वरील प्रकरणी ज्या गोष्टीचा विचार केला, त्यांचे धर्मशास्त्रदृष्ट्या महत्त्व तर आहेच; परंतु कित्येक गोष्टींचे महत्त्व धर्मशास्त्राहून निराळ्या शास्त्रांच्या दृष्टीनेही फ़ार मोठे आहे. उदाहरणार्थ, वधू ही खरोखर स्त्री असावी, तिची पिढी निरोगी असावी, तिला स्वत:ला असाध्य व्याधी काही नसावी. तिला भाऊ असावे, निदान तिच्या कुळात कन्यासंततीचे प्राचुर्य नसावे, वर आणि वधू यांचा सपिंडसंबंध अगर गोत्रप्रवरसंबंध नसावा, या गोष्टी वैद्यकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत यात संशय नाही.
वरापेक्षा वधू वयाने व अंगापिंडाने लहान असावी, तसेच ती कांता म्हणजे रमणीय असावी, व तिची अंतर्बाह्य लक्षणे चांगली असावी, या गोष्टींचा संबंध पर्यायाने सौन्दर्यशास्त्र व स्वभावपरिज्ञानशास्त्र या दोहोशी अति निकटचा आहे. वास्तविक विचार करू गेल्यास वधू आणि वर यांच्या संबंधाने कायमचा निर्णय करिता येण्यास या शास्त्रांच्या दृष्टीने ह्या विषयाचे परिशीलन होणे हे निव्वळ धर्मशास्त्रीय विचारापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.
धर्मशास्त्र हे केवळ श्रद्धेचा विषय आहे, व निरनिराळ्या लोकांच्या मते त्याचा निरनिराळ्या प्रकारे आदर होईल. त्याचा संबंध केव्हा केव्हा ऐहिक विषयांशी असतो, यामुळे त्यापासून उद्भवणार्या बर्यावाईट परिणामांचा अनुभव मनुष्यास ऐहिक व्यवहारातही येऊ शकतो. परंतु ज्या गोष्टी शास्त्रमताने निव्वळ पारलौकिक असतात, त्यांच्या बरेवाईटपणाचा अनुभव या जन्मात कोणासही घेता येत नाही. कित्येक बाबतींत केव्हा केव्हा अनुभव आलासा वाटला, तथापि त्याच्या कार्यकारणभावाची व्यवस्था प्रत्येक मनुष्यास आपआपल्या श्रद्धेच्या धोरणानेच करण्याची पाळी येते. भौतिक शास्त्रांची गोष्ट निराळी आहे. त्यांवर श्रद्धा ठेवा अगर न ठेवा, निसर्गदृष्ट्या प्रत्येक गोष्टीची कार्यकारणपरंपरा शाश्वतिक व निश्चित नियमांचेच अनुसरण करणारी असते. अपूर्ण दृष्टीचा व अपुर्या समजुतीचा मनुष्य या नियमांचे ज्ञान करून घेण्याची प्रयत्न यथाशक्ती करीत असतो; व परिस्थिती जशी अनुकूल अथवा प्रतिकूल असेल, तसे त्याला निरनिराळ्या प्रकारचे अनुभव घडतात. एक वेळ आलेला अनुभव सर्वकाळ एकसारखाच रहात नसल्यामुळे ज्या वेळी जसा अनुभव, तसा त्या वेळी भौतिक नियमांचा मनुष्याच्या मनास निरनिराळा साक्षात्कार झाल्यास भास होतो.
कसेही असो; मानव प्राण्याच्या बुद्धीस या भासापासून एक प्रकारची तरतरी येते, व या तरतरीच्या कारणानेच मनुष्यास आपली जीवनयात्रा कंटाळवाणी वाटेनाशी होते. हा कंटाळवाणेपणा, नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे यातच मानवबुद्धीचे व्यावहारिक सर्वस्व आहे. या प्रयत्नामुळेच अविज्ञात गोष्टींचे यथाशक्ती आकलन आजपावेतो मनुष्याने केले आहे; व होराज्योतिष, सामुद्रिक, शकुन इत्यादी कल्पनामिश्रित शास्त्रांची उत्पत्तीही यापासून झाली आहे. या शास्त्रात वर्णिलेल्या गोष्टी अनेक आहेत, व त्यांचे अनुभवही अनेक प्रसंगी येतात, यामुळे या शास्त्रांवरची मनुष्याची श्रद्धा कमी-जास्ती प्रमाणाने बसते. प्रत्यक्ष व्यवहारात या श्रद्धेपासून अनेक चांगले अगर वाईट परिणाम घडतात, व वाईट प्रयत्न टाळण्याकडे मनुष्याची साहजिक प्रवृत्ती होते.