विषादन अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“इष्ट वस्तूच्या विरुद्ध वस्तूची प्राप्ति हा विषादन अलंकार.
ह्या विषादनाचें (विषम अलंकाराशीं मिश्रित नसलेलें असे) खालील दोन शुद्ध स्वतंत्र प्रकार आहेत. (१) इष्ट वसतु मिळावी म्हणून उपाययोजना न करतां नुसति इच्छाच केली असतां, इष्ट वस्तूच्या विरुद्ध वस्तु मिलणेंहा एक प्रकार व (२) इष्ट वस्तु मिळावी म्हणून उपाय योजला असतां त्या उपायापासूनच विरुद्ध वस्तूची प्राप्ति झाली असे न होता, विरुद्ध वस्तूच्या कारणामुळेंच, त्या विरुद्ध वस्तूची प्राप्ति होणें, हा दुसरा, असे शुद्ध विषादनाचें, दोन प्रकार.
पण जेथें इष्ट वस्तूकरतां योजलेल्या उपायापासून विरुद्ध वस्तूची प्राप्ति होते, तेथें, तो उपाय व त्यापासून मिळालेली विरुद्ध वस्तु, अशा उत्पादक व उत्पन्न होणार्‍या वस्तूंच्या ह्या जोडींत, आपापसांत विजोडपणा असल्यानें, विषम अलंकार तर आहेच, पण शिवाय, इच्छित वस्तूच्या विरुद्ध वस्तूची प्राप्ति झाल्यानें, विषादन अलंकारही आहे. म्हणून या प्रकारांत, विषादन (विषमाशीं) मिश्र आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें विषम अलंकाराच्या एखाद्या प्रकारांत या विषादनाचा अंतर्भाव करतां येईल. अशी मात्र शंका घेऊ नये; कारण विषमाच्याहून निराळा सुद्धां ह्या अलंकाराचा विषय असूं शकतो, असें आम्ही पुढें दाखविणारच आहों. आतां शुद्ध विषादनाच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण असें :---
आपापल्या कामांत मन गेल्यामुळें माझ्यापासून लोक दूर गेले असतां, चोंचीच्या टोकाने (पिंजर्‍याचा) अडसर काढून टाकून मी पिंजर्‍यातून बाहेर पडेन; अशा रीतीनें, तो श्रेष्ठ पोपट मनोरथरूपी अमृताचा आस्वाद घेत असतां, हत्तीच्या सोंडीवढा एक मोठा साप पिंजर्‍यांत शिरला.
ह्या ठिकाणीं विषमाच्या प्रकाराचा विषयच नाहीं, कारण इष्ट वस्तूकरतां येथें उपायच केलेला नाहीं (फक्त इच्छा केली आहे.) आणि इष्ट वस्तूच्या प्राप्तीकरतां योजलेल्या (उपायाशीं) कारणाशीं विरुद्ध अशा वस्तूच्या उत्पाद्यउत्पादकभावरूपानें होणार्‍या संबंधाचा विजोडपणा असणें, हें तर विषमाचे विशिष्ट स्वरूप. तेव्हां वरील श्लोकांत अप्रस्तुतप्रशंसा अलंकाराचा घटक म्हणून, फक्त विषादन अलंकारच आहे.
“कृष्णाला पाहणार्‍या गोपीं, आपल्या पदराच्या टोकानें आपला मुखरूपी चंद्र झाकीत असतां, (कृष्णविषयक) प्रेमानें उत्पन्न झालेल्या कंपानें, त्यांच्या लुगडयाच्या निर्‍या एकदम सुटल्या.”
या ठिकाणीं इष्ट वस्तु स्वत:चें तोंड झाकणें ही; व त्याच्या विरुद्ध गोष्ट, निर्‍या सुटणें हीं;  कारण तोंड झाकण्याचें कारण अतिशय लाज, ती राखण्याच्या विरुद्ध हें निर्‍या सुटणें. (गोपींच्या) निर्‍या सुटणें ही गोष्ट कंप या सात्विक भावरूपी स्वत:च्या कारणामुळेंच घडली आहे; तोंड झाकण्याच्या प्रयत्नामुळें कांहीं निर्‍या सुटल्या नाहींत. तसेंच इष्टसाधन म्हणून योजलेल्या उपायामुळें इष्टप्राप्ति झाली नाहीं. अशी कांहीं गोष्ट येथें नाहीं. (उलट) पदराने झाकल्यामुळें तोंड न दिसणें ही गोष्ट येथें घडलीच आहे. तेव्हां या ठिकाणीं विषादन अलंकारच आहे, विषम नाहीं,
येथें खालील गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. ‘इष्ट साधन म्हणून निश्चित केलेल्या वस्तूपासून अनिष्ट वस्तू उत्पन्न होणें’ हा जो विषमाचा प्रकार पूर्वीं सांगितला, तो (इष्टार्थाच्या विरुद्ध वस्तूची प्राप्ति ह्या) विषादन अलंकारानें ग्रासून टाकल्यानें, तो विषादनाचाच एक प्रकार मानला पाहिजे; विषमाचा प्रकार मानतां येत नाहीं’ असें कुणी म्हणेल तर, त्याला असें विचारावें - ‘हा प्रकार विषमाचा म्हणून मानतां येत नाहीं असें म्हटलेंत तें कां म्हणून ? ह्या प्रकार विषमाचा म्हणून मानतां येत नाहीं असें म्हटलेंत तें कां म्हणून ? ह्या प्रकाराला विषादन ग्रासून टाकतो तसा, (दुसरीकडून) ह्या प्रकाराला कार्यकारणरूप संबंधाचा विजोडपणा ह्या द्दष्टीनें विषमही ग्रासून टाकीत आहे. तुम्ही म्हणाल, ‘तर मग ह्यापैकीं एकानें दुसर्‍या अलंकाराचा बाध करावा,’ पण तेंही बरोबर नाहीं. कारण ह्या दोन्हीही अलंकारांना स्वतंत्र जागा आहे, व त्याचे विषयही निराळे आहेत. विरुद्ध वस्तूची प्राप्ति इतका भाग विषादनाचा विषय, आणि इष्टाकरिता योजिलेला उपाय व त्यापासून विरुद्ध वस्तूची प्राप्ति, हा कार्यकारणभावसंबंधाचा विजोडपणा, इतका अंश विषमाचा विषय; असें आम्ही म्हटलेंच आहे. तेव्हां वरील विषमाचे प्रकारांत कांहीं अंशानें विषम व कांहीं अंशाने विषादन असा दोघांचाही समावेश (करता येईल) असें समजावें.

येथें रसगंगाधरांतील विषादन प्रकरण पुरें झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP