“अनिष्ट वस्तूचें साधन या द्दष्टीनें, गुणाचें दोष म्हणून वर्णन करणें, व त्याचप्रमाणें ‘इष्ट वस्तूचें साधन’ या द्दष्टीनें दोषाचें गुण म्हणून वर्णन करणें हा लेश अलंकार.”
उदा० “हे कस्तुरी, सगळ्या सुवासांमध्यें श्रेष्ट अशा तुझ्या सुवासाबद्दल तूं फार गर्व करूं नकोस. कारण या आपल्या सुवासाच्या पायींच तूं, पर्वताच्या गुहेंत पडून राहाणार्या अतंत गरीब अशा आपल्या बापाचा (म्ह० कस्तूरीमृगाचा) प्राण घेतेस (म्ह० प्राण जायला कारण होतेस.)”
“(माणसांत) एकही गुण नसणेंच फार चांगलें. थोर गुण असण्याला धिक्कार असो. (पहा बरें) बाकीचीं झाडें डौलांत उभीं असतात; पण चंदनाचीं झाडें मात्र कांपली जातात.”
पहिल्या उदाहरणांत, गुणांचें, दोष म्हणून, नुसतें वर्णन केलें आहे; तर दुसर्या उदाहरणांत, दोषांचें गुण म्हणून केलेलें वर्णन अर्थान्तरन्यास या अलंकारानें युक्त आहे.
“पृथ्वीवरील शोक दूर करण्याकरतां तूं स्वर्गांतून खालीं येत असतां, तुला पूर्वी शंकरानें आपल्या जटांच्या गाठींत जी बांधून ठेवली तो, हे (गंगा) माऊली ! निर्लोभी माणसाच्याही मनांत लोभ उत्पन्न करणार्या तुझ्या गुणांच्या (गुणरूपी) अपराधाचाच हा परिणाम (म्हणायचा)”.
ह्या ठिकाणीं (श्लोकांतल्या) दोष या शब्दाचा अपराध हा अर्थ. गुणांचा अपराध असें म्हणण्यानें, गुणांना दोषच म्हटल्यासारखें आहे.
दोन प्रकारच्या व्याजस्तुति अलंकारानें ह्या अलंकाराचें काम भागतें, अशी शंका घेऊ नये. कारण (या लेशालंकाराच्या प्रत्येक उदाहरणांत) प्रारंभीं बाहेरून सांगितलेल्या अर्थाचा, त्याच्या विरुद्ध अर्थ सांगण्यांतच शेवट होतो, असें मुळींच नाहीं. (पहा) ‘अपि बत गुरुगर्बं०’ ह्या पद्याम्त (बाहेरून) कस्तुरीची निंदा असली तरी (आंतून) कस्तुरीची स्तुति करण्याचा कवीचा आशय आहे असें मुळींच नाहीं; उलट ही बापाचा प्राण घेणारी आहे अशी निंदा करण्याचाच कवीचा आशय आहे. असें असल्यामुळें, अप्रस्तुत कस्तूरीवृत्तांतानें सूचित होणारा जो प्रस्तुत - वृत्तांत त्यांतही निंदेंतच (कवीच्या तात्पर्याचा) शेवट होतो. त्याचप्रमाणे,
‘नैर्गुण्यमेव साधीय:’ या पद्यांतही दुसर्या झाडांची खरोखरीची निंदा सांगावयाची नसून, तीं झाडें सुखानें जिवंत राहूं शकतात याबद्दल, त्यांची स्तुति करण्याचाच कवीचा उद्देश आहे. आतां या श्लोकांत सूचित होणारा जो (प्रस्तुत) अर्थ, त्यांतही म्हणजे स्वत:च्या गुणामुळें कष्टी होणारे गुणी वगैरे प्रस्तुत वृत्तान्ताच्या वाक्यांत गुणहीनांची निंदा कवीला करायची नाही; उलट त्यांची (म्ह० गुणहीनांची) स्तुतीच करायची आहे. आतां भागीरथीच्या स्तुतीच्या प्रकारणात आलेल्या ‘स्खलन्ती स्वर्लोंकात०’ या, भागीरथीची स्तुति करणें ह्या संदर्भात आलेल्या श्लोकाचे, भागीरथीची स्तुति करणे हेंच तात्पर्य असेल तर, (या श्लोकांत लेश अलंकाराबरोबर) व्याजस्तुति अलंकारही माना; पण व्याजस्तुतीनें लेशाचा बाध करणें, ही गोष्ट मात्र योग्य होणार नाहीं. कारण व्याजस्तुतीला लेशाच्या ऐवजी न येतां, स्वतंत्र जागा दुसरीकडे मिळूं शकते.
उदाहरणार्थ :---
“हें नृपश्रेष्ठा ! सुवर्णपर्वत, (म्ह० मेरु), समुद्र व कुबेर हे तिघे (अनुक्रमें) ज्यांना कोश म्ह० मौल्यवान पदार्थ म्हणुन जवळ बाळ्गतात ते सूर्य, घोडा (उच्चै:श्रवा हा इंद्राचा गोडा) व दिग्गज हे तीन पदार्थ, अजूनही विद्यमान असतां. ‘मी मोठा दात आहे’ असा विनाकारण गर्व तूं कां वाहतोस ?” ह्या श्लोकांत सूर्य, उच्चै:श्रवा घोडा, (व दिग्गज) या मोजक्या (तीन) पदार्थांखेरीज बाकीच्या सर्व वस्तूंचे दान करणें ह्या, (श्लोकांत) शेवटीं सूचित होणार्या गुणाचे दोष म्हणून वर्णन केले नसल्यानें, आणि दोष म्हणून वर्णिलेल्या ‘रवि, घोडा वगैरेंचे दान न करणें’ ह्या गोष्टींचें गुण म्हणून (श्लोकांत) वर्णन आलें नसल्यानें व अशा रीतीनें गुण व दोष आपापल भिन्न विषय घेऊनच या श्लोकांत आले असल्यानें, येथें लेश अलंकाराचा जिला यक्तिंचितही स्पर्श झालेला नाहीं अशी व्याजस्तुति (म्ह० व्याजस्तुति अलंकार) आहे. अर्थात व्याजस्तुतीला दुसरीकडे (म्ह० व्याजस्तुति अलंकार) आहे. अर्थात व्याजस्तुतीला दुसरीकडे (म्ह० लेश जिथें नाहीं तिथें) स्वतंत्र जागा असते, ही गोष्ट स्पष्ट आहे. म्हणूनच, (दुसर्या बाजूनें सांगायचें म्हणजे) लेश (अलंकार) सुद्धां व्याजस्तुतीचा बाध करीत नसल्यानें, पूर्वी आलेल्या भागीरथीच्या स्तुतिपर ‘स्खलन्ती स्वर्लोकात० ’ या श्लोकांत लेश व व्याजस्तुति या दोन अलंकारांचा एकत्र समावेश केला आहे.
येथें रसगंगाधरांतील लेश प्रकरण समाप्त झालें.