तिरस्कार अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


तसेंच,
“विशिष्ट प्रकारच्या दोषाचा संबंध असल्यामुळें, गुणयुक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या वस्तूचा सुद्धां द्वेष वाटणें, याला तिरस्कार अलंकार म्हणावें.”
उदा० :--- माजलेल्या हत्तींच्या कळपाच्या मदाभोंवतीं घिरटया घालणार‍या भुंग्यांचे जे थवे त्यांच्या (गुंजारवरूपी) मधुर संगीतानें सुंदर (वाटणारी अशी) राज्यलक्ष्मी मला क्षणभर सुद्धां नको; कारण तिच्यांत जे गुंग होऊन गेले आहेत व द्रव्याच्या हावेनें ज्यांचीं ह्रदयें तळमळत आहेत अशा लोकांचें, श्रीहरीच्या चरणांची सेवा करणाचें सुख (कायमचें) नाहींसें होतें.
ह्या ठिकाणीं हरिचरणाच्या आश्रयाला मुकण्याच्या भयामुळें, राज्यसुखाचा तिरस्कार वाटणें हा (तिरस्कार अलंकार).
ह्या तिरस्कार अलंकाराचें लक्षण न देतां केवळ अनुज्ञा अलंकाराचें लक्षण देणारें कुवलयानंदकार विस्मरणाच्या पाठीशीं लपले (असें मानणें भाग आहे) नाहींतर, त्यांनी (अनुज्ञा अलंकाराच्या म्हणून) दिलेल्या ‘भवद्भवनदेहली’ या उदाहरणांतील ‘किमित्यमरसंपद:’ या अंशांत (भागांत म्ह० चरणांत) तिरस्काराचें जें भान होतें, तें होत नाहीं, असें म्हणण्याची पाळी येईल.’
येथें कुणी असें म्हणतात कीं :--- ‘या दोन (अनुज्ञा व तिरस्कार या) अलंकारांची तुम्ही शक्यता मानता तरी कशी ? कारण, प्रार्थना म्ह० इच्छा, व तिरस्कार म्ह० द्वेष. आतां स्वत:च्या इष्ट वस्तूचें हें साधन आहे, असें जें ज्ञान, तेंच इच्छेला कारण होतें; पण या अनुज्ञा अलंकारांत, ‘हें माझ्या इष्ट वस्तूचें साधन आहे’ असें ज्ञान होणें हें जें इच्छेचें कारण, ते (दोषाच्या बाबतींत) शक्य नसल्यानें, दोषाविषयीं इच्छा होणें योग्य नाहीं. त्याचप्रमाणें मला नको असलेल्या (द्विष्ट) वस्तूचें हें साधन आहे, असें ज्ञान हें जें द्वेषाचें कारण, तें गुणाच्या बाबतींत शक्य नसल्यानें, (तिरस्कार अलंकाराच्या लक्षणाप्रमाणें) गुणाविषयीं द्वेष वाटणें हेंही योग्य नाहीं. ह्याच्या उलट होणें मात्र, योग्य कारण हाजर असल्यानें, अगदीं योग्य आहे. [म्ह० दोषाविषयीं द्वेष वाटणें, व गुणाविषयीं इच्छा होणें हेंच योग्य आहे, कारण कीं, हा दोष ‘मला नको असलेल्या वस्तूचें साधन आहे.’ असें ज्ञान होणें हें जें द्वेषाचें कारण, तें दोषाचे बाबतींत हाजर असतें. तसेंच हा गुण मला इष्ट असलेल्या वस्तूचें साधन आहे, असें ज्ञान होणें हें जें इच्छेचें कारण, तेंही (गुणाचे बाबतींत) हाजर असतें.]
(यावर आमचें उत्तर असें कीं,) तुमचें हें म्हणणें योग्य नाहीं. कारण दोषांतीलही गुणाचा अंश घेतल्यास, “माझ्या इष्ट वस्तूचें हें साधन आहे” असें जें ज्ञान तेंही येथें (दोषाविषयीं) होत असल्यानें, इच्छेचें तुम्ही सांगितलेलें कारण येथेंही निर्विधपणे आहे. त्याचप्रमाणें गुणांतीलही दोषाचा अंश घेऊन ‘हें माझ्या अनिष्टाचें साधन आहे’ असें ज्ञान येथें होत असल्यानें, तें त्या गुणाविषयींच्या तिरस्काराचें कारण होणें, हेही येथें आहे.
“दोषविषयी इच्छा होणें व गुणाविषयीं तिरस्कार वाटणें योग्य नसून, त्याचे उलट; म्ह० दोषाविषयीं तिरस्कार वाटणें व गुणाविषयीं इच्छा होणें हेंच योग्य आहे, कारण तसें होण्याची योग्य कारणें येथें आहेत,” असें जें वर तुम्ही म्हणाला, त्यावर आमचें उत्तर असें :--- तुम्ही उलट होणें (म्ह० दोषाविषयीं तिरस्कार व गुणाविषयीं व गुणाविषयीं इच्छा होणें) हें योग्य आहे असें जें म्हणाला तेंच मुळीं योग्य नाहीं. कारण, ही वस्तु मला वाटणार्‍या भयंकर द्वेषाशीं संबंध ठेवणारी तर नाहींच, पण उलट, माझ्या इष्टाचें म्ह० सुखाचें साधन आहें,” असें जे ज्ञान तें त्या उपायाविषयीं वाटणार्‍या इच्छेचें कारण असतें; व ही वस्तु माझ्या उत्कट इष्टाशीं संबंध न ठेवणारी, उलट माझ्या अनिष्टाची साधनभूत आहे, असें ज्ञान तिच्या उपायाच्या द्वेषाला कारण आहे, असें व्यवहारात म्हणतात. (वाच्यत्वात). (आमचें) हें म्हणणें योग्य नसेल तर, सुख आणि दु:ख या दोघांचेंही साधन म्हणून प्रसिद्ध असलेलें चांद्रायण व्रत करणें, विष लावलेल्या हत्यारानें मारलेल्या जनावरांचें मांस खाणें, हिरडयाचें चूर्ण खाणें, चिबुड खाणें इ० गोष्टींत वाटणार्‍या इच्छेच्या व द्वेषाच्या बाबतींत कांहीं नियमच राहणार नाहीं. (तेव्हां अत्यंत द्वेषाशीं संबद्ध नसणारी व स्वत:च्या इष्टाचें साधन, अशी ही वस्तु आहे, असें वाटल्यास त्या वस्तूची इच्छा होते; व अत्यंत इष्टाशीं संबद्ध नसणारी ही वस्तु, माझ्या अनिष्टाचें साधन आहे, असें वाटल्यास तिच्याविषयीं तिरस्कार वाटतो, ही कसोटी लावल्याशिवाय, चांद्रायण व्रत वगैरे इष्ट कां, व विषरी हत्यारानें मारलेल्या जनावराचें मांस वगैरे अनिष्ट कां, याची उपपत्ति लावतां येणार नाहीं.) मात्र वरील इष्टाच्या व अनिष्टाच्या कारणाच्या कोटींत पुरुष व काल यांचाही समावेश करणें आवश्यक आहे; म्ह० एखाद्या माणसाला एखादे वेळीं, ‘माझ्या अत्यंत अनिष्टाशीं संबद्ध नसून माझ्या या वेळच्या इच्छेला विषय होणारें जें फळ त्याला साधन असणारी ही वस्तु आहे,’ असें वाटेल (ज्ञान) तर, तें वाटणें (ज्ञान) त्या माणसाला त्यावेळीं त्या उपायाविषयीं इच्छा होण्याचे कारण होतें, असें समजावें. त्याचप्रमाणें त्या उपायाविषयीं इच्छा होण्याचें कारण होतें, असें असमजावें, त्याचप्रमाणें त्या माणसाला त्याच्या इष्टाशीं संब्द्ध नसून त्याच्या त्या वेळेच्या द्वेषाला विषय असणार्‍या फलाला एखादी वस्तु साधन आहे, असें जर वाटलें तर तें (ज्ञान) त्याच्या त्या वस्तूच्या उपायाविषयींच्या द्वेषाला कारण होतें, असेंही समजावें.
अशी वस्तुस्थिति असल्यानें, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट इष्ट वाटते ती दुसर्‍याला अनिष्ट वाटेल; व एखाद्याला आज एक गोष्ट इष्ट वाटेल, पण ती पुढें केव्हांतरी अनिष्ट वाटेल. अशा रीतीनें, एकच गोष्ट इष्ट अथवा अनिष्ट वाटणें यांत, माणूस व वेळ यामुळें होणारा फरक लक्षांत घेतां, गैर असें कांहींच नाहीं.
पण येथें एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, फलाविषयींची इच्छा तीव्र असल्यास त्या फालाच्या साधनाविंषयींची ही इच्छा तीव्रच असणार; त्याचप्रमाणें फलविणयींचा द्वेष तीव्र असल्यस त्या फलाच्या साधनाविषयींचा द्वेषही तीव्रच असणार. तेव्हां सुख व दु:ख या दोहोचेंही साधन जे चांद्रायणव्रत वगैरे पदार्थ, त्यांच्या बाबतींत (असें म्हणतां येईल कीं,) जर त्या वस्तूंत असलेल्या विशिष्टगुणरूपी सामग्रीमुळें (स्वसामग्रीवशात) पहिल्यानें त्यापासून मिळणार्‍या सुख या फलाविषयीं तीव्र इच्छा होत असेल तर, त्या फलाच्या साधनाविषयींही (म्ह० चांद्रायणव्रत वगैरेविषयीं) तीव्र इच्छा होते, उलट त्या वस्तूतील विशिष्ट गुणामुळें प्रथम त्यांतील दु:खरूपी फलविषयीं तीव्र द्वेष वाटत असेल तर, त्या दु:खरूपी फलाच्या चांद्रायण वगैरे साधनाविषयीही तीव्र द्वेष वाटतो. वस्तूंत असलेली विशिष्टगुणरूपी सामग्री जितकी उत्कट असेल तितकी त्या वस्तूविषयीची इच्छा (अथवा अनिच्छा) प्रबल होईल, अशी कल्पना करतां येते.
इच्छा व द्वेष यांची तीव्रता (अथवा उत्कटता) ही प्रस्तुत स्थळीं, इच्छा व द्वेष यांच्यांत असलेला विषयिता नांवाचा विशिष्ट धर्म. एकाच साधनानें उत्पन्न होणार्‍या इष्ट व अनिष्टरूपी दोन फळांपैकीं एकाच वेळीं एका फळाविषयीं तीव्र इच्छा व दुसर्‍याविषयीं तीव्र द्वेष संभवतच नाहीं. कारण तसें झालें तर चांद्रायणव्रत वगैरे एकाच वस्तूंत एकाच वेळीं इच्छा व द्वेषहीं दोन्हीही उत्पन्न होण्याचा प्रसंग येईल. तेव्हां ही वस्तु प्रबल अशा अनिष्टाचें कारण नाहीं व प्रबल अशा इष्टाचें कारण नाहीं असें जें ज्ञान याला (अनुक्रमें) साधनाविषयींची इच्छा व द्वेष यांच्या कारणतेच्या कोटींत घालूं नये. (म्ह० कारण मानूं नये.)
[एकाच साधनापासून उत्पन्न होणार्‍या इष्ट व अनिष्टरूप दोन फलांच्या बाबतींत एकाच वेळीं (त्यांतील) एकाविषयीं उत्कट इच्छा व दुसर्‍याविषयीं उत्कट द्वेष असूं शकत नाहीं; जर असूं शकेल असें मानलें तर चांद्रायण वगैरे (मागें सांगितलेल्या) पदार्थाविषयीं, एकाच वेळीं इच्छा व द्वेष या दोन (विरुद्ध) भावना उत्पन्न होण्याचा प्रसंग येईल. एवंच काय कीं, (एखाद्या इष्ट किंवा अनिष्ट वस्तूच्या उपायाविषयीं इच्छा किंवा द्वेष उत्पन्न करणार्‍या कारणाच्या खास धर्मांच्या कोटींत, ‘प्रबल अनिष्टाशीं’ संबद्ध नसणें, व प्रबल इष्टाशीं संबद्ध नसणें यांचा (अनुक्रमें) निर्देश करूं नये असें हें, ‘इदंतु बोध्यम’ येथपासून सुरु होणारें दुसरें मत.]
दुसरे कोणी (या बाबतींत) असें म्हणतात, (हें येथील तिसरें व शेवटचें मत) :--- “एखाद्या फलाविषयीं इच्छा होणें, ही एक गोष्ट, व हें फल मिळवून देण्याचें सामर्थ्य अमुक वस्तूंत आहे ही दुसरी गोष्ट; ह्या दोन्ही गोष्टी, त्या फालाच्या उपायाविषयींच्या इच्छेला कारण होतात. (आणि याच्या उलट) एखाद्या फलाविषयीं द्वेष वाट्णें ही एक गोष्ट; व हें फल मिळवून देण्याचें साधन अमुक वस्तु नाहीं असें ज्ञान, ही दुसरी गोष्ट; ह्या दोन्हीही गोष्टी त्या फलाच्या उपायाविषयीं वाटणार्‍या द्वेषाला कारण होतात. फलरूप वस्तूंतील (गुणांच्या) उत्काटतारूप सामग्रीचें प्राबल्य ज्या मानानें असेल त्यामानानें त्या फलाच्या उअपायाविषयीं इच्छा अथवा द्वेष उत्पन्न होतो; व असें मानण्याम्त गैर कांहींच नाहीं.”
या लोकांच्या मतें इष्ट व अनिष्ट ह्या उभयतांचें साधन जे गुण व दोष त्यांच्याविषयीं (स्वतंत्रपणें) इच्छा व द्वेष उत्पन्न होणें, त्याचप्रमाणें, गुणानें व द्वेषानें मिश्रित असलेल्या साधनाविषयीं (क्रमानें) इच्छा व द्वेष यांची सह्रदयांच्या मनांत उत्पत्ति होणें हें योग्यच आहे. उदाहरणार्थ :--- हिरडयाची पूड घेणें व केळीं खाणें या बाबतींत. (म्ह० हिरडयाची पूड खायला बेचव म्हणून त्याबद्दल द्वेष आणि सारक या गुणाबद्दल त्याच्याविषयीं वाटणारी इच्छा, या द्दष्टीनें, एकाच वेळीं, इच्छा व द्वेष वाटणें स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणें केळें खायला गोड ह्या त्याच्या गुणामुळें तें खाण्याची इच्छा व तें खाल्लें तर पोटांत अवरोध होतो ह्या त्याच्या दोषामुळें त्याचा द्वेष, अशा रीतीनें एकाच वेळीं त्याच्याविषयी इच्छा व द्वेष उत्पन्न होणें हेंही, योग्यच आहे.)


येथें रसगंगाधरांतील तिरस्कार प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP