‘उल्लासाच्या (अगदीं) उलट, अवज्ञा अलंकार.’
उल्लासाच्या उलट असणें म्ह० उल्लासाचा अभाव असणें, एकाच्या गुणादोषांनीं दुसर्यामध्यें गुणदोष उत्पन्न न होणें, हा शेवटीं ह्याचा अर्थ.
जसें :--- “फार वेळ समुद्रांत बुडून सुद्धां मैनाक पर्वत जसा मऊ होत नाही, तसा वेदांतांत निष्णांत असूनही दुर्जन वैराग्यशाली होत नाहीं.”
ह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत, प्रपंचाची अनित्यता मनांत बिंबविणें हा जो वेदांतशास्त्राचा गुण त्यामुळें, दुर्जनाचे ठायीं वैराग्यरूपी गुण उत्पन्न होत नसल्याचें वर्णन आहे; तसेंच उत्तरार्धांत, द्रवपणा हा जो समुद्राचा गुण त्यामुळें मैनाक पर्वतांत मऊपणा हा गुण उत्पना होण्याचा अभाव वर्णिला आहे.
“हे शंकरा ! तुझ्या गळ्यांत (हालाहल) विष, तुझ्या डोक्यावर नागांचा राजा (वासुकी) व तुझ्या कपाळावर अग्नि भले खूप विहार करोत; पण तुझ्या देहाच्या शोभेचें ध्यान संसाररूपी अग्नीमध्यें होरपळणारांनीं केले असतां, ती शोभा त्यांचा ताप सदैव हरण करते.”
ह्या ठिकाणीं ताप देणें हा विष वगैरेचा जो दोष, त्यामुळें भगवान् शंकराचे मूर्तीत क्रूरपणा वगैरे दोष उत्पन्न न होणें; (हा अवज्ञा अलंकार)
ह्या ठिकाणीं पुढें येणारा अतदगुण अलंकार आहे, असें म्हणू नये; कारण यमुनेच्या पाण्यांत असलेल्या राजहंस वगैरेकडून यमुनेच्या पाण्याचा काळेपणा घेतला न जाणें, हें जसें अतदगुणांत सांगायचें असतें, तसें, भगवान् शंकराच्या मूर्तीनें विष वगैरेत असणार्या क्रूरत्वाला न घेणें ही गोष्ट येथे सांगायची नसून, विष वगैरेच्या तसल्या क्रूरपणानें दुसर्या तर्हेचा क्रूरपणा प्रकट न होणें एवढीच गोष्ट या ठिकाणीं सांगायची आहे; आणि हाच अतदगुण व अवज्ञा यांत फरक आहे. ‘निष्णातोऽपि०’ या श्लोकांत तर अतदगुणाचा प्रसंगच नाहीं.
“मत्सरानें ज्याचें मन मठ्ठ बनलें आहे. अशा दुष्ट लोकांनीं केलेल्या अनादरामुळें, हे माझी वाणी ! तूं वाईट वाटून घेऊं नकोस; कारण काव्यरूपी कमळाच्या मधाचे बाबतींत (जणु) भुंगेच, अशा सज्जनाच्या तोंडांत तुला यथेच्छ विहार करायला सांपडेल”
ह्या ठिकाणीं पूर्वार्धांत दुर्जनांचा अनादररूपी जो दोष त्यानें कवीच्या वाणीचे ठिकाणीं विषादरूपी दोष उत्पन्न होण्याचा निषेध केला असल्यामुळें, तो दोष उभाच राहू शकत नाहीं, तेव्हां, येथें दोष उत्पन्न होण्याचा अभाव शब्दानें सांगितलेला आहे. पण वाणीमध्यें असलेला जो रमणीयतारूपी गुण त्यानें दुष्टांच्या ठिकाणीं संतोषरूपी गुण उत्पन्न होण्याचा अभाव मात्र आर्थ आहे. (म्ह० केवळ अर्थानें सूचित केला आहे.) तेव्हां येथें दोन्हीही प्रकारची अवज्ञा (अलंकार) आहे. पण उत्तरार्धांत, सह्रदयाच्या रसिकतारूपी गुणानें, वाणींत उत्कर्षरूपी गुण उत्पन्न झाल्याचें वर्णन असल्यामुळें, उल्लास अलंकार झाला आहे.
कांहीं म्हणणे असें आहे कीं ‘विशेषोक्तीने या अवज्ञा अलंकाराचें काम भागत असल्यामुळें, अवज्ञा ह्या निराळ्या अलंकाराची गरज नाहीं.
येथें रसगंगाधरांतील अवज्ञा प्रकरण समाप्त झालें.