एखाद्या वस्तूच्या ठायी, कोणत्याही (दुसर्या) वस्तूच्या गुणानें (एक प्रकारचा) विशेष (प्रकर्ष) उत्पन्न केला आहे, असें दाखविण्याच्या उद्देशनें, त्या वस्तूचा, (वर सांगितलेल्या) गुणानें युक्त अशा दुसर्या प्रसिद्ध वस्तूशीं संबंध आहे, असें सांगणें, ही प्रौढोक्ति.’
हा संबंध खरा असो व कल्पित असो, प्रत्यक्ष झालेला असो वा वा कुणाच्या द्वारा झालेला असो (कसाही चालेल).
उदाहरण :--- “हाय हाय ! वारुळांत उगवणार्या कपिकच्छू (खाजकुइली) नांवाच्या वनस्पतीचे (जणु) सख्ये भाऊ असे दुष्ट द्दष्टीचे लोक, सज्जनांना पीडा देऊन ठाअर मारतात.”
या श्लोकांत केवळ खाजकुइली ह्या वनस्पतीचे हे (दुष्ट) सख्खे भाऊ आहेत, असें म्हटल्यानें, त्यांच्यांत ठार मारण्याचा गुण येणार नाहीं. कारण ही वनस्पति फक्त पीडा उत्पन्न करू शकतो; आणि येथें तर (हे दुष्ट) पीडा देऊन ठार मारतात असा (त्या दुष्टांचा) विशेष, कवीला सांगायचा आहे, म्हणून त्याकरता कवीनें, ज्या वारुळांत साप राहतात त्याच वारुळांत उगवलेलीं अतएव ठार मारू शकणारी असें या वनस्पतीला एक विशेषण आपल्या कविकल्पनेनें दिले आहे. ह्या श्लोकामध्यें मारकता हा विशेषगुण सांगण्याकरता, कुइलीचा वारुळांतल्या सापाशीं संबंध असल्याचें सांगितलें आहे.)
“मन्दार पर्वतानें घुसळीत असतां त्याच्या वेगामुळें दुग्धसमुद्रांतून जे अमृताचे कण बाहेर पडले त्या, अनेक जातींच्या औषधीशीं एकजीव झालेल्या अमृत कणांनीं, हें राजा ब्रम्हादेवानें तुझे दयाळु कटाक्ष निर्माण केले.”
ह्या ठिकाणीं कटाक्षांत, मेलेल्यांना उठविणें वगैरे जे केवळ अमृताचे गुण तेच आहेत, एवढेंच कवीला सांगायचें नसून, सर्व लोकांना वश करून घेणें, वगैरे अमृतांत नसलेले गुणही गुणही त्याला सांगावयाचे आहेत; म्हणूनच (वशीकरण) औषधीशीं संबंध असलेले हें अमृतकणांचें विशेषण, कटाक्षांचा विशेष सांगण्याकरतां, कवीनें दिलें आहे. ह्या ठिकाणीं अमृतकणांनीं कटाक्ष उत्पन्न होणें हा जन्यजनकभाव, लोकांत खरोखरीचा नसून, केवळ कवीनें सांगितलेला - कल्पिलेला आहे.