मानवी महत्वाकांक्षा ! उंच उंच शिखरावर जाऊन बसावयाचे आहे. अमुक एक ध्येय साध्य करावयाचे आहे, यासाठी बिचारीची कोण धडपड चालू असते ! कृतनिश्चयाने भारून जाऊन असेल नसेल तितके बळ एकवटून धडपडत धडपडत ठेचा खात ती चढू लागते खरी, पण शिखरावर जाऊन बसलेली आपल्यांला किती वेळ बरी दिसते ? क्कचितच् !
आज सगळे जग पादाक्रांत करावयाचे आहे तर उद्या त्याच जगात वावरणार्या मानवी चित्रित करून थक्क करून सोडावयाचे आहे किंवा देशाच्या पोटात गुदमरणार्या इतिहासाला मुक्त करून, त्याच्या योगाने गुलामगिरीत खितपत पडलेल्या माझ्या देशबांधवांना कर्तव्यजागृतीने व राष्ट्राभिमानाने थरारून सोडून त्यांच्या हातून मोठमोठी कृत्ये करवावयाची आहेत. अशा एक ना दोन ! हजारो आकांक्षा उराशी बाळगून, त्या साध्य करण्यासाठी कितीतरी जीवांची सारखी तळमळ चालू असते.
आता ध्येयाकडे निश्चल दृष्टी ठेवून कपारी कपारीने जीवाचा फेस काढीत चढत जाणार्यांपैकी कितीतरी मध्येच आधार सुटून धाडकन कोसळून पडले आहेत - आज पडत आहेत व दुर्दैवाने पुढेही पडतील. पण ह्या पडण्यामुळे ध्येयाकडे धाव घेणार्या मानवी अंतःकरणाचा उत्कटपणा थोडाच कमी होतो आहे ? जन्मभर अविश्रांत धडपड करून एखाद्याला नेपोलियन बोनापार्ट होता आले नसेल, किंवा शेक्सपिअर अगर वॉल्टर स्कॉट होण्यापूर्वीच तो मृत्युमुखी पडला असेल ! म्हणून त्याच्या अंतःकरणाची धाव नसतील म्हणावेत, तर शिवाजी महाराजांचे व येसूबाईसाहेबांचे चित्र कसेबसे पण अत्यंत प्रेमाने आपल्या डोळ्यांपुढे रेखाटून, आपणात नखशिखान्त कर्तव्य जागृती उत्पन्न करणारे सहकारी कृष्ण, - वॉल्टर स्कॉटच्या योग्यतेचे नव्हतेच का ?
‘ स्कॉटने अनेक ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या आहेत तर ‘ सहकारी कृष्णाने काय कशीबशी एकच कादंबरी लिहिली आहे ’, खरे आहे. पण स्कॉटच्या अंतःकरणात जितका स्फूर्तिदायक इतिहास खळबळत होता तितकाच सहकारी कृष्णांच्या अंतःकरणात खळबळत होता, हे तर निर्विवाद आहे ना ? मग एकाच कृतीच्या पुरचुंडीवरून अहोरात्र ध्येयाकडे धाव घेणार्या अंतःकरणाचा अनंतपणा आपण कशाला बरे मोजून पहावा ?
जुनट दुहीच्या शापाने होरपळून निघत चाललेल्या महाराष्ट्राला नवजीव देऊन त्याच्या अंतःकरणात खर्या कर्तव्याची थोडीफार जाणीव उत्पन्न करणारे आपले सहकारी कृष्ण ऊर्फ कृष्नाजी अनंत एकबोटे हे शके १८०२ वैशाख शु. १२. सन १८८० मे शुक्रवार ता. २१रोजी जन्मास आले. हृदयात हळूहळू प्रकाश पडू लागणे व त्यामुळेच पुढे पुढे ‘ आत्मोध्दार ’ करण्याची सारखी तळमळ वाटू लागणे व त्यामुळेच जगाच्या नियमाप्रमाणे जीवांना जे बालपणापासून परिस्थितीचे असह्य फटकारे सोसावे लागतात ते सर्व फटकारे कृष्णरावांना कसे बसले आहेत याचे हुबेहूब चित्र त्यांनी आपल्या ‘ आत्मोद्धारा ’मध्ये उत्कृष्ट रीतीने रेखाटले आहे.
ईश्वरनिर्मित सृष्टीतील असंख्य चमत्कारांची हळूहळू गोडी लावून, कालांतराने भगवंताशी तादात्म्य करणारे व ह्याच्याच बरोबर खर्या पुरुषार्थाचा व स्वदेशाभिमानाचा ओनामा शिकविणारे बालशिक्षण मिळावयाचे एकीकडेच राहून, अंगाची सालडी काढणारे व मनाला कायमचे दुखणाईत करून ‘ फुकट जन्म ! ’ असे वाटायला लागणारे गृहशिक्षण व शाळेतील शिक्षण, कृष्णरावांना मिळाले. अशाप्रकारे पुणे येथील रंगोपंताच्या गावठी शाळेतील मेलेले शिक्षण संपादन केल्यावर, पोकळ अभिमान व भ्रामक कल्पना व मनुष्याची दिगंती कीर्ती नेणारी ध्येये, डोक्यात भरविणारे शिक्षक आणि विद्यार्थी या परस्परांत वैर असलेले व म्हणूनच उदरनिर्वाहार्थ खर्डेधाशी करायला लावणारे, चालू परिस्थितीतील भारदस्त इंग्रजी शिक्षण मिळवण्याकरता ते येथील नूतन मराठी विद्यालयात इंग्रजी पहिल्या इयत्तेत आले.
परीक्षा पास होऊन वरच्या इयत्तेत मोठ्या दिमाखाने जाता यावे, अशा प्रकारची अभ्यासाची तयारी येथे तरी त्यांनी ठेवावयाची होती; पण महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यांना इंग्रजी दुसर्या इयत्तेत आल्यापासूनच इतिहासवाचनाची गोडी का न लागावी ? आधीच ऐतिहासिक पुस्तके एक नाही तर दोन हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी व इकडे वाचनाची हाव तर दिवसेदिवस अधिकाधिक वाढत चाललेली. मग काय ? नाटके, कादंबर्या वगैरे बरीवाईट दिसतील ती पुस्तके त्यांनी वाचून टाकली. अर्थात असल्या अव्यवस्थित वाचनाबद्दल त्यांना नेहमी अलीकडे हळहळच वाटत असे. नंतर इंग्रजी तिसर्या इयत्तेच्या परीक्षेत ते पसार झाले नसल्या कारणाने, चालकांणी चौथ्या इयत्तेत जाऊन बसली. येथेही लवकर परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने अखेरपर्यंत त्यांच्या अभ्यासाचा मुळीच जम बसला नाही. साहजिकच आहे ! मुलगा अभ्यास करतो काय, वागतो कसा, या गोष्टींकडे पालकांचे मुळीच लक्ष नाही; व दुसरीकडे अनावर संख्याधिक्याखाली राष्ट्रातील होतकरू तरुणांना चिरडून त्यांना अर्धमेले करून टाकणारी व परिस्थितीमुळे निव्वळ गिर्हाईकी तत्त्वांवर चालणारी, आपल्या शिक्षणसंस्थांची व्यवस्था ! मग कशाचा मनोविकास आणि कशाचा राष्ट्रीयविकास ! उलट अशा शिक्षणपद्धतीच्या कचाट्यात सापडून हातपाय मोडून निघालेली हीच अंतःकरणे खुरडत खुरडत आपला संसारपथ कुठे आक्रमू लागतात न लागतात, तोच विक्राळ दारिद्र्याचे असह्य फटकारे बसून, ‘ देवा ! हा आमचा संसार की नरकवास ! ’ असे विचारीत विचारीत परमेशाच्या चरणांजवळ धाय मोकलून रडत असतात ! आपल्यातील जी थोडीफार माणसे मोठेपणास चढली आहेत, ती शिक्षणसंस्थांतील उत्तेजनामुळे ( ? ) मुळीच नसून निव्वळ बाह्य परिस्थितीत होणार्या घडामोडीमुळे चढली आहेत. आपल्या सहकारी कृष्णांच्याच बाबतीत पाहिले तर त्यास सहज वाचनाचा नाद लागला व पुढे तो बळावला म्हणून बरे ! नाहीतर आपल्याला मध्यमस्थितीत कसेबसे दिवस कंठणार्या कुटुंबातील अंतःकरणाचे जसेच्या तसे बोल, त्यांच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेले ऐकावयाला सापडले असते का ?
कृष्णरावांचा मरेपर्यंत वाचनाचा किती जबर व्यासंग होता याची फारच थोड्यांना कल्पना करता येईल ! इंग्रजी चौथ्या इयत्तेत आल्यापासून ही इंग्रजी पुस्तके वाच ती वाच, असा सारखा त्यांचा क्रम चालू होता. मात्र या वाचनामुळे व अभ्यासात वरचेवर खो आणणार्य़ा क्रिकेट खेळण्याच्या नादामुळे, त्यांचे शाळेतील अभ्यासाकडे लक्ष राहिले नाही ते नाहीच. इकडे मुलगा मोठमोठी पुस्तके वाचतो आहे, मग ती अभ्यासाचीच असली पाहिजेत, असे आपल्याशीच समाधान मानून त्यांचे वडीलही स्वस्थ होते. पुढे इतिहास व इंग्रही या दोन विषयात पास होत गेल्या कारणाने ढकलत ढकलत ते सातव्या इयत्तेत तर येऊन पोहोचले. पण थॅकरे, डिकन्स, लिटन्, शेक्सपिअर वगैरे नामंकित लेखकांचे ग्रंथ वाचण्यात वेळेचा दुरूपयोग - ( अर्थात् जगाच्या म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने ) करून आपण सगळा स्कॉट वाचला आहे व हेन्री वुडच्या सत्तावीस कादंबर्या वाचल्या आहेत, अशा अभिमानात कर्क होऊन निघाल्यामुळे त्यांची परीक्षेच्या अभ्यासाची कितीशी तयारी होणार ? शिवाय ‘ नाही परिक्षा पास झाली तर नाही, निदान आपण नामांकित ग्रंथकार तरी होऊ, दारिद्र्याची काय बिशाद आहे, त्याच्याचमुळे तर कित्येक विख्यात लेखक झाले आहेत ’ अशाप्रकारचे भावी प्रसंग कल्पनासृष्टीत रेखाटण्यात स्वारी गर्क झालेली ! मग कशाची परीक्षा आणि काय !
युनिव्हर्सिटीच्या मंडपात थॅकरे, डिकन्स यांचा वशिला न पटल्यामुळे प्रथम तर त्यांना हात हालवीतच परत यावे लागले. पण परीक्षा उतरलेली नसली म्हणून काय झाले, मुलग इंग्रजी शिकतो आहे, सातव्या इयत्तेत आहे, अर्थात् त्याचे लग्न हे व्हावयालाच पाहिजे. या महाराष्ट्रीय तत्त्वाला एकनिष्ठपणे अनुसरून शिक्षणाच्या बाबतीत थोडेफार दुर्लक्ष करणार्या त्यांच्या वडिलांनी चिरंजीवाच्या लग्नाच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष घालून कृष्णरावांचा विवाह तर उरकून टाकला. ही नवी पण कायमची जबाबदारी अंगावर येऊन पडली तरी मनाला श्रीमंत व घराला भिकारी करणार्या त्यांच्या वाचनाच्या व्यासंगाला आळा म्हणून बसेना ! याचा परिणाम पुन्हा परीक्षेत नापास होण्यापलीकडे दुसरा काय होणार ? दुसर्यांदाही परीक्षा न उतरल्यामुळे वडिलांकडून आणि तीही त्यांच्या पत्नीदेखत सारखी वरचेवर दुःसह बोलणी सोसावी लागली. यामुळे ‘ पुष्कळ नामांकित ग्रंथकार भिकारीच होते ! पैशाची काय पत्रास आहे ! ’ ही समजूत बाजूला सारून त्यांना अभ्यासात लक्ष घालावे लागले.
तिसर्या खेपेला मात्र निव्वळ एकाच परीक्षेत नसून मॅट्रीक व यू. एस. एफ. या दोन्हीही परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.
आता काय परीक्षा पास झाली, आपल्याला हा हा म्हणता नोकरी मिळेल, मग आपल्याला घरात बोलण्याची कोणाची प्राज्ञा नाही, अशा ऐटीने तरर्र होऊन, अर्जाची फेकाफेकी तर जिकडे तिकडे कृष्णरावांणी सुरू केली. आज उत्तर येईल, उद्या येईल, ही वाट पाहण्यात काही दिवस गेल्यावर त्यांनी ‘ कारकुनकी नाहीतर मास्तरकी ’ या उदर भरणार्या सक्तीच्या नियमाला अनुसरून नूतन मराठी विद्यालयात पाचसहा महिने शिक्षकाचे काम केले. शाळेत असताना आपल्या वर्गातील काही होतकरू मुलांची मने आपलीशी करून त्यांस सुटीच्या दिवशी आपल्या घरी बोलवावे, त्यांस निवडक पुस्तके वाचावयास द्यावीत व मन मोकळे करून बोलून त्यांची अंतःकरणे भविष्यकालाविषयी उत्साहपूर्ण करावी हा त्याचा अनुकरणीय क्रम सारखा चालूच होता. आपले विद्यार्थी व त्यांचे भावी आयुष्य, याचा शिक्षणाच्या धंद्यात पडलेल्यांपैकी कितीजण बरे असा विचार करीत असतात ? ‘ अमुक एका शिक्षकाच्या उत्तेजनामुळे मी भाग्यवान झालो ! ’ असे कृतज्ञतेचे उद्गार किती विद्यार्थ्यांच्या तोंडून बरे निघतात ? पुढे कृष्णरावांनी जरी शाळेतील नोकरी सोडली, तरी ते आपल्या या विद्यार्थी - स्नेह्यांना शक्य ती मदत करीतच गेले.
याप्रमाणे शाळेत नोकरी केल्यावर मुंबईस सॉर्टिंग खात्यातून नोकरीस आमंत्रण आल्यावरून ते ‘ क्या गद्धेके माफक काम करता है । ’ अशाप्रकारची हेडसॉर्टरची बोलणी ऐकत व त्यांच्याच बरोबर ‘ फेक देव तेरा थॅकरे और डिकन्स । ’ अशा मनाच्या टोचण्या सोशीत सरकारी नोकरी तर करू लागले. परंतु ही दगदगीची नोकरी त्यांच्या प्रकृतीला मानवली नाही; म्हणून ती सोडून देऊन प्रथम सॅनिटरी कमिशनरच्या कचेरीत व तेथून कोर्टात सेक्शन - रायटरचे काम करण्यात त्यांनी काही दिवस घालविले. पुढे कचेर्यांचे उंबरठे झिजवता झिजवता व एक दोन शिफारशींवरून त्यानंतर पुणे येथील डिस्ट्रिक पोलिस सुपरिन्टेंडटच्या आफिसात पंधरा रुपयांची नोकरी लागली. पंधराचे वीस, वीसचे पंचवीस; संपले ! कारण त्यांच्या मानी स्वभावाला कोणापुढे दात विचकण्याचे मुळीच खपत नसल्यामुळे व कानांनी बरेच कमी ऐकू येत असल्यामुळे त्यांना, कामाच्या भाराखाली व प्लेगच्या दिवसात मरायचेच झाले तर निदान एकदोन दिवस औषधापाण्याला व स्वतःच्या प्रेतसंस्काराला जेमतेम पुरे, इतक्या, या दरमहा पंचवीस रुपये तनख्यातच मरेपर्यंत खितपावे लागले. ‘ आपली परीक्षा उतरली, आता मोठी नोकरी मिळेल ! ’ ही आशा तर एकीकडे ढासळून पडलेली, व दुसरीकडे आडाच्या जागी राहून आपण, पत्नी, व दोनचार मुलेबाळे यांच्या पोषणाची जबाबदारी ! शिवाय चांगली चांगली पुस्तके विकत घेऊन ती वाचण्याचा अतिशय नाद. या ओढाताणीत त्यांचा ‘ संसार नरकवास ’ झाला असेल, याची कल्पना तशाच परिस्थिती विव्हळणार्य़ा आपल्याकडील कृष्णरावांच्या स्नेह्यांणी वरचेवर त्यांना शक्य तितकी मोठ्या भक्तीने मदत केली येवढीच काय त्यांना समाधान मानायला जागा होती. स्वभावाने अत्यंत सरळ व प्रामाणिक, दुसर्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमी तत्पर व देशाच्या उत्कर्षाची सारखी तळमळ, या अमोलिक गुणांवर कोणाची बरे भक्ती बसणार नाही ?
कृष्णरावांना देशाच्या उत्कर्षाची तळमळ किती होती याची थोडीफार साक्ष ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विविध विषयांतील पुस्तकांनी व मासिकांनी भरलेला ग्रंथसंग्रह पाहिला असेल त्यांना व जे जे पाहतील त्यांनाच फक्त होईल. मध्यम स्थितीत रखडणार्या प्राण्यांना आपला संसार कसा सुखाचा करता येईल, हा प्रश्न ज्यात निरनिराळ्या बाजूंनी थोडाफार सोडविला आहे, अशी मासिके व पुस्तके - स्वतःच्या कुटुंबाला अर्धपोटी व फाटक्यातुटक्या चिंध्यात ठेवून - विकत घेऊन ती वाचण्यात व त्यांतील उपयुक्त तत्त्वे लहानलहान पुस्तकांच्या द्वारे आपणा महाराष्ट्रीयांच्या अंतःकरणात बिंबवून देण्यात, त्यांनी रात्रीचा दिवस केला. हे सर्व कोणाकरिता बरे ? आपल्याच करता ना ? देशाची कळकळ होती म्हणूनच ना ? १‘९१३ सालापासून ही ‘ प्रेमाची मूस का पुरुषार्थाची कूस ’, ‘ माझी कहाणी ’, ‘ हा संसार की नरकवास ’, ‘ आत्मोद्धार ’, ‘ देहस्वभाव ’, ‘ संक्रांत ’, ‘ शिकली पण चीज केले ’, ‘ आधुनिक स्वयंवर ’, ‘ मानापमान ’, ‘ अपमानाचा मान ’; त्याचप्रमाणे, ‘ संकट की सौभाग्य ’, ‘ खुनाचा आरोप ’, ‘ चैत्राचा महिना ’, ‘ वर्षारंभ ’ व ‘ अखेरचा स्वार्थत्यागी देशस्थ ’ ही विविध मनोवृत्तींच्या सुवासांनी व रंगांनी नटलेली पुष्पे आपल्याला अर्पण करण्याचा कृष्णरावांनी - या स्वार्थत्यागी देशस्थाने - उगीचच का अट्टाहास केला ?
कोणाला त्यांची कथानक रचना आवडणार नाही, तर कोणाला त्यांची भाषापद्धती व काही काही विचार रुचणार नाहीत. पण त्यांचे अंतःकरण - अधोगतीला जाणार्यांना थोपवून त्यांना उत्तेजनपूर्वक सन्मार्गाला लावणारे व ‘ शपित महाराष्ट्राला ’ परमेश्वरच्या चरणाजवळ एकीचा, स्वाभिमानाचा व कर्तव्यजागृतीचा निरंतर उःशाप मागणारे त्यांचे अंतःकरण - सर्व बंधूभगिनींनो, तुम्हाला खरोखरच आवडते आहे ना ? श्रीमंती - गरीबीचा झगडा, सहकारित्व, स्त्रीशिक्षण वगैरे सामान्य जनांना सहसा न कळणारे विषय सहसा गोष्टींच्या रूपांनी - व तेही आपल्या समाजाच्या अंतरंगात शिरून किती कुशलतेने व मार्मिकतेने रेखाटले आहेत, हे त्यांची पुस्तके वाचणार्यांना सहज कळून येईल.
इतकेच नाही तर कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुशिक्षितांत ( ? ) जो आपलेपणा, जागृत केला तोच रात्रंदिवस ठेचाळणार्या अर्धवट शिक्षितांत, सहकारी कृष्णांनी जागृत केला. व मग त्यांच्या आत्म्याने, या श्रेष्ठ पुरुषाच्या देशाविषयी कळवळणार्या आत्म्याने, ‘ देवा ! महाराष्टातील कर्तव्यतत्पर तरुणांचा अकाली संहार करू नकोस ! ’ असा ईश्वराच्या चरणांजवळ उःशाप मागण्याकरिता गुरुवार ता. २३ नोव्हेंबर सन १९१६ रोजी देवलोकी प्रयाण केले.
झाले ! सहकारी कृष्णांच्या आयुष्यातील आता एकाच प्रसंगाची निरंतर आठवण ! सकाळी सात साडेसातची वेळ. आसपास पुस्तकांचा व कागदपत्रांचा ढिगारा पडलेला. जवळच औषधांची बाटली. अशा स्थितीत खाली मान वाकवून कृष्णरावांचे लेखन चालू असता, “ कृष्णराव ! अकरा साडेअकरापासून रात्री दहा - दहा वाजेपर्यंत मरेपरेतो ऑफिसात काम करता, अन् पहाटे पाच - पाच वाजता उठून लेखन नाहीतर वाचन चालू ठेवता, काय म्हणावे तुम्हांला ! अशाने काय मरायचे आहे लवकर ? ” असे परिचयातील एका गृहस्थाने विचारले असता, त्याला काय बरे जबाब मिळाला ? अगदी गंभीर व शांत मुद्रेने, “ जन्माला आलो आहे, काहीतरी करायला पाहिजे. मग दोन दिवस आधी मेले काय किंवा मागाहून मेले काय एकच ! ”
खरेच ! किती उदात्त प्रसंग हा.
आपल्याकरिता सहकारी कृष्ण हाडांची काडे करून निरंतर लिहीतच आहेत, हा प्रसंग डोळ्यांपुढे आणा व कृतज्ञतेचे अश्रू ढाळा येवढी आपणा सर्वांजवळ नम्रपणे भिक्षा मागून ही अश्रूंनी डबडबलेली लेखणी खाली ठेवतो.
‘ उद्यान ’ फेब्रुवारी १९१७