तदगुणाच्या (थेट) उलत अतदगुण. जसें -“हे लक्ष्मी ! स्वभावत:च कठिण अशा तुझ्या स्तनांनीं आच्छादिलें असतांही तुझें अत्यंत मृदु अन्त:करण कठिण होत नाहीं. हे माउली ! हरिणांच्या शरीरांत कस्तुरी खूप वेळ राहिली तरी सुद्धां ती आपल्या सुगंधाच्या वैभवाला सोडीत नाहीं.”
ह्या श्लोकांच्या पूर्वार्धांत, दुसर्याचा गुण न घेणें ही गोष्ट प्रत्यक्ष शब्दानें सांगितली आहे, म्ह० शाब्द आहे. पण स्वत:चा गुण न टाकणें ही गोष्ट, (शब्दानें न सांगतां) अर्थानें सूचित केली आहे, म्ह० आर्थ आहे. उत्तरार्धांतील द्दष्टातांत, स्वत:चा गुण न टाकणें ही गोष्ट शाब्द व दुसर्याचा गुण न घेणें ही गोष्ट आर्थ आहे. हा अलंकार अवज्ञा अलंकाराहून निराळा (मानतां येणार) नाहीं, आशी शंका घेऊ नये. कारण उल्लासाच्या उलट अवज्ञा अलंकार; व तदगुणाच्या उलट अतदगुण आहे, अर्थात अवज्ञा व अतदगुण या दोन अलंकारांचे प्रतियोगी (अनुक्रमें) उल्लास व तदगुण, परस्परांहून भिन्न असल्यानें, हे दोन्ही अलंकार एकमेकांहून भिन्न आहेत, हे स्पष्टच आहे.
या अलंकारांत गुण न घेणारी जी दुसरी वस्तु तिच्या मानानें तिच्या जवळची, गुण असलेली (पहिली) वस्तु उत्कृष्ट किंवा बरोबरीची असू शकेल; या द्दष्टीनें अतदगुण दोन प्रकारचा मानावा, असें अलंकारसर्वस्वकार म्हणतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा - जवळची पहिली वस्तु, हीन दर्जाची असेल, तर तिचा गुण दुसर्या वस्तूनें न घेणें ही गोष्ट स्वभाविकच होईल; त्याम्त चमत्कार कांहींच नाहीं. (तेव्हां तसें सांगण्यांत, कसलाच अलंकार नाहीं.) म्हणून पहिल्या वस्तूच्या अपकृष्टपणामुळें होणारा जो तिसरा (अतदगुणाचा) प्रकार तो संभवतच नाहीं. (राहतां राहिले दोन प्रकार, हे वर सांगितलेच आहेत). पण कांहींचें म्हणणें असें आहे कीं, ‘हे जे अलंकारसर्वस्वकारांनीं अतदगुणाचे दोन पोटभेद सांगितले, त्यांतही कांहीं विशेष चमत्कार नसल्यानें, ते दोन्हीही प्रकार मानूं नयेत. आणखी दुसर्या कुणाचें म्हणणें असें कीं, उत्कृष्ट गुण असलेली वस्तु जवळ असणें हे गुण घेण्याचें कारण असूनही, तो उत्कृष्ट गुण घेणें हें कार्य न घडणें हें या अतदगुणाचें स्वरूप. तेव्हां (कारण असतांही कार्य न घडणें) या द्दष्टीनें, हा अतदगुण विशेषोक्ति अलंकाराचाच एक पोटभेद मानावा, त्याला निराळा अलंकार मानू नये. यावर कुणी म्हणतील, “या अलंकारांत कार्यकारणभाव सांगावयाचा नसतो. पण वस्तु जवळ असूनही तिचा गुण न घेणें एवढेंच येथें सांगावयाचें असतें. तेव्हां विशेषोक्तीहून अतदगुण निराळा मानावा.” पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण ‘वस्तु जवळ असतांनाही’ ह्यांतील ‘ही’ (म्ह० संस्कृतांत अपि) या शब्दानें ह्या अलंकारांत विरोधही सांगावयाचा आहे, असें सूचित होतें. नाहींतर अलंकाराला प्राणभूत अशी कोणतीही गोष्ट न सांपडल्यामुळें, याला अलंकारच म्हणतां येणार नाहीं. तेव्हां या अलंकाराचा प्राण विरोध हा आहे. आणि तो विरोध, कार्यकारणभाव सांगायचा नसेल तर, उत्पन्नच होणार नाहीं. मग हा अलंकार विशेषोक्तीहून भिन्न आहे, असें म्हणतां तरी कसें ?
येथें रसगंगाधरांतील अतदगुण प्रकरण संपलें.