पुढें स्पष्ट दिसणार्या एखाद्या वतूच्या निशिष्ट चिन्हांहून, अत्यंत साम्यामुळें निराळीं अशीं न वाटणारीं दुसर्या एखाचा वस्तूचीं विशिष्ट चिन्हें, जेव्हां स्वत:च्या कारणाचें (म्ह० खुद्द त्या दुसर्या वस्तूचें) अनुमान करूं देत नाहींत, तेव्हां त्या प्रकाराला मीलित अलंकार म्हणावें.
हाच आशय, खालील (पूर्वी केलेल्या विवेचनानाच संग्रह म्ह० संक्षेप करणार्या) कारिकेंत सांगितला आहे :---
“प्रत्यक्ष वस्तूच्या विशिष्ट चिन्हींहून, अप्रत्यक्ष वस्तूचीं चिन्हें निराळीं न भासल्यानें, जेव्हां तीं अप्रत्यक्ष वस्तु झांकली जाते, अथवा लोपून जाते, तेव्हां त्याला निमीलित अलंकार म्हणावें.’’
ह्या कारिकेंतील अनध्यक्ष (म्ह० अप्रत्यक्ष) हा शब्दा, पुढें येणार्या सामान्य अलंकाराला निराळा पाडण्याकरितां योजला आहे. कारण सामान्य अलंकारांत, (एका प्रबल अशा प्रत्यक्ष वस्तूमुळें) दुसर्या प्रत्यक्ष वस्तूचेंच पृथक ज्ञान होत नाहीं. तदगुण अलंकारांत दुसर्या वस्तूचे रंग (गुण) निराळे भासत नसले तरी, ती दुसरी वस्तु निराळी भासते; तेव्हां त्या अलंकारांशीं या मीलिताचा घोटाळा होणारच नाहीं.
उदाहरण :---
“पाण्यानें भरलेला घडा घाईघाईनें तळ्यावरून आणतांना, तळ्याच्या कांठावरील लताकुंजांत घडलेल्या तुझ्या गुप्त सुरताला भगवान कामदेव एकटाच जाणता झाला.”
ह्या ठिकाणीं रतिक्रीडेचीं निदर्शक चिन्हें - घाम, कंप, धापा टाकणें हीं, पाण्याचा घडा घाईघाईनें आणतांना दिसणारीं जीं अशींच चिन्हें त्याहून, निराळीं न भासल्यानें, (अप्रत्यक्ष असलेली) रतिक्रीडा लोपून गेली. (म्ह० तिचें ज्ञान कुणालाच झालें नाहीं.)
अथवा हें उदाहरण :---
“हे मृगनयने, कमळाच्या गाभ्याप्रमाणें सुगंधित अशा, पिकलेल्या तोंडल्याला फिक्कें पाडणारा ओठ ज्यांत आहे अशा, आणि ज्यांतील दांत माणिकासारखे आहेत अशा तुझ्या तोंडातला, तूं खाल्लेला विडा आम्हांला कसा ओळखावा बरें ?”
प्रैयकरानें ‘तूं विडा कां खात नाहींस’ असें विचारलें असतां, एकीनें उत्तर दिलें, ‘इतका वेळ खाऊनच मी आलें कीं; त्यावर प्रियकर तिला जें बोलला, तें या श्लोकांत आहे. पूर्वींच्या (म्ह. जलकुम्भ इ०) उदाहरणांत प्रत्यक्ष वस्तूची म्हणजे पाणी आणण्याच्या श्रमाचीं चिन्हें (घाम, कंप इत्यादि) नवीन उत्पन्न झालीं आहेत (म्हणजे ही चिन्हें पूर्वीं नव्हतीं); पण या दुसर्या उदाहरणांत ओठाचा रंग वगैरे स्वाभाविक चिन्हे आहेत, एवढाच (या दोन उदाहरणांत) फरक.
येथें मीलित प्रकरण पुरें झालें.