, विजा एकदम चोहोकडें चमकू लागल्या.
येथें पतीच्या घरीं निर्वेधपणानें जाण्याकरतां, विजा चमकणें हें दुसरें एक कारण अचानक आहें; त्या येण्याला हेतु जो स्नेहभाव, त्याची कल्पना केल्यामुळें, हा समाधि अलंकार उत्प्रेक्षा अलंकाराशीं मिश्रित झाला आहे. पूर्वींच्या (म्ह० आयातैव निशा- या उदाहरणांतला समाधि सुद्ध (अमिश्रित) आहे.
“प्रियकराच्या लोभाने एका सुंदर स्त्रीनें त्याच्या प्रथम समागमाचा कसातरी स्वीकार केला, इतक्यांत, मेघानें एकदम मोठयानें गर्जून तिच्या ढिल्या मिठीला घट्ट करून टाकलें.”
ह्या ठिकाणीं, मेघांच्या गर्जनांनीं आलिंगनाला संपूर्ण केलें.
पूर्वींच्या दोन पद्यांत, कार्यसिद्धि अनायासानें झाल्याचें सांगितलें; येथें तें कार्य सांगोपांग संपूर्ण सिद्ध झाल्याचें संगितलें.
“(आतां) माझ्या जगण्याची कसली आशा, (तूंच) सांग बरें ? (पहा) मलय पर्वतावरील भुजंगांनीं ओकलेले हे वारे यमासारखे (जणु यमच असे) वाहत आहेत. अन हे सखि ! ह्या आंब्याच्या शेंडयावर अरेरे हा भुंगा मदानाच्या मोठेपणाला मान देण्याकरतां गुङ गुङ करीत आहे.”
ह्या ठिकाणीं (नायिकेचा) प्राण घेण्याकरतां वार्याचें वाहणें आणि भुंग्याचें गुङ गुङ करणें हे दोन्ही हेतु चढाओढीनें येत असल्यानें, त्यांच्यापैकीं एकाचेंही येणें अचानक नाहीं; त्यामुळें येथें समाधि अलंकार नाहीं. पण वाहण्याचा कर्ता वारा गुञ्जनाचा कर्ता भुंगा, असे दोन (कर्तृरूप) भिन्न धर्मी ज्यांचें आहेत अशा, वाहणें व गुंजन करणें या दोन क्रियांच्या समुच्चयानें होणार्या पहिल्या समुच्चय अलंकाराशीं, जीव घेणें हें जें एक कार्य तोच एक धर्मी ज्यांचा आहे, अशा वाहणें व गुंजारव करणें याच दोन कारणरूपी पदार्थांचा, कारणतासंबंधानें होणारा जो (दुसरा० समुच्चय त्याचा संकर झालेला आहे.
येथें रसगंगाधरांतील समाधि प्रकरण समाप्त झालें.