द्वितीय पटल - तत्त्वज्ञानोपदेश १

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.

या शरीरात मेरुपर्वत म्हणजे मेरुदंड पाठीच्या कण्यात स्थित असून तो सप्तद्वीपांनी वेढलेला आहे किंवा तो त्यांच्यासहित आहे. त्या प्रमाणेच या शरीरात नद्या, सागर, पर्वत, क्षेत्र क्षेत्रपाल यांचेही वास्तव्य आहे.

ऋषी, मुनी, सर्व नक्षत्रे, ग्रह, पुण्यतीर्थे, पीठे व पीठदेवता या शरीरात विद्यमान आहेत. या दोन्ही श्लोकांचा अभिप्राय हा आहे की, मनुष्याच्या शरीरात, ब्रह्मांडात जे जे आहे, ते ते सर्व स्थित आहे. अर्थात् त्याच्या शरीरात सर्व पुण्यस्थाने, तीर्थे, नद्या, तपोवने, देव, देवता, देवालये इत्यादि स्थित असल्याने, त्याने साधनाने शरीर व मन शुद्ध करून शरीरस्थ देव, देवतांची दर्शने घेऊन शेवटी शिवस्वरूप व्हावे. त्याला अन्यत्र कोठेही भटकण्याची आवश्यकता नाही.

सृष्टी निर्माण व संहार करणारे चंद्र व सूर्य या शरीरातच भ्रमण करीत असतात. आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी ही पाचही महातत्त्वे देहातच सदासर्वदा विद्यमान असतात. याचे तात्पर्य असे आहे की, सर्व काही शरीरात स्थित असले; तरी सद्गुरूची कृपा अर्थात् शक्तिपात होऊन कुलकुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही.
 
त्रैलोक्यामध्ये ज्या ज्या चराचर वस्तू आहेत त्या त्या सर्व या शरीरात मेरूच्या आश्रयाने राहून आपापल्या व्यवहारात प्रवृत्त होत असतात. जो मनुष्य हे सर्व जाणतो तो योगी होय, यात काहीही शंका नाही.

या शरीराला ब्रह्मांड असे नाव आहे. ब्रह्मांडात व या शरीरात कोणताही भेद नाही किंवा जे काही या शरीरात आहे ते सर्व ब्रह्मांडात आहे. ज्या प्रमाणे सृष्टीमध्ये सर्व देश व मेरुपर्वत आहे त्या प्रमाणे या शरीरात मेरुपर्वत म्हणजे मेरुदंड आहे. या मेरुदंडाच्या वर सहस्रारात चंद्र आपल्या आठही कलांनी स्थित असतो.

हा चंद्र अधोमुख होऊन - असून - तो रात्रंदिवस अमृताचा वर्षाव करीत राहतो. या अमृताचे एक सूक्ष्म व एक स्थूल असे दोन भाग होतात.

वरील अमृतातील एक भाग मंदाकिनीच्या पाण्याप्रमाणे इडानाडीच्या मार्गाने शरीराची पुष्टी करण्याकरिता प्रवाहित होतो. इडानाडीच्या द्वारा वाहणारा हा अमृताचा प्रवाह शरीराचे निश्चितच रक्षण व पोषण करतो. ही अमृतरश्मींनी किंवा सुधाकिरणांनी संयुक्त असलेली इडानाडी नाकाच्या डाव्या भागात स्थित आहे.

शुद्ध दुधाप्रमाणे कांती असलेला हा चंद्र हठपूर्वक आपल्या मंडलातून किंवा स्थानातून निघून मेरूवर येऊन इडानाडीच्या रंध्रमार्गाने प्रसन्नतापूर्वक अमृताचा स्राव करून शरीराचे पोषण करीत राहतो.

मेरुदंडाच्या मुळाशी अर्थात् खालील टोकापाशी आपल्या बारा कलांनी युक्त असा सूर्य आहे. दक्षिण पथाने अर्थात् पिंगला नाडीच्या मार्गाने प्रजापती अर्थात् ब्रह्मदेव आपल्या किरणांच्या साहाय्यान ऊर्ध्वगती म्हणजे वर गती असलेला असा होतो. ॥१०॥
==
चंद्रापासून स्रवणार्‍या अमृताचा सूर्य आपल्या किरणांच्या सामर्थ्याने निश्चितच ग्रास करतो व वायूमंडलाशी समरस किंवा एकरूप होऊन सर्व शरीरात भ्रमण करीत राहतो.

दक्षिण मार्गाने वाहणारी अर्थात् नाकाच्या उजव्या बाजूला स्थित असलेली पिंगला नाडी ही सूर्याचे दुसरे स्वरूपच असून ती निर्वाण देणारी आहे. सृष्टीची निर्मिती व संहार करणारा सूर्य लग्नयोगाने अर्थात् सूर्यग्रहणांच्या चिन्हाने या नाडीच्या द्वारा प्रवाहित होत राहतो.

मानवी शरीरात साडेतीन लक्ष नाड्या आहेत. यांमध्यें चौदा नाड्या प्रमुख आहेत. सुषुम्णा, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिहवा, कुहू, सरस्वती, पूषा, शंखिनी, पयस्विनी, वरुणा, अलंबुषा, विश्वोदरी व यशस्विनी अशी ही चौदा प्रमुख नाड्यांची नावे असून या चौदा नाड्यांमध्येही पिंगला, इडा व सुषुम्णा या तीन नाड्या जास्त महत्त्वाच्या आहेत.

इडा, पिंगला व सुषुम्णा या तीन नाड्यांमध्ये सुषुम्णा ही सर्वात श्रेष्ठ व मुख्य असून ती योगीसाधकांना अत्यंत प्रिय आहे. कारण ती त्यांना परमपदाचे दान करणारी अर्थात् सहस्रात जीवस्वरूप साधकाला शिवस्वरूप प्राप्त करून देणारी एकमात्र नाडी आहे. इतर सर्व नाड्या सुषुम्णा नाडीच्या आश्रयानेच शरीरात वास्तव्य करतात.

या तीन नाड्या अधोमुख अवस्थेत शरीरात स्थित असतात अर्थात् या नाड्यांची गती खालच्या बाजूला अर्थात् बहिर्मुख अशी आहे. या नाड्यांचा आकार कमळाच्या तंतूसारखा आहे. या तीनही नाड्या चंद्र, सूर्य व अग्निस्वरूप आहेत म्हणजे इडानाडी ही चंद्ररूप, पिंगला नाडी ही सूर्यरूप व सुषुम्णानाडी ही अग्निरूप आहे. या तीन नाड्या पृष्ठवंश अर्थात् मेरुदंडाच्या आश्रयाने शरीरात स्थित असतात.

या तीन नाड्यांच्या अगदी अंतर्भागात चित्रा नावाची नाडी असून ती मला अत्यंत प्रिय आहे, ( असे श्रीशंकर म्हणतात. ) या चित्रानाडीमध्येच सूक्ष्माहून सूक्ष्म व अत्यंत शुभदायक असे ब्रह्मरंध्र आहे.

चित्रानाडी ही तेजस्वी अशा पाच रंगांची व शुद्ध असून ती सुषुम्णानाडीच्या मध्यातून अर्थात् अंतर्भागातून गमन करते. ही चित्रानाडी शरीराचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असून ती सुषुम्णानाडीचा केंद्रबिंदू आहे अर्थात् चित्रानाडी ही आत्मस्वरूप प्राप्त करून देणारी आहे.

या नाडीच्या मार्गाने ऊर्ध्वगमन करणे यालाच शास्त्रकारांनी अमृत व आनंद प्राप्त करून देणारा दिव्य मार्ग असे म्हटले आहे. या नाडीच्या ध्यानाने अर्थात् या नाडीच्या मार्गाने प्राणांचे ऊर्ध्व संचलन झाल्याने योगीसाधकांच्या सर्व पापांचा नाश होतो. ॥२०॥
==
गुदस्थानाच्या दोन अंगुळी वर आणि मेढ्रस्थानाच्या म्हणजे लिंगाच्या दोन अंगुळी खाली चार अंगुळांचा विस्तार असलेले एक आधारकमल समरूपात विद्यमान आहे. ( यालाच मूलाधार चक्र असे म्हणता. )

त्या आधारपद्माच्या कर्णिकेमध्ये अर्थात् दांडीमध्ये अत्यंत सुंदर किंवा सुशोभित अशी त्रिकोणाकार योनी आहे. ही योनी सर्व तंत्रात अत्यंत गुप्त ठेविलेली आहे. अर्थात् ती प्रकाशित किंवा प्रकट करण्याची आज्ञा कोणत्याही शास्त्रात नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही अनधिकारी व्यक्तीला या योनिस्थानाची माहिती देता कामा नये आणि अधिकारी पुरुषाला या आधारचक्राची माहिती अवश्य द्यावी.

या आधारचक्राच्या ठिकाणीच परमदेवता कुंडलिनी निवास करते. ती विद्युल्लतेच्या आकारासारखी अर्थात् कुंडलाकार आहे. ही कुंडलिनी शक्ती साडेतीन वेढे घेतलेली असून ती कुटिल अर्थात् चक्राकार आकार घेऊन सुषुम्णामार्गात अर्थात् सुषुम्णामार्गाच्या द्वारावरच राहिलेली आहे.

ही कुंडलिनी शक्ती जगताची विविध प्रकारे निर्मिती व रचना करण्यामध्ये उत्साहपूर्वक उद्यत राहणारी आहे. ही शक्तीच वाग्देवी असून ती वाचा व अवाचा स्वरूप आहे. म्हणजे तिच्यामुळेच मनुष्य वाणीने बोलू शकतो व तिची अनुपस्थिती असल्यास तो बोलू शकत नाही अर्थात् कुंडलिनी शक्ती वाग्देवी ही वाच्य व अवाच्य स्वरूप आहे. याचा अर्थ असा आहे की, जेवढे म्हणून सर्व सारस्वत म्हणजे वाड्मय आहे ते तिचे वाच्य स्वरूप असून मौन, ध्यान किंवा समरसता हे तिचे अवाच्य स्वरूप आहे.  या कुंडलिनी शक्तीला सर्व देवता नमस्कार करतात.

( मेरुदंडात ) डाव्या बाजूला असलेली इडा नावाची नाडी सुषुम्णा नाडीला आवृत करीत, तिला गुंडाळीत किंवा तिच्याशी मिळून मिसळून ( मूलाधारातून निघून ) उजव्या नाकपुडीपर्यंत गेली आहे.

( मेरुदंडात ) उजव्या बाजूला असलेली पिंगला नावाची नाडी सुषुम्णा नाडीला आवृत करीत तिच्याशी मिळून मिसळून तिच्या साहाय्याने ( मूलाधारातून निघून ) डाव्या नाकपुडीपर्यंत गेली आहे.

इडा व पिंगला या नाड्यांमध्येच सुषुम्णानाडीचे खरोखर स्थान आहे किंवा या दोन नाड्यांमधून ती प्रवाहित झाली आहे. या सुषुम्णानाडीतील सहा स्थानात सहा शक्तींचा निवास आहे. डाकिनी, हाकिनी, काकिनी, लाकिनी, राकिनी व शाकिनी अशी या सहा शक्तींची नावे आहेत. या सहा स्थानामध्ये सहा कमलेही आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान मणिपूर, अनाहत, विशुद्द व आज्ञा अशी या षट्कमलांची नावे आहेत. या सहा कमलांना किंवा पद्मांना षट्चक्रे असेही म्हणतात. योगीसाधकांना अर्थात् योग जाणणार्‍या विद्वानांना आपल्या साधनामुळे या षट्चक्रांचे ज्ञान होते.

सुषुम्नेची पाच स्थाने आहेत. या स्थानांची नांवे खूप आहेत अर्थात् निरनिराळ्या शास्त्रकारांनी निरनिराळी नावे या स्थानांना दिलेली आहेत. ज्यावेळी हेतूच्या सिद्धीसाठी अर्थात् सहस्त्रारात जीवशिवाचे मीलन होण्यासाठी साधक साधन करू लागतो त्यावेळी त्याला या स्थानांची माहिती होते.

इतर सर्व नाड्या मूलाधारापासून निघून जीभ, मेढ्र, नेत्र, पायांचे अंगठे, कान, कुक्षी, कक्ष, हातांचे अंगठे,गुद, उपस्थ इत्यादि सर्व अंगांमध्ये जाऊन त्यांचा तेथे शेवट होतो. या सर्व नाड्या मूलाधारापासून उत्पन्न होऊन वर वर्णन केल्याप्रमाणे आपापल्या गंतव्य स्थानापाशी जाऊन थांबल्या आहेत अर्थात् निवृत्त झाल्या आहेत. ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP